मानवी बॉम्ब बनण्यासाठी आलेल्या दहशतवाद्यांना अटक

लोकल ते ग्लोबल
Updated Jul 11, 2021 | 19:52 IST

उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊमध्ये अलकायदाच्या २ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. हे दहशतवादी मानवी बॉम्ब बनून भाजपच्या बड्या नेत्यांना ठार मारण्यासाठी आले होते.

थोडं पण कामाचं

  • मानवी बॉम्ब बनण्यासाठी आलेल्या दहशतवाद्यांना अटक
  • दहशतवादी मानवी बॉम्ब बनून भाजपच्या बड्या नेत्यांना ठार मारण्यासाठी आले होते
  • दोन प्रेशर कूकर बॉम्ब, एक अर्धवट तयार केलेला टाइम बॉम्ब, सुमारे सात किलो स्फोटके, डिटोनेटर, कागदपत्रे आणि मोबाइल जप्त

लखनऊ: उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊमध्ये अलकायदाच्या २ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. हे दहशतवादी मानवी बॉम्ब बनून भाजपच्या बड्या नेत्यांना ठार मारण्यासाठी आले होते. दहशतवादी ज्या घरात लपले होते, तिथून दोन प्रेशर कूकर बॉम्ब, एक अर्धवट तयार केलेला टाइम बॉम्ब, सुमारे सात किलो स्फोटके, डिटोनेटर, कागदपत्रे आणि मोबाइल हे साहित्य पण जप्त करण्यात आले. अलकायदासाठी काम करणाऱ्या अंसार गजवत-उल-हिंदचे सदस्य असलेल्या मसीरुद्दीन आणि मिन्हाज या दोघांना अटक केल्याचे यूपी पोलीस दलाचे एडीजी (लॉ अँड ऑर्डर) प्रशांत कुमार यांनी सांगितले. ‘Had planned serial blasts in Lucknow using human bombs’: UP ADG on arrest of 2 Al Qaeda terrorists

गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीआधारे यूपी एटीएसने कमांडो पथक आणि पोलिसांचा मोठा फौजफौटा घेऊन घराला घेराव घातला. आसपासच्या घरांतील नगरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. परिसरातील वाहतूक थांबवण्यात आली आणि पुरेशी खबरदारी घेऊन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. लखनऊच्या काकोरीतील दुबग्गा चौराहा (चौक) या परिसरातून अटकेची कारवाई करण्यात आली. याच परिसरात साधारण दोन वर्षांपूर्वी सैफुल्लाचा एन्काउंटर झाला होता. 

अलकायदा ही १९८० मध्ये स्थापन झालेली एक सुन्नी कट्टर दहशतवादी संघटना आहे. हिंसेच्या जोरावर दहशत निर्माण करणे हे त्यांचे धोरण आहे. संघटनेच्या यूपी मॉड्युल्डला उमर हलमंडी पाकिस्तानमधून नियंत्रित करत आहे. हलमंडीच्या आदेशावरुन लखनऊमध्ये अलकायदासाठी काम करणाऱ्या अंसार गजवत-उल-हिंदची स्थापना करण्यात आली. अंसार गजवत-उल-हिंदचे सदस्य असलेल्या आणि भारतात घातपात करण्यासाठी सज्ज होत असलेल्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. दहशतवाद्यांकडे सापडलेल्या साहित्याची फॉरेन्सिक तज्ज्ञ तपासणी करत आहेत. दहशतवाद्यांविरोधात वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतर दहशतवाद्यांना कोर्टात सादर करुन त्यांचा चौकशीसाठी रिमांड (पोलीस कोठडी) घेतला जाणार आहे. 

स्वातंत्र्यदिनी लखनऊमध्ये मोठ्या प्रमाणावर घातपात करण्याची योजना होती. यासाठी काही महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्ब लावले जाणार होते. तसेच बड्या नेत्यांना मानवी बॉम्बद्वारे ठार करण्याचा कट तयार होत होता. पण दहशतवाद्यांना अटक झाल्यामुळे पुढचा घातपात टळला आहे. खबरदारीचे उपाय म्हणून पोलीस संशयास्पद ठिकाणी छापे टाकून तपास करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी