नवी दिल्ली: कोरोना लसीकरण (Covid-19 vaccination) मोहिमेच्या दिशेने भारताने आता वाटचाल केली असून आणखी एक महत्वाचं पाऊल पुढे टालकलं आहे. गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या उच्चस्तरिय बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे की, येत्या २ जानेवारी २०२१ पासून देशभरातील सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाचा ड्राय-रन म्हणजेच कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात येणार (Dry run will be conducted by all the State and UT governments on 2nd January 2021) आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी कोविड-१९ लसीकरणाच्या संबंधित तयारीचा आढावा घेतला. तसेच सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणासाठी पूर्णपणे तयार राहण्यास सांगितले आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून यापूर्वी देशातील चार राज्यांत कोविड-१९ लसीकरणाचा ड्राय रन घेण्यात आला होता. २८ डिसेंबर आणि २९ डिसेंबर या दोन दिवशी देशातील आसाम, आंध्रप्रदेश, पंजाब आणि गुजरात या राज्यांत कोविड-१९ लसीकरण कार्यक्रम कसा राबवायचा याचा ड्राय रन म्हणजेच रंगीत तालीम यशस्वीपणे घेतली.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध कामांसाठी विशेष पथके तयार करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यामध्ये डमी लाभार्थ्यांचा डेटा अपलोड करणे, त्यांचे ठिकाण निश्चित करणे, लसींचे वितरण करणे, लाभार्थ्यांना लसीच्या संदर्भातील तपशील देण्यासारखी कामे या ड्राय रनमध्ये करण्यात आली.
कोविड-१९ लसीकरणाच्या कार्यक्रमाची रंगीत तालीम करण्याचा उद्देश म्हणजे, लसीकरण कार्यक्रमाची प्रक्रिया निश्चित करताना त्याचे नियोजन आणि पूर्वतयारी करणे तसेच प्रत्यक्षात लसीकरणाचा कार्यक्रम राबवत असताना आवश्यक मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे, लसीकरणासाठी सोई-सुविधांची निर्मिती करणे, सीओ-डब्ल्यूआयएन (CoWIN) को-विन वर अर्ज उपलब्ध करुन देणे, ज्या भागात लसीकरण करायचे आहे त्या ठिकाणांची नोंद, जिल्ह्यांना किती लस देण्याची आवश्यकता आहे? किती लस दिल्या?, किती लसींचे वितरण झाले आहे या संदर्भातील नियोजन करणे. ज्या ठिकाणी लसीकरणाचा कार्यक्रम सुरू आहे त्या ठिकाणी लसीचा पुरवठा सुरळीत ठेवणे असे काम लसीकरणाच्या ड्राय रन म्हणजेच रंगीत तालीममध्ये घेण्यात येतं.
भारत सरकारने कोरोना लसीकरणाला परवानगी दिल्यावर सर्वाधिक धोका असणाऱ्यांना सर्वप्रथम लस दिली जाणार आहे.