Exclusive 'नीट'च्या टॉपरने रचला इतिहास

Exclusive NEET 2020 Topper Shoyeb Aftab creates history with 720 marks ओडिशाच्या शोयेबने नीट परीक्षेत ७२० पैकी ७२० गुण मिळवत ओडिशात आणि देशात पहिला क्रमांक पटकावला.

Exclusive NEET 2020 Topper Shoyeb Aftab creates history with 720 marks
Exclusive 'नीट'च्या टॉपरने रचला इतिहास 

थोडं पण कामाचं

  • Exclusive 'नीट'च्या टॉपरने रचला इतिहास
  • ओडिशाचा राज्यात आणि देशात पहिला
  • शोयेबला नीट परीक्षेत ७२० पैकी ७२० गुण

नवी दिल्ली: वैद्यकीय क्षेत्राच्या राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या नीट (NEET - National Eligibility cum Entrance Test) या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला. बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ही परीक्षा देतात. या परीक्षेत ओडिशाच्या (Odisha) शोयेब आफताबने (Shoyeb Aftab) ७२० पैकी ७२० गुण मिळवले. नीट परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवून त्याने इतिहास रचला. तो देशाच्या आणि राज्याच्या गुणवत्ता यादीत अर्थातच पहिला आला. ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या शोयेबची 'टाइम्स नाऊ'ने एक्सल्युजिव्ह मुलाखत घेतली.

शोयेबने १०० टक्के गुण मिळवण्याचाच पराक्रम केला नाही तर पहिल्यांदाच ओडिशाचाचा विद्यार्थी देशात पहिला आला. बुद्धिमान असलेल्या शोयेबला आपण नीट परीक्षेत चांगले गुण मिळवू आणि वैद्यकीय शाखेत प्रवेश घेण्यात यशस्वी होऊ असा विश्वास होता. पण एवढे अभूतपूर्व यश मिळेल याची त्याला स्वतःलाही खात्री वाटत नव्हती. 

आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असलेल्या शोयेबच्या जीवनात पहिली मोठी अडचण आठवीत आली. तो आठवीच असताना त्याच्या वडिलांना चहाच्या व्यापारात मोठे नुकसान झाले. या तोट्यातून सावरताना त्यांची आर्थिक ओढाताण झाली. या अडचणीमुळे पुढे जाऊन घरच्यांना कोटा येथील कोचिंग क्लासचे शिक्षण देणे परवडणार नाही याची जाणीव शोयेबला झाली. त्याने स्वतःच अभ्यासावर लक्ष केंद्रीत करुन अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी कष्ट करायला सुरुवात केली. त्याच्या प्रयत्नांना नीट परीक्षेच्यावेली तर ऐतिहासिक असे यश प्राप्त झाले.

चहा व्यापारात फटका बसल्यावर बांधकाम व्यवसायात वडिलांनी छोटी सुरुवात केली आणि हळू हळू प्रगती केली. सुदैवाने पुन्हा चांगले दिवस आले आणि शोयेबला कोटा येथील क्लासमध्ये जाऊन शिकणे शोयेबला शक्य झाले. त्याच्या धाकट्या बहिणीनेही शोयेबला अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी मदत केली. 

शाळेतून कॉलेजमध्ये गेल्यावर पहिल्या वर्षी म्हणजे अकरावीत शोयेबवर नव्या शैक्षणिक वातावरणाचा परिणाम झाला. त्याचे गुण थोडे कमी झाले. पण या परिस्थितीतून त्याला सावरण्यासाठी धाकट्या बहिणीचा पाठिंबा मोलाचा ठरला. यामुळे पुन्हा एकदा त्याचा आत्मविश्वास वाढला आणि त्याने नव्या जोमाने प्रयत्न केले. अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले. 

अभ्यास लक्ष केंद्रीत करुन करत असताना त्याला टॅलेंटेक्स या शिष्यवृत्तीची (स्कॉलरशिप) माहिती मिळाली. या शिष्यवृत्तीत नीट परीक्षेच्या अभ्यासासाठीही आर्थिक मदत मिळते. ही माहिती मिळताच ही शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी उत्तम गुण मिळवायचे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून शोयेबने अभ्यास केला. शिष्यवृत्ती मिळताच शोयेबने नीट परीक्षेत यशस्वी होण्यासाठी तयारी सुरू केली. त्याला कोटाच्या नीट परीक्षेच्या कोचिंग क्लासकडून मार्गदर्शन केले जात होते. दररोज कॉलेजचा अभ्यास, कोटातील क्लासचा अभ्यास आणि किमान २-३ तास केलेला गृहपाठ याच्या जोरावर नीट परीक्षेसाठी शोयेब तयारी करत होता. सुटीच्या दिवशी तो दररोज १४ तास नीट परीक्षेसाठी तयारी करत होता. बारावीची परीक्षा जवळ आल्यावर जानेवारी २०२० मध्ये शोयेबने पुढचे काही दिवस बारावीच्या अभ्यासाला महत्त्व देण्याचा निर्णय घेतला. तरी त्याला बारावीच्या सीबीएसईच्या परीक्षेत ९६ टक्के मिळाले. मर्यादीत दिवसांच्या अभ्यासावर मिळवलेल्या या यशामुळे नीटमध्येही यशस्वी होऊ असा विश्वास त्याला वाटू लागला.

धाकटी बहीण आणि आई या दोघींचा भक्कम पाठिंबा आणि वाढलेला आत्मविश्वास यामुळे शोयेबने उत्साहाने नीट परीक्षेसाठी अभ्यास करायला सुरुवात केली. दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवण्यासाठी त्याने अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रीत केले. या कष्टांचे फळ त्याला मिळाले. त्याला नीट परीक्षेत ७२० पैकी ७२० गुण मिळाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी