'असा' झाला हैदराबाद एन्काउंटर, पोलिसांनी केला खुलासा

Hyderabad Encounter: हैदराबाद येथे झालेल्या एन्काउंटर प्रकरणावर तेलंगणा पोलिसांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली आहे. पाहूयात पोलिसांनी नेमकं काय म्हटलं आहे.

hyderabad encounter rape murder case telangana police media briefs crime news marathi
'असा' झाला हैदराबाद एन्काउंटर, पोलिसांनी केला खुलासा 

थोडं पण कामाचं

 • तेलंगणा पोलिसांनी हैदराबाद एन्काउंटर प्रकरणाची दिली सविस्तर माहिती
 • आरोपींनी पोलिसांची पिस्तुल घेऊन पळून जाण्याचा केला प्रयत्न - पोलीस 
 • आरोपींना आत्मसमर्पण करण्यास सांगितलं मात्र, त्यांनी गोळ्या झाडण्यास सुरुवात केली - पोलीस 
 • एन्काउंटर दरम्यान दोन पोलीस कर्मचारी जखमी, एका पोलीस कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर 

हैदराबाद: तेलंगणा येथे महिला डॉक्टरवर बलात्कार करुन जाळणाऱ्या आरोपींना शुक्रवारी सकाळी पोलिसांनी चकमकीत कंठस्नान घातलं आहे. हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा एन्काउंटर झाल्यानंतर अनेकजण पोलिसांचं कौतुक करत आहेत तर काहीजण पोलिसांच्या कार्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. याच सर्व प्रश्नांची उत्तरे शुक्रवारी दुपारी पोलिसांनी एका पत्रकार परिषदेत दिली. पोलिसांनी एन्काउंटरचा संपूर्ण घटनाक्रम पत्रकार परिषदेत सांगितलाय. 

काय म्हटलंय पोलिसांनी?

 1. पोलिसांनी आरोपींना क्राईम सीनच्या रिक्रिएशनसाठी घटनास्थळी नेलं होतं. 
 2. घटनास्थळी नेलं त्यावेळी आरोपींनी पोलिसांची पिस्तुल घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आरोपींना आत्मसमर्पण करण्यास सांगितलं त्यावेळी आरोपीने पोलिसांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. स्वसंरक्षणासाठी आम्ही सुद्धा गोळीबार केला. 
 3. आरोपी आरिफकडे पिस्तुल होती. त्याने सर्वप्रथम गोळीबार करण्यास सुरुवात केली. या चकमकीत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
 4. हा एन्काउंटर सकाळी ५.४५ ते ६.१५ या दरम्यान झाला.
 5. आरोपींनी पोलिसांवर दगडफेकही केली. एका आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला, या गोळीबारात एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. 
 6. आरोपींच्या मृतदेहाची डीएनए चाचणी केली जात आहे. त्यांचे मृतदेह नातेवाईकांना दिले जाणार आहेत. 
 7. आरोपींना घटनास्थळी नेलं जात असताना १० पोलिसांची एक टीम होती. 
 8. चारपैकी तीन आरोपींचं वय २० वर्षे तर एकाच वय २६ वर्षे होतं. 
 9. पोलिसांनी सांगितले की, या दरम्यान पीडित मुलीचा फोनही घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला आहे जो झाडा-झुडपात पडलेला होता. 
 10. आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांना उत्तरे देताना पोलीस आयुक्त व्हीसी सज्जनार यांनी सांगितले की, आम्ही सर्व आरोपांची उत्तरे देऊ. ही चकमक ५ ते १० मिनिटे चालू होती.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

तेलंगणामधील सायराबाद येथे आठवड्याभरापूर्वी एका डॉक्टर तरुणीवर चार तरुणांनी सामूहिक बलात्कार करुन नंतर तिला जाळलं. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटण्यास सुरुवात झाली. सर्वत्र आंदोलन, निदर्शने होत होती. पोलिसांवरही आरोपींना पकडण्यासाठी दबाव वाढत होता. यानंतर पोलिसांनी आपली सूत्रे हालवत २९ नोव्हेंबर रोजी चारही आरोपींना अटक केली.

यांतर ६ डिसेंबर रोजी पोलिसांची टीम सर्व आरोपींना घेऊन क्राईम सीन रिक्रिएशनसाठी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आरोपीने पोलिसांकडून बंदूक हिसकावली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी आरोपींना आत्मसमर्पण करण्यास सांगितले असता आरोपींनी दगडफेक आणि गोळीबार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात चारही आरोपींचा एन्काउंटर झाला. तर दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी