नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. हे पॅकेज भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या १० टक्के असणार आहे. आज देशाला संबोधित भाषणात पंतप्रधान मोदी यांनी ही घोषणा केली.
या आर्थिक पॅकेजच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था, मजूर, लघूमध्यम उद्योग अशा सर्वांना मदत केली जाईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन याबद्दल सविस्तर माहिती देतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
भारताने कोरोनाच्या संकटाचे संधीत रुपांतर करायला पाहिजे. तरच २१ व्या शतकावर वर्चस्व ठेवण्याचे आपले स्वप्न पूर्ण होऊ शकते. त्यासाठी भारताला स्वयंपूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे भारताने एखादी गोष्ट ठरवली तर काहीच अवघड नाही. आगामी काळात आपल्याला अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, सक्षम व्यवस्था, वैविध्यपूर्ण भूगोल आणि मागणी पुरवठ्याच्या चक्राचे सुयोग्य नियोजन या पाच प्रमुख घटकांच्या पायावर देशाची भक्कम इमारत उभारावी लागेल, असे मोदींनी यावेळी सांगितले. त्यासाठी देशातील जनतेने आपला मोर्चा 'ग्लोबल'कडून लोकल उत्पादनांकडे वळवाला. स्थानिक उत्पादनांची केवळ खरेदीच नव्हे तर त्यांचा प्रचारही करा. जेणेकरून स्थानिक उत्पादनांना सुगीचे दिवस येतील, असेही मोदींनी यावेळी म्हटले.
कोरोनाविरुद्ध सुरु असलेल्या लढाई दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (मंगळवार) पुन्हा देशाला संबोधित करीत आहेत. आज रात्री ८ वाजता पंतप्रधान देशाला संबोधित करणार असल्याची माहिती सकाळपासून माध्यमांमध्ये येत आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा हा १७ मे रोजी संपणार आहे. अशावेळी संपूर्ण देशाचं लक्ष पंतप्रधान मोदींच्या संबोधनाकडे लागून राहिलं आहे. देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे ही परिस्थिती लक्षात घेऊन लॉकडाऊन पुढे देखील वाढविण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
देशातील लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा एकदा वाढविला जाऊ शकतो. सध्या सुरु असलेला लॉकडाऊन हा १७ मेपर्यंत आहे. पण यात पुन्हा एकदा वाढ केली जाऊ शकते. असे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानावरून मिळत आहेत. पंतप्रधान मोदींनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी दीर्घ चर्चा केली. यावेळी लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे झालेले नुकसान या मुद्द्यावरही चर्चा झाली. यावेळी मोदींनी राज्यांना ब्लू प्रिंट सादर करण्याचे आदेशही दिले आहेत.
देशातील कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २५ मार्चपासून लॉकडाऊन सुरु करण्यात आला होता. जो आधी १४ एप्रिल, नंतर ३ मे आणि त्यानंतर १७ मेपर्यंत वाढविण्यात आला होता. भविष्यातील रणनीति ठरविताना विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की, याक्षणी देशासमोर दोन मोठी आव्हाने आहेत. पहिलं आव्हान म्हणजे रोगावर नियंत्रण मिळवणं आणि दुसरं आव्हान म्हणजे मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करून सार्वजनिक व्यवहारात वाढ करणं