जमीनीवरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 17, 2020 | 22:44 IST

DRDO successfully testfires Quick Reaction Surface-to-Air Missile जमीनीवरुन हवेत मारा करणाऱ्या 'क्विक रिअॅक्शन सरफेस टू एअर मिसाइल एअर डिफेन्स सिस्टीम'ची सलग दुसरी चाचणी यशस्वी

थोडं पण कामाचं

  • जमीनीवरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
  • सलग दुसरी चाचणी यशस्वी
  • भूदलाचे नियंत्रण रेषा आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सामर्थ्य वाढणार

नवी दिल्ली: जमीनीवरुन हवेत मारा करणाऱ्या 'क्विक रिअॅक्शन सरफेस टू एअर मिसाइल एअर डिफेन्स सिस्टीम'ची (Quick Reaction Surface to Air Missile air defence system) सलग दुसरी चाचणी यशस्वी झाली. पहिली चाचणी शुक्रवारी १३ नोव्हेंबर रोजी आणि दुसरी चाचणी आज (मंगळवारी) १७ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. दोन्ही चाचण्या यशस्वी झाल्याची माहिती डीआरडीओने दिली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या यशासाठी डीआरडीओचे अभिनंदन केले. (DRDO successfully testfires Quick Reaction Surface-to-Air Missile defence system) 

पहिल्या चाचणीच्यावेळी रडारची क्षमता, लक्ष्याचा अचूक वेध घेण्याचे सामर्थ्य यांची तपासणी करण्यात आली. दुसऱ्या चाचणीत स्फोटकांच्या तीव्रतेची तसेच लक्ष्य नष्ट करण्याच्या ताकदीची सखोल तपासणी करण्यात आली. दोन्ही चाचण्या अपेक्षित यश मिळवू शकल्या. या चाचण्यांमुळे भारताच्या हवाई हद्दीचे रक्षण करण्यासाठी संरक्षण दलांच्या ताब्यात आणखी एक सक्षम यंत्रणा दाखल झाली. डीआरडीओ, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि भारत डायनॅमिक्स यांनी संयुक्तपणे हे क्षेपणास्त्र विकसित केले. भूदलाला देशाच्या हवाई हद्दीचे रक्षण करण्याचे सामर्थ्य मिळवून देण्यासाठी हे क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले आहे. भारत-पाकिस्तान यांच्या दरम्यान नियंत्रण रेषा (Line of Control - LOC) तसेच भारत-चीन यांच्या दरम्यान असलेली प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (Line of Actual Control - LAC) या दोन्ही ठिकाणी शत्रू सैन्यावर सामर्थ्याचा प्रभाव राखण्यासाठी या क्षेपणास्त्राचा वापर होणार आहे. 

लक्ष्याचा झटपट वेध घेणे, वेगाने पाठलाग करुन लक्ष्य नष्ट करणे या दोन्ही गोष्टी 'क्विक रिअॅक्शन सरफेस टू एअर मिसाइल एअर डिफेन्स सिस्टीम'च्या मदतीने शक्य आहेत. मोबाइल लाँचरमुळे कोणत्याही ठिकाणावरुन लक्ष्यच्या दिशेने क्षेपणास्त्र प्रक्षेपित करणे शक्य आहे. एका मोबाइल लाँचरमध्ये सहा क्षेपणास्त्र अशा पद्धतीची ही यंत्रणा आहे. या क्षेपणास्त्राचे संक्षिप्त नाव क्यूआरएसएएम (Quick Reaction Surface-to-Air Missile  - QRSAM) असे आहे. हे क्षेपणास्त्र रडारच्या मदतीने लक्ष्याचा वेध घेते आणि पाठलाग करुन लक्ष्य लगेच नष्ट करते. यामुळे देशाच्या हवाई हद्दीचे रक्षण होते तसेच शत्रूकडून हवाई मार्गाने हल्ला होण्याचा धोका कमी होतो. याच कारणामुळे ही एक प्रभावी एअर डिफेन्स सिस्टीम आहे.

क्यूआरएसएएम क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये

  1. घन इंधन वापरते, कारवाईसाठी झटपट सज्ज करणे शक्य
  2. पल्ला - किमान ३ किमी ते कमाल ३० किमी
  3. जमीनीपासून आकाशात सहा किमी उंचीपर्यंत झटपट जाते
  4. आवाजापेक्षा जास्त वेगाने, ४.७ मॅक वेगाने उड्डाण करुन लक्ष्याचा पाठलाग करते
  5. उड्डाणानंतर स्वयंचलित पद्धतीने लक्ष्याचा पाठलाग करू शकते तसेच प्रक्षेपण केल्यानंतर आवश्यकतेनुसार नियंत्रक संगणकीकृत यंत्रणेच्या मदतीने क्षेपणास्त्राच्या मार्गात बदल करून शत्रू सैन्याची मोठी हानी करू शकतो.
  6. भारताकडे हवाई सीमेचे रक्षण करण्यासाठी बराक ८, आकाश, अॅडव्हान्स एअर डिफेन्स, पृथ्वी एअर डिफेन्स आणि क्यूआरएसएएम एअर डिफेन्स सिस्टीम एवढ्या यंत्रणा आहेत. आवश्यकतेनुसार या यंत्रणांचा सुयोग्य वापर करणे शक्य आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी