हैदराबाद एन्काउंटर प्रकरणावर सरन्यायाधीशांची पहिली प्रतिक्रिया

लोकल ते ग्लोबल
Updated Dec 07, 2019 | 17:37 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

CJI Sharad Bobde on Hyderabad encounter: देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी हैदराबाद एन्काउंटर प्रकरणार भाष्य केलं आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी नेमकं काय म्हटलं आहे हे पाहूयात...

hyderabad encounter telangana rape murder case accused killed cji sharad bobde jodhpur marathi news
हैदराबाद एन्काउंटर प्रकरणावर सरन्यायाधीशांची पहिली प्रतिक्रिया (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: Times Now

जयपूर: हैदराबाद येथे झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचं पोलिसांनी एन्काउंटर केला. हैदराबाद येथे झालेल्या एन्काउंटर प्रकरणावर सरन्यायाधीश शरद बोबडे यांची प्रतिक्रिया आली आहे. सरन्यायाधीश सरद बोबडे यांनी म्हटलं, न्याय कधीही तात्काळ आणि घाईत करण्यात येत नाही. बदल्याच्या भावनेने केलेला न्याय हा योग्य नाही. जोधपूर येथे राजस्थान उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात सरन्यायाधी शरद बोबडे बोलत होते.

राजस्थान उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन प्रकरणी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यासोबत कायदामंत्री रविशंकर प्रसाद हे सुद्धा उपस्थित होते. हैदराबाद इन्काउंटर प्रकरण घडल्यानंतर दुसऱ्या दिवशीच सरन्यायाधीश शरद बोबडे यांची प्रतिक्रिया आली आहे.

तेलंगणामधील सायराबाद येथील डॉक्टर तरुणीवर आठवड्याभरापूर्वी चार जणांनी सामूहिक बलात्कार केला आणि त्यानंतर तिला जाळून हत्या केली. या घटनेची पडसाद संपूर्ण देशात उमटले. आरोपींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी यासाठी पोलिसांवरही दबाव होता. पोलिसांनी कारवाई करत चार आरोपींना अटक केली. 

अटक करण्यात आलेल्या आरोपींना घेवून पोलिसांची एक टीम क्राईम सीन रिक्रिएशनसाठी घटनास्थळी पोहोचली. यावेळी आरोपीने पोलिसांची बंदूक हिसकावून घेतली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपींना आत्मसमर्पण करण्यास सांगितले मात्र, आरोपींनी पोलिसांवर दगडफेक आणि गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनीही स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला आणि यात चारही आरोपींचा मृत्यू झाला. तर या गोळीबारात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. 

हैदराबाद एन्काउंटरनंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या. अनेकांनी पोलिसांनी घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे तर काहींनी या एन्काउंटरवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी