Earthquake in Afghanistan: अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील पकतिका प्रांतात बुधवारी झालेल्या भूकंपामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. प्रातांत मोठा विध्वंस झाला आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत 920 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 610 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. भूकंप इतका भयानक होता की वस्त्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. भिंतींना ही मोठ्या भेगा पडल्या आहेत.
भूकंपाचा परिणाम पाकिस्तानपर्यंत दिसून आला आहे. वस्त्यांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. या भूकंपातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. 6.1 तीव्रतेच्या भूकंपाचा केंद्रबिंदू खोस्टच्या नैऋत्येस 44 किमी अंतरावर होता.
पाकिस्तानातही जाणवले भूकंपाचे धक्के
पाकिस्तानकडून मिळालेल्या वृत्तात म्हटलं आहे की, इस्लामाबादसह देशाच्या इतर भागात भूकंपाचे सौम्य तीव्रतेचे धक्के जाणवले. लाहोर, मुलतान, क्वेटा आणि पाकिस्तानातील इतर शहरांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोकांनी घराबाहेर धाव घेतली. मात्र या शहरांमध्ये जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. पाकिस्तानात शुक्रवारी 5 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. इस्लामाबाद, पेशावर, रावळपिंडी आणि मुलतानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.