देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार, अमित शहांनी दिले उत्तर

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 19, 2021 | 00:41 IST

Frankly Speaking with HM Amit Shah Full Exclusive Interview वाढत्या कोरोना संकटामुळे देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार का, या प्रश्नाचे उत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले.

थोडं पण कामाचं

  • देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार, अमित शहांनी दिले उत्तर
  • ऑक्सिजन, रेमेडिसविर संदर्भात केंद्राने धोरणात्मक निर्णय घेतले - अमित शहा
  • पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजप २०० पेक्षा जास्त जागा जिंकेल आणि सरकार स्थापन करेल

नवी दिल्ली: वाढत्या कोरोना संकटामुळे देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार का, या प्रश्नाचे उत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले. ते टाइम्स नेटवर्कच्या ग्रुप एडिटर - पॉलिटिक्स नाविका कुमार यांच्या फ्रँकली स्पीकिंग कार्यक्रमासाठी दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. Frankly Speaking with HM Amit Shah Full Exclusive Interview 

सध्या कोरोनाची लाट ही फक्त भारतातच आहे असं नाही. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारची लाट अमेरिका, इंग्लंड, इटली या देशांमध्ये येऊन गेली आहे. भारतात ही लाट थोडी उशिरा आली आहे. पण कोरोना संकट नियंत्रणात आणणे याला केंद्र सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार ही परिस्थिती गंभीरपणे हाताळत आहे; असे अमित शहा म्हणाले.

नव्या लाटेत कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. पण हा कोरोना आधीच्या तुलनेत कमी घातक आहे. काही राज्यांमध्ये साठ्याच्या उपलब्धतेअभावी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पुढाकार घेऊन आवश्यक ते धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. ज्या राज्यांनी संभाव्य संकटाचा विचार करुन ऑक्सिजनचा पुरेसा साठा केला त्यांना राज्यातील कोरोना संकट हाताळण्यासाठी विशेष त्रास होताना दिसत नाही. पण इतर राज्यांना त्रास होत आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र सरकार राज्यांना मदत करत आहे. रेमेडिसविर इंजेक्शनचा तुटवडा भासू नये म्हणून सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला आहे; असे अमित शहा यांनी सांगितले.

निर्माता कंपन्यांशी चर्चा करुन रेमेडिसविर इंजेक्शनची निर्मिती आणि पुरवठा यात वाढ व्हावी यासाठी नियोजन केल्याची माहिती अमित शहा यांनी दिली. मे महिन्यापासून भारतात रशियाची स्पुटनिक ही कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होईल. यामुळे देशाच्या लसीकरण कार्यक्रमाला आणखी गती मिळेल, असे अमित शहा म्हणाले. 

निवडणुकांचे नियोजन ही एक घटनात्मक प्रक्रिया आहे. घटनेच्या चौकटीत राहून निवडणूक आयोग निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करतो. राजकीय पक्ष निवडणूक लढवतात. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजप २०० पेक्षा जास्त जागा जिंकेल आणि सरकार स्थापन करेल, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला. 

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची कोणी गंभीर दखल घेत नाही. मी पर्यटक राजकारणी नाही; असे अमित शहा म्हणाले. 'जय श्रीराम' ही घोषणा पश्चिम बंगालमध्ये नागरिक देत आहेत. यामागचा त्यांचा विचार तेच योग्य प्रकारे सांगू शकतील. त्यांच्या मनातील भावना या घोषणेतून प्रकट होत असल्याचे अमित शहा म्हणाले. जय श्रीराम म्हणजे विकास, जय श्रीराम म्हणजे अन्यायाविरोधात लढा असे अमित शहा यांनी सांगितले. 

दरवर्षी सहा हजार रुपयांप्रमाणे तीन वर्षात देशातील शेतकऱ्यांना मोदी सरकारने १८ हजार रुपये थेट बँक खात्यात दिले. पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकारच्या योजना लागू केल्या नसल्यामुळे हा निधी तिथल्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही. पण आमचे सरकार आले तर पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकारच्या योजना लागू केल्या जातील. शेतकऱ्यांना आधीच्या तीन वर्षांचे अठरा हजार रुपये दिले जातील. तसेच पुढे दरवर्षी सहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतील; असे अमित शहा म्हणाले. अनेक राज्यांनी शेतकऱ्यांसाठी राज्याच्या योजनांसोबतच केंद्राची योजनाही लागू केली असल्याची माहिती अमित शहा यांनी दिली. 

पहिल्यांदा कोरोना संकट आले त्यावेळी देशात पुरेशी तयारी नव्हती. याच कारणामुळे केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. आता मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा निर्माण केल्या आहेत. आणखी तयार होत आहेत. मागील तीन महिन्यांपासून लॉकडाऊन आणि निर्बंध यांच्याशी संबंधित निर्णयांचे अधिकार राज्यांना दिले आहेत. आता प्रत्येक राज्यातील सरकारने तिथल्या परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घ्यावा; असे अमित शहा यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी