नवी दिल्ली : कोविड-१९ लसीकरणाची (Covid-19 Vaccination) प्रतिक्षा आता संपली आहे. आजपासून देशभरात कोविड-१९ लसीकरण मोहिमेचा (Covid-19 vaccination drive) शुभारंभ करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरात लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. हा लसीकरण कार्यक्रम जगभरातील सर्वात मोठा कार्यक्रम असणार आहे. देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण ३६०० केंद्रांवर लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे.
या लसीकरणाच्या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने विकसित केलेला को-विन (Co-WIN) हा डिजिटल प्लॅटफॉर्म वापरण्यात येणार आहे. या को-विन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लसींचा एकूण साठा, पुरवठा, लस कोणाला दिली गेली, लसीचा दुसरा डोस पुन्हा कधी दिला जाणार यासारखी संपूर्ण माहिती उपलब्ध असणार आहे.
पहिल्या गटात शासकीय आणि खासगी दवाखान्यातील आरोग्यसेवक कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे कामगार आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पातील कर्मचारी यांचा समावेश आहे.
दुसऱ्या गटात फ्रंटलाईन वर्करचा समावेश आहे ज्यात केंद्रीय पोलीस, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, नागरी सुरक्षा संस्थांमधील कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवक, महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.
तिसऱ्या गटात ५० वर्षांवरील आणि ज्यांना अन्य व्याधी आहेत अशा ५० वर्षांखालील व्यक्तींचा समावेश आहे.