Corona Vaccination Dry Run: लसीकरणापूर्वी 'या' चार राज्यांत होणार सराव, जाणून घ्या काय आहे ड्राय रन?

Corona Vaccination dry run in 4 states: कोरोना लसीकरणासाठी केंद्र शासनाने तयारी सुरू केली आहे. कोरोना लस व्यवस्थापनाचा सराव देशातील चार राज्यांत करण्यात येणार आहे. पहा कुठल्या राज्यांत लसीकरणाची ही रंगीत तालीम

Corona vaccination
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई : कोविड-१९ लसीकरणाच्या (Covid-19 vaccination) प्रक्रियेसाठी केंद्र सरकारने तयारी सुरू केली आहे. लसीकरणात व्यवस्थापनाची भूमिका महत्वाची आहे आणि त्यामुळे देशभरातील २३६० प्रशिक्षण सत्रांमधून सात हजारांहून अधिक प्रशिक्षक जिल्हा पातळीवर प्रशिक्षित करण्यात आले आहेत. कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम केंद्र सरकारकडून घेण्यात येणार आहे.

चार राज्यांत लसीकरणाचा सराव

केंद्र सरकार कोविड१९ च्या लसीकरणाला परवानगी देण्याच्या तयारीत आहे आणि त्यापूर्वी लसीकरणाच्या व्यवस्थापनाची रंगीत तालीम करत आहे. येत्या २८ आणि २९ डिसेंबर रोजी कोरोना लसीकरणाच्या व्यवस्थापनाचा सराव देशातील ४ राज्यांत करण्यात येणार आहे. भौगोलिक स्थळांचा विचार करता आंध्रप्रदेश, आसाम, गुजरात, पंजाब या राज्यांत ड्राय रनचे नियोजन करण्यात आले आहे. लसीकरणाच्या प्रक्रियेत लस व्यवस्थापनाची महत्वाची भूमिका असल्यामुळे प्रशिक्षकांना तसेच विविध राज्यात लस वितरणाचे व्यवस्थापन करणाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

लसीकरणात सहभागी होणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, लस देणारे, लस देणाऱ्यांची पर्यायी चेन, कोल्ड चेन हाताळणी करणारे, सुपरवायझर, डेटा व्यवस्थापक, आशा समन्वयक आणि इतर विविध पातळीवर लसीकरण प्रक्रियेचा भाग असलेल्यांना वेगवेगळ्या पद्धतीने प्रशिक्षण देण्यासाठी सत्रे सुरू आहेत.

अशा प्रकारे होणार ड्राय रन

प्रत्येक राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये विशेषत: जिल्हा रुग्णालय, सार्वजनिक आरोग्य केंद्र किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी केंद्र, खासगी रुग्णालये, ग्रामीण केंद्र अशा पाच वेगवेगळ्या लस केंद्रांवर लसीकरणाच्या संदर्भातील रंगीत तालीम होणार आहे. कोविड लसीकरणाची रंगीत तालीम पंजाबमधील लुधियाना आणि शहीद भगतसिंग नगर येथे होणार आहे. लुधियानाचे उपायुक्त व्ही. शर्मा यांनी सांगितले की, लसीकरणासाठी ८०५ सर्व्हिस लोकेशन निश्चित करण्यात आले आहेत.

ड्राय रन चालवण्यामागचा हेतू

कोरोना लस ड्राय रनच्या माध्यमातून कोरोना लस आल्यावर जी प्रक्रिया होणार आहे ते सुनिश्चित केंद्र सरकारला करायचं आहे. यावेळी कोणालाही लस दिली जाणार नाहीये मात्र, लस देण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया रंगीत तालीम म्हणून केली जाणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी