Deepotsav in Ayodhya: लक्ष-लक्ष दिव्यांनी उजळली अयोध्यानगरी, पाहा दीपोत्सवाचा नजारा

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 13, 2020 | 20:25 IST

Deepotsav in Ayodhya: यंदाची दिवाळी ही अयोध्यानगरीत खूपच खास आहे कारण राम मंदिर निर्माणाच्या कार्याला सुरुवात झाल्यावर ही पहिलीच दिवाळी आहे. पारंपारिक पद्धतीसोबतच व्हर्च्युअल पद्धतीनेही अयोध्यानगरित दीपोत्सव.

थोडं पण कामाचं

  • दिवाळीनिमित्त अयोध्यानगरी खास सजली 
  • लक्ष-लक्ष दिव्यांनी अयोध्यानगरी उजळली 
  • राम मंदिर निर्माणाला सुरुवात झाल्यावर पहिलीच दिवाळी

अयोध्या : लंकापती रावणाचा वध करुन प्रभू श्रीराम अयोध्यानगरीत दाखल झाले होते. त्यावेळी संपूर्ण शहराने श्री रामाचे खास अंदाजात स्वागत केले होते. घरोघरात दीप प्रज्वलित करण्यात आले होते. यंदाची दिवाळी ही खूपच खास आहे कारण, राम मंदिराच्या निर्माणाला सुरुवात झाल्यावर ही पहिलीच दिवाळी आहे. कोरोनामुळे यंदा पारंपारिक दिव्यांसोबतच व्हर्च्युअल पद्धतीने सुद्दा दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे.

शरयू नदीच्या किनाऱ्यावर लक्ष-लक्ष दिवे प्रज्वलीत करण्यात आले. शरयू नदीच्या किनाऱ्यावरील हे दृश्य खूपच विहंगम आहे. अयोध्येत गेल्या तीन वर्षांपासून दीपोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र यंदाचा दीपोत्सव हा खूपच खास आहे. राम मंदिर निर्माण कामाला सुरुवात झाली असून यंदा तेथेही दिवे प्रज्वलित करण्यात आले आहेत. यंदा एकूण ५,८४,५७२ दिवे प्रज्वलित करण्यात आले.

दीपोत्सवापूर्वी प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण हे अयोध्येत अवतरले. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्यासह मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर प्रतिकात्मक राज्याभिषेक करण्यात आला. मग संध्याकाळ होताच साडेपाच लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले. 

अयोध्येत दीपोत्सवाच्या कार्यक्रमा दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं, अनेक पिढ्यांपासून सर्वांचीच इच्छा होती की भगवान श्री रामाचे भव्य मंदिर निर्माण कार्य आपल्या डोळ्यांनी पहावे. आता हे सत्यात उतरलं आहे ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यामुळे. मी सर्व उत्तरप्रदेशवासीय आणि भाविकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी