घटनापीठासमोर सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू, काय घडत आहे सर्वोच्च न्यायालयात Live Updates 

लोकल ते ग्लोबल
Updated Sep 27, 2022 | 16:18 IST

Constitution Bench proceedings at Supreme Court : महाराष्ट्रातील ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे. Live Updates..

थोडं पण कामाचं
 • घटनापीठासमोर सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू
 • काय घडत आहे सर्वोच्च न्यायालयात Live Updates 

Constitution Bench proceedings at Supreme Court : महाराष्ट्रातील ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे. ठाकरे गट आमदारांच्या अपात्रतेवर आधी निर्णय व्हावा अशी आग्रही मागणी करत आहे. तर अपात्रतेवर सुनावणी सुरू असतानाच निवडणूक आयोगाला त्यांच्याकडे केलेल्या अर्जावरील सुनावणी करण्याचे स्वातंत्र्य मिळायला हवे अशी भूमिका शिंदे गटाकडून सुरू आहे. 

राजकीय पक्षाची व्याख्या काय, दहाव्या सूचीनुसार आमदार पात्र की अपात्र अशा वेगवेगळ्या मुद्यांवर ठाकरे गट आणि शिंदे गट यांचे वकील आपापली बाजू मांडत आहेत. ठाकरे गटाचे वकील वारंवार राजकीय घटनाक्रम सांगून आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्याची आग्रही मागणी करत आहे.

 1. महाराष्ट्रातील ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात सत्तासंघर्ष सुरू आहे
 2. आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे
 3. आमदारांच्या अपात्रतेवर आधी निर्णय घ्यावा, नंतर निवडणूक आयोगाने त्यांचा निर्णय घ्यावा ठाकरे गटाची मागणी
 4. आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी सुरू असली तरी निवडणूक आयोगाला त्यांची सुनावणी आणि निर्णय घेऊ द्यावा, शिंदे गटाची मागणी
 5. 29 जूनला पक्षाने शिंदे गटाला अपात्र ठरवले पण सर्वोच्च न्यायालयाने अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती दिली. एकनाथ शिंदे यांनी 29 जूननंतर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या घडामोडींची सुरुवात 20 जून 2022 पासून झाली. शिंदे गट 19 जुलै 2022 रोजी निवडणूक आयोगाकडे गेला आहे. यामुळे आधी आमदारांच्या अपात्रतेवरील निर्णय घ्यावा अशी आग्रही ठाकरे गटाचे वकील करत आहेत.
 6. निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे. त्यांच्या सुनावणीवर स्थगिती आणणे किंवा ही सुनावणी नंतर घ्यावी अशी मागणी करणे अयोग्य. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असली तरी निवडणूक आयोग त्यांची सुनावणी स्वतंत्रपणे करू शकते त्यामुळे आयोगाला त्यांची सुनावणी करू द्यावी - शिंदे गटाच्या वकिलाची भूमिका
 7. एकनाथ शिंदे यांचे सध्याचे स्टेटस काय - ठाकरे गटाचे वकील
 8. एकनाथ शिंदे एका पक्षाचे सदस्य म्हणून निवडणूक आयोगाकडे कधीही अर्ज करू शकतात - कोर्ट
 9. दहाव्या परिशिष्टानुसार फुटीला मान्यता नाही - कपिल सिब्बल
 10. जे आमदार विधीमंडळ पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहतात ते दुसऱ्या पक्षासोबत जाऊन सरकार स्थापन करतात. ही पक्षविरोधी कारवाई असल्यामुळे आधी आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय व्हायला हवा - सिब्बल
 11. आमदारांच्या एका गटाकडे बहुमत नसताना त्यांनी व्हिप बजावला. हा व्हिप वैध कसा - शिंदे गटाच्या वकिलाचा सवाल

 12. बैठकीनंतर अपात्रतेची नोटीस मिळाली - शिंदे गटाचे वकील

 13. अपात्रतेचा निर्णय होण्याआधीच विधीमंडळात बहुमताची चाचणी घेण्यास सांगण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने या चाचणीवर स्थगिती आणलेली नव्हती. 

 14. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे बहुमताची चाचणी झाली नाही. नंतर एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केले. शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला त्यामुळे हे सरकार वैध आहे.  - शिंदे गटाचे वकील

 15. एकनाथ शिंदे यांना बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा आहे हे तपासून विधानसभेच्या अध्यक्षांनी त्यांची गटनेतेपदी झालेली निवड वैध ठरविली आणि या गटनेत्याने नियुक्त केलेला व्हिप विधानसभाध्यक्षांनी वैध ठरविला.   - शिंदे गटाचे वकील

 16. प्रकरण दहाव्या सूचीच्या पलिकडचे आहे. - शिंदे गटाचे वकील

 17. घटनात्मक संस्थांना त्यांच्याशी संबंधित विषयांची सुनावणी घेऊन निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. ही व्यवस्था असताना ठाकरे गट प्रत्येक गोष्टीचा निर्णय कोर्टातच व्हावा अशी मागणी करत आहे  - शिंदे गटाचे वकील

 18. घटनात्मक संस्थांच्या कामात अडथळे आणणे योग्य नाही त्यामुळे ठाकरे गटाची मागणी मान्य करू नये आणि निवडणूक आयोगाला त्यांचे काम स्वतंत्रपणे करू द्यावे - शिंदे गटाचे वकील 

 19. आमदारांना अपात्र ठरविणारी नोटीस काढण्याआधीच तत्कालीन हंगामी विधानसभाध्यक्ष असलेल्या नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव सादर झाला होता. - शिंदे गटाचे वकील

 20. ज्या आमदारांच्या पात्रता किंवा अपात्रतेवरून ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करत आहे त्यांना पक्षातून काढल्याचे पत्र निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेले नाही. - शिंदे गटाचे वकील

 21. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभाध्यक्षांकडे आहे आणि विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यामुळे निर्णय त्यांना घेऊ देणे आवश्यक आहे - शिंदे गटाचे वकील

 22. निवडणूक चिन्हाचा निर्णय निवडणूक आयोग घेऊ शकतो, मागे समाजवादी पक्षाच्या वादावर तोडगा काढताना निर्णय निवडणूक आयोगानेच दिला. त्यावेळी माजवादी पक्षाचे 13 आमदार अपात्र ठरले होते पण निर्णय निवडणूक आयोगानेच घेतला होता त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्याशी संबंधित विषयाची सुनावणी घेऊन निर्णय घेणे योग्य - शिंदे गटाचे वकील

 23. विधानसभा अध्यक्ष राजकीय पैलूंची चौकशी करु शकत नाही, पण बलाबल पाहून निर्णय देण्यास सक्षम - शिंदे गटाचे वकील

 24. निवडणूक चिन्हाचे वाटप निवडणूक आयोग करतो, निवडणूक चिन्ह ही आमदारांची मालमत्ता नाही. परिशिष्ट 25 आणि 26 नुसार निवडणूक आयोग निवडणूक चिन्हाबाबतचे निर्णय घेते. आमदारांना अपात्र ठरविण्याचा अधिकार पक्षाल नाही तर विधानसभेच्या अध्यक्षांना आहे. विधानसभाध्यक्षांनी शिंदे गटाला मान्यता दिली आहे. ही मान्यता असल्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे. ठाकरे गटाकडे बहुमत नाही.  - शिंदे गटाचे वकील

 25. ठाकरे गटाकडून न झालेल्या घटनेवर युक्तिवाद सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि ठाकरे सरकारची बहुमत चाचणी रद्द झाली. यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. विधानसभेत रिक्त असलेल्या जागेवर अध्यक्ष नियुक्त झाले. विधानसभाध्यक्षांनी त्यांच्याकडे असलेल्या घटनात्मक अधिकारांचा वापर करून नवा गटनेता, व्हिप या संदर्भातले निर्णय दिले आहेत. एकनाथ शिंदे हे बहुमताने त्यांना समर्थन देणाऱ्या आमदारांचे नेते झाले. बहुमताने एकनाथ शिंदे हे सभागृह नेते झाले आहेत. - महेश जेठमलानी, शिंदे गटाचे वकील

 26. कोणती शिवसेना खरी आहे याचे उत्तर निवडणूक आयोग देऊ शकतो. यासाठी आयोगाला त्याचे काम करू देणे आवश्यक आहे. - तुषार मेहता, भारत सरकारचे वकील

 27. निवडणूक आयोग घटनात्मक संस्था, आयोगाचे काम विधानसभेच्या अध्यक्षापेक्षा निराळे. - अरविंद दातार, निवडणूक आयोग

 28. निवडणूक आयोगाच्या नोंदींनुसार उद्धव ठाकरे हे 2023 पर्यंत पक्षाध्यक्ष, एकनाथ शिंदे यांना पक्षातून काढण्यात आले आहे तसे पत्र निवडणूक आयोगाकडे आहे, एकनाथ शिंदे हे पक्षाचे प्राथमिक सदस्य पण नाही; मग निवडणूक आयोगाकडे कसे गेले? - कपिल सिब्बल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी