पणजी: एकीकडे महाराष्ट्रात शिवसेनेत झाल्या बंडखोरीमुळे ठाकरे सरकारच कोसळलं. तर आता दुसरीकडे गोव्यात भाजप सरकार अधिक मजबूत व्हावं यासाठी वेगवान हलचाली सुरु असल्याचं समजतं आहेत. कारण गोव्यात काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा बंडखोरीचे वारे वाहू लागले आहेत. गोव्यात काँग्रेसचे 11 आमदार असून यातील काही आमदारांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली असल्याची माहिती समजते आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्यासह काँग्रेसचे 8 आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षातील या बंडखोरीनंतर काँग्रेस हायकमांडनेही आता तात्काळ कारवाई केली आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. काही वेळापूर्वीच काँग्रेसच्या वतीने विधानसभा अध्यक्षांनाही याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
अधिक वाचा: "शिंदे आणि फडणवीसांची जमलीय जोडी..." आठवलेंची खास कविता
पाहा लोबो काय म्हणाले
काही आमदारांनी यापूर्वीच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली होती. विरोधी पक्षनेतेपदावरून हटवण्यात आल्यावर मायकेल लोबो म्हणाले, 'काल एक दिवस आधी काँग्रेसच्या सर्व आमदारांनी एकत्र पत्रकारांना संबोधित केले, आम्हीही तिथे होतो. काल त्याने आम्हाला बोलावले म्हणून आम्ही सगळे दक्षिण गोव्याला गेलो. आम्हा लोकांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न का करत आहात?'
GPCC अध्यक्ष अमित पाटकर म्हणाले, 'विरोधी पक्ष नेत्याला (मायकेल लोबो) हटवण्यासाठी CLP बैठकीच्या प्रस्तावाबाबत मी अध्यक्षांना पत्र सादर केले आहे. आमचा नवीन CLP नेता आज निवडला जाईल आणि आम्ही त्याबाबत माहिती देऊ. आमच्याकडे 6 आमदार आहेत आणि अजून एक सोबत येण्याची आशा आहे. त्यामुळे आमच्याकडे अद्यापही एकूण सात आमदार आहेत.'
काँग्रेसची बैठक अन् चारच आमदार हजर
बंडखोरीच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने रविवारी आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली होती, मात्र या बैठकीला काँग्रेसचे केवळ चार आमदार उपस्थित होते. तर गोव्यात काँग्रेसचे ११ आमदार आहेत. मात्र बैठकीला केवळ दिनेश गुंडूराव, गिरीश चोडणकर आणि अमित पाटकर पोहोचले आणि उर्वरित आमदार या बैठकीला अनुपस्थित होते. यानंतर काँग्रेसमधील बंडखोरीची अटकळ अधिक तीव्र झाली.