GRP जवानांची पत्रकाराला बेदम मारहाण, घटना कॅमेऱ्यात कैद

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 12, 2019 | 10:34 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Journalist Beaten by GRP: वृत्तांकनासाठी गेलेल्या एका पत्रकाराला जीआरपी जवानांनी मारहाण केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे.

grp official beaten journalist in up
GRP जवानांची पत्रकाराला बेदम मारहाण, घटना कॅमेऱ्यात कैद 

नवी दिल्ली: पोलिसांनी ज्या ठिकाणी कारवाई करायला हवी त्या ठिकाणी गप्प बसतात असं का होतं? तसेच जर कुणी जाब विचारायला गेलं तर त्यालाही त्याचे परिणाम भोगावे लागतात असाच काहीसा प्रकार आता समोर आला आहे. झालं असं की, उत्तरप्रदेशातील शामली येथे एका मालगाडीचे दोन डबे रूळावरुन घसरले. या घटनेचं वृत्तांकन करण्यासाठी पत्रकार अमित शर्मा तेथे दाखल झाले. त्यानंतर त्यांनी या घटनास्थळाचे व्हिडिओ शूट करण्यास सुरूवात केली. मात्र, हे पाहून जीआरपी जवान संतापले आणि त्यांनी पत्रकार अमित शर्मा यांना मारहाण करण्यास सुरूवात केली.

जीआरपीच्या जवानांनी अमित शर्मा यांना मारहाण केली. आरोपी जवान ज्या प्रकारे अमित यांना मारहाण करत आहेत ते पाहून असं वाटतं की ते एखाद्या गंभीर गुन्हा केलेल्या आरोपीला मारहाण करत आहेत. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटने प्रकरणी रेल्वे प्रशासनाने कारवाई करत तात्काळ तिघांना निलंबित केलं आहे. यामध्ये जीआरपीचे पोलीस निरीक्षक राकेश कुमार, स्टेशन हाऊस ऑफिसर आणि कॉन्स्टेबल सुनील कुमार यांचा समावेश आहे. तसेच या प्रकरणी जीआरपीच्या एसपींनी चौकशी करुन २४ तासांत अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले आहेत.

पीडित पत्रकार अमित शर्मा यांनी सांगितले की, जीआरपीचे जवान हे सिविल ड्रेसमध्ये होते. त्यांनी माझ्या कॅमेऱ्यावर हल्ला केल्याने मी खाली पडलो. जेव्हा उभा राहिलो तेव्हा पुन्हा एकदा मला धक्का दिला आणि शिविगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर मला मारहाण करण्यास सुरूवात केली. इतकचं नाही तर लॉकअपमध्ये बंद करुन नग्न केलं आणि घृणास्पद असं कृत्यही केलं. 

 

 

 

 

पत्रकार अमित शर्मा हे पोलिसांना आपली चूक काय आहे हे विचारत होते. त्यावेळी व्हिडिओ बनवण्याची हिंमत का केली त्या व्यतिरिक्त पोलिसांकडून दुसरं कुठलंही ठोस कारण अमित शर्मा यांना मिळालं नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी