Corona Vaccine free: संपूर्ण देशात कोरोनाची लस मोफत मिळणार? केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले...

Corona vaccine free of cost: देशभरात कोरोनाची लस मोफत दिली जाणार आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. त्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी ट्विट करत यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

Corona Vaccine
(प्रातिनिधीक फोटो)  
थोडं पण कामाचं
  • 'कोरोनाची लस मोफत दिली जाणार' : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची माहिती
  • ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लसीला सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशने मान्यता दिली, आता ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
  • ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने मान्यता देताच भारतात लसीकरण सुरू होणार

नवी दिल्ली : संपूर्ण देशासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण कोरोना लस (Corona vaccine price) नेमकी किती रुपयांना मिळणार याबाबत नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत होते. याबाबत आता केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे. संपूर्ण देशभरात कोरोनाची लस ही मोफत (Corona vaccine free of cost) दिली जाणार आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harshvardhan) यांनी दिली आहे. त्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी ट्विट करत म्हटलं, "कोविड-१९ लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात १ कोटी आरोग्यसेवकांना आणि २ कोटी फ्रंटलाईन वर्कर्सला कोरोनाची लस मोफत दिली जाईल. जुलै महिन्यापर्यंत प्राथमिकता असलेल्या २७ कोटी लाभार्थ्यांना लस कशी द्यावी याचा तपशील देण्यात येईल."

भारतात कोरोना लसीकरणाला लवकरच सुरूवात होणार आहे आणि यासाठी केंद्र सरकारकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. आज (२ जानेवारी २०२०) संपूर्ण देशभरात कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाचे ड्राय रन होत आहे. लसीकरणाच्या ड्राय रनचा आढावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी घेतला आणि त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, संपूर्ण देशभरात कोरोनाची लस मोफत दिली जाईल. मात्र, त्यानंतर त्यांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिलं आहे.

दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात कोरोना लसीकरण कार्यक्रमाच्या ड्राय रनचा आढावा घेतल्यावर बाहेर आलेल्या केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं, मी नागरिकांना आवाहन करतो की अफवांवर विश्वास ठेवू नका. कोरोना लसीची सुरक्षा निश्चित करणे आमचे प्राधान्य आहे. पोलिओ लसीच्या वेळीही विविध प्रकारच्या अफवा पसरव्यात आल्या पण नागरिकांना लस दिली गेली आणि आज भारत पोलिओमुक्त झाला.

ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लसीला भारतात मान्यता

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका यांनी विकसित केलेल्या कोविशिल्ड लसीला आपत्कालीन उपयोगासाठी सीडीएससीओ (CDSCO) म्हणजेच सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशने मान्यता दिली आहे. मात्र, अंतिम परवानगी ही ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच डीसीजीआय (DCGI) घेणार आहे. कोविशिल्ड लसीची निर्मिती भारतामध्ये सीरम इन्स्टिट्यूट करत आहे. डीसीजीआयने परवानगी देताच भारतात लसीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी