...तर कृषी कायदा दुरुस्ती विधेयक येणार - राजनाथ

लोकल ते ग्लोबल
Updated Jan 23, 2021 | 06:00 IST

आवश्यकता भासल्यास सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी कायदा दुरुस्ती विधेयक सादर करू शकते - संरक्षणमंत्री राजाथ सिंह

थोडं पण कामाचं

  • ...तर कृषी कायदा दुरुस्ती विधेयक येणार - राजनाथ
  • चीनने भारताचा विश्वास केला
  • लसवर टीका करणे चुकीचे आहे

नवी दिल्ली: केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठीच कृषी कायदे केले आहेत. पण शेतकऱ्यांच्या आणखी काही मागण्या असतील तर त्यांच्यावर चर्चा होऊ शकते. आवश्यकता भासल्यास सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी कायदा दुरुस्ती विधेयक सादर करू शकते. या पद्धतीने कायदा आणखी प्रभावी तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे हित जपणारा असा करता येईल, असे संरक्षणमंत्री राजाथ सिंह म्हणाले. ते 'टाइम्स नाऊ'च्या (TIMES NOW) राजकीय विषयांच्या ग्रुप एडिटर नाविका कुमार यांना दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. (Centre ready to make amendments in interest of farmers)

केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांच्यात चर्चेच्या अकरा फेऱ्या झाल्या. अद्याप तोडगा निघालेला नाही. शेतकरी रस्त्यावर बसून आहेत. शेतकऱ्यांनी अशा अवस्थेत दिवस काढू नये अशी सरकारची इच्छा आहे. याच कारणामुळे सरकार शेतकऱ्यांना रस्त्यावर बसण्यापेक्षा घरी जा असे आवाहन वारंवार करत आहे. 

चर्चा सुरू आहे. शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांविषयी त्यांना असलेले नेमके आक्षेप सांगावेत. केंद्र सरकार हे आक्षेप दूर करण्यासाठी दुरुस्ती विधेयक आणण्याबाबत विचार करू शकते, असे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. संसदेत चर्चेनंतर विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. फक्त शेतकऱ्यांच्या मनात गैरसमज नको म्हणून केंद्र सरकार १८ महिन्यांसाठी कायद्यांची अंमलबजावणी स्थगित ठेवायला तयार आहे. या कालावधीत चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न करता येईल, असेही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. 

याआधी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनीही कृषी कायद्यांची अंमलबजावणी लांबणीवर टाकण्याच्या मुद्यावर विचार करुन निर्णय घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. चर्चेच्या फेऱ्या वारंवार अयशस्वी होण्यामागे वेगळे कारण आहे. शेतकरी नसलेसे काही जण स्वार्थासाठी चर्चा यशस्वी होऊ देत नाहीत, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 'टाइम्स नाऊ'ला दिलेल्या मुलाखतीत पुन्हा एकदा कायद्यांची अंमलबजावणी लांबणीवर टाकण्याचा मुद्दा मांडला. 

चीनने भारताचा विश्वास केला

चीनने भारताचा विश्वासघात केला. सीमा प्रश्नावर मतभेद दूर करण्यासाठी चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असताना घुसखोरी करण्याचा प्रयत्न करुन चीनने विश्वासघात केला. मात्र भारताच्या जवानांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती दिली. प्राणपणाने लढून भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण केले. भारताच्या सीमा सुरक्षित आहेत. सीमांच्या रक्षणासाठी पुरेसे सैनिक सज्ज आहेत. लडाख असेल नाही तर अन्य कोणतीही जागा असेल... देशाच्या सर्व सीमांचे रक्षण करण्यासाठी सैनिक सज्ज आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी भारत योग्य ती कृती करण्यासाठी सक्षम आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

चीनसोबतच्या संघर्षाची शक्यता फेटाळू शकत नाही. मात्र चर्चेच्या टेबलवर आणून चीनला वाटाघाटी करण्यास भारताने भाग पाडले आहे. चर्चा सुरू असली तरी सीमेवर भारत सावध आहे. चीनची आगळीक खपवून घेणार नाही, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.

लसवर टीका करणे चुकीचे आहे

कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया या संस्थेने तयार केलेली कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीची कोवॅक्सिन या लसचा वापर सुरू आहे. भारतात तयार झालेल्या या दोन्ही लस विश्वासार्ह आहे. अनेक चाचण्या घेतल्यानंतर मंजुरी मिळालेल्या या लसविषयी वाद निर्माण करणे अथवा शंका उत्पन्न करणे चुकीचे आहे. या पद्धतीने आपणच आपल्या संशोधकांच्या कामावर शंका घेण्यासारखे आहे. संशोधकांनी सर्व प्रश्नांची उत्तर दिल्यानंतर त्यांनी विकसित केलेल्या लसला लसीकरणासाठी मंजुरी देण्यात आली आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी