Hathras gang rape: निर्भया प्रकरणाची आठवण करून देतो हाथरस बलात्कार

लोकल ते ग्लोबल
Updated Sep 30, 2020 | 16:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

पीडित कुटुंबाने पोलिसांवर वेळेवर कारवाई न केल्याचा आरोप केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की पीडितेच्या शरीरातील हाडे मोडल्याने तिला श्वास घ्यायला त्रास होत होता आणि तिला सुरुवातीपासून प्राणवायू पुरवठ्याची गरज होती.

Hathras gang rape case
Hathras gang rape: निर्भया प्रकरणाची आठवण करून देतो हाथरस बलात्कार  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • हाथरसमध्ये १४ सप्टेंबर रोजी १९ वर्षीय युवतीचा चार युवकांनी केला होता सामूहिक बलात्कार
  • गंभीर अवस्थेत युवतीला आधी अलीगढच्या रुग्णालयात, नंतर दिल्लीला हलवण्यात आले
  • युवतीच्या मृत्यूनंतर लोकांमध्ये संताप, सोशल मीडियावर उठली न्याय देण्याची मागणी

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हाथरस जिल्ह्यात (Hathras district) एका दलित युवतीवर चार युवकांनी सामूहिक बलात्कार (gang rape) आणि त्यानंतर हत्या (murder) केल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या युवतीची जी अवस्था आरोपींनी केली आहे ती पाहता २०१२च्या निर्भया बलात्कार प्रकरणाची (Nirbhaya gang rape case) आठवण अनेकांना येत आहे. या १९ वर्षीय युवतीचा मंगळवारी सकाळी दिल्लीच्या रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट पाहायला मिळत आहे. निर्भयाची आई आशादेवी यांनी म्हटले आहे की महिलांविरोधातील अपराधांच्या घटनांमध्ये काहीही कपात झालेली नाही आणि परिस्थिती २०१२सारखीच आहे. हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेला न्याय देण्याची मागणी लोक करत आहेत. राजकारण ते बॉलिवुड अशा सर्वच क्षेत्रांमधून लोकांनी तत्काळ न्याय देण्याची मागणी केली आहे.

१४ सप्टेंबर रोजी केला होता सामूहिक बलात्कार

पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे की त्यांच्या मुलीचा बलात्कार १४ सप्टेंबर रोजी झाला. त्यांच्या म्हणण्यानुसार ही युवती आपल्या कुटुंबासोबत चारा कापण्यासाठी शेतात गेली होती. काही वेळानंतर तिचा भाऊ शेतातून परतला पण ही युवती आईसोबत तिच्यापासून काही अंतरावर शेतातच होती. काही वेळाने तिच्या आईला जाणवले की ती शेतात नाही. आईने तिचा शोध घेण्यास सुरुवात केली तेव्हा ती दुसऱ्या शेतात बेशुद्धावस्थेत आढळली. कुटुंबाने याप्रकरणी गावातील चार युवकांवर आरोप लावला आहे. त्यांचा आरोप आहे की या चार ते पाच लोकांनी पीडितेवर मागून हल्ला केला आणि ओढणीने खेचून तिला बाजरीच्या शेतात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेत युवतीचा गळा गंभीररित्या जखमी झाला.

पोलिसांच्या भूमिकेवर कुटुंबाने उपस्थित केले प्रश्न

पीडितेच्या कुटुंबियांनी पोलिसांवर वेळेवर कारवाई न करण्याचा आरोप केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की पीडितेच्या शरीरातील हाडे मोडल्याने तिला श्वास घ्यायला त्रास होत होता आणि तिला सुरुवातीपासूनच प्राणवायू पुरवठ्याची गरज होती. त्यांनी असाही आरोप केला आहे की घटनेला चार-पाच दिवस उलटून गेल्यानंतर पोलिसांना जाग आली. पण पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत आणि म्हटले आहे की या घटनेनंतर लगेचच ते कामाला लागले होते. त्यांनी सांगितले आहे की संशयित संदीप रामू, लवकुश आणि रवी यांना त्यांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी बलात्काराचे आरोप फेटाळले

यादरम्यान हाथरस पोलिसांनी युवतीवर बलात्कार झाल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. हाथरसचे पोलीस अधिक्षक विक्रांत वीर यांनी म्हटले आहे की युवतीचा बलात्कार झाल्याची पुष्टी हाथरस किंवा अलीगढच्या डॉक्टरांनी केलेली नाही. त्यांनी असेही म्हटले आहे की फॉरेन्सिक टीमच्या सहाय्याने डॉक्टर या आरोपाचा तपास करतील. पोलिसांनी या युवतीची जीभ कापली गेल्याचे वृत्तही फेटाळले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे, ‘अशा बातम्या येत आहेत की या युवतीच्या पाठीचा कणा मोडलेला होता. हे चुकीचे आहे. या युवतीची हत्या गळा दाबून करण्यात आली आणि यादरम्यान तिच्या गळ्याची हाडे गंभीररित्या जखमी झाली. यामुळे युवतीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.’

आधी अलिगढमध्ये दाखल केले गेले

घटनेनंतर आधी युवतीला अलीगढच्या जेएन मेडिकल कॉलेज आणि इस्पितळात दाखल करण्यात आले होते. इथे डॉक्टरांनी तिची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले होते. कुटुंबाचे म्हणणे आहे की तिची अवस्था पाहता त्यांनी पोलिसांना तिला एम्समध्ये हलवण्यास सांगितले होते, पण पोलिसांनी तिला दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात नेले. कुटुंबाचा आरोप आहे की पोलिसांनी याप्रकरणी त्वरित कार्य केले नाही.

राजकारणात खळबळ

हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर उत्तर प्रदेशाच्या राजकारणात मोठीच खळबळ माजली आहे. राज्यातील योगी सरकार कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवरून विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आले आहे. या घटनेतील पीडिता दलित कुटुंबातील आहे तर आरोपी उच्च जातीतील असल्याचे सांगितले जात आहे. युवतीच्या मृत्यूनंतर भीमसेनेचे प्रमुख चंद्रशेखर रावण यांनी आपल्या समर्थकांसह दिल्लीच्या सफदरजंग इस्पितळाबाहेर आंदोलन केले आणि पीडितेच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली. या घटनेनंतर काँग्रेस, बसपा आणि सपाने योगी सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.

२०१२मध्ये दिल्लीत पॅरा-मेडिकलच्या विद्यार्थिनीवर केला होता बलात्कार

दिल्लीमध्ये २०१२च्या डिसेंबर महिन्यात पॅरा-मेडिकलच्या विद्यार्थिनीवर चालत्या बसमध्ये पाच लोकांनी बलात्कार केला होता. या आरोपींनी या युवतीवर अनन्वित अत्याचार केले. गंभीररित्या जखमी झालेल्या या युवतीला उपचारांसाठी परदेशी पाठवण्यात आले. सामूहिक बलात्काराच्या या घटनेने देशात खळबळ उडवली होती. संतप्त जनतेने युवतीला न्याय मिळवून देण्यासाठी देशभरात आंदोलने केली होती. यापैकी एका आरोपीने कारागृहात आत्महत्या केली होती तर चार जणांना फाशी देण्यात आली होती. या आरोपींपैकी अल्पवयीन असलेला आरोपी आपली शिक्षा पूर्ण करून सुटला आहे.

डिस्क्लेमर: या प्रस्तुत लेखातील विचार लेखकाचे खासगी आहेत आणि टाइम्स नेटवर्क या विचारांशी सहमत असेलच असे नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी