मी चंदिगडमध्ये आहे - परमबीर सिंह

I Am In Chandigarh Says Parambir Singh मी चंदिगडमध्ये आहे आणि न्यायालयाने आदेश दिल्यास चौकशीला हजर राहणार आहे, असे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह म्हणाले.

I Am In Chandigarh Says Parambir Singh
मी चंदिगडमध्ये आहे - परमबीर सिंह  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • मी चंदिगडमध्ये आहे - परमबीर सिंह
  • न्यायालयाने आदेश दिल्यास चौकशीला हजर राहणार - परमबीर सिंह
  • महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात नव्हती केली 'कॅव्हेट'

I Am In Chandigarh Says Parambir Singh चंदिगड: मी चंदिगडमध्ये आहे आणि न्यायालयाने आदेश दिल्यास चौकशीला हजर राहणार आहे, असे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह म्हणाले. लवकरच मुंबईत येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. मुंबई पोलिसांनी परमबीर सिंह यांना पाच वेगवेगळ्या खंडणी वसुलीच्या प्रकरणांमध्ये आरोपी केले आहे. मुंबईच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांच्या अर्जाआधारे परमबीर सिंह यांना १७ नोव्हेंबर २०२१ रोजी फरार जाहीर केले आहे. फरार जाहीर केल्यापासून ३० दिवसांच्या आत परमबीर न्यायालयासमोर आले नाही तर त्यांची संपत्ती जप्त करण्याचे अधिकार राज्य शासनाला मिळणार आहेत. पण पुढील कारवाई होण्याआधीच परमबीर यांनी ते चंदिगडमध्ये असल्याचे जाहीर केले.

महाराष्ट्रात माझ्या जिवाला धोका आहे. यामुळेच मी लपून बसलो आहे. पण भारताबाहेर नाही. अटकेपासून संरक्षण दिले तर सर्वोच्च न्यायालयात हजर होईन, अशी ग्वाही मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी वकिलाच्या माध्यमातून दिली. सीबीआय किंवा अन्य कोणत्याही एजन्सीने तपास केला तरी चालेल मी त्यांना सहकार्य करेन; असेही परमबीर यांनी वकिलाच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. परमबीर यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात स्वतःची बाजू वकिलाच्या माध्यमातून मांडली. सर्वोच्च न्यायालयाने परमबीर यांना अटकेपासून तात्पुरते संरक्षण दिले असून हजर होण्याचे आणि तपासाला सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने परमबीर प्रकरणात पुढील सुनावणी ६ डिसेंबर २०२१ रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर एका पत्रकाराशी संपर्क साधून आपण चंदिगडमध्ये असल्याचे परमबीर सिंह यांनी जाहीर केले. तसेच चौकशीला हजर राहणार असल्याचे आणि लवकरच मुंबईत येणार असल्याचे संकेत दिले.

महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात नव्हती केली 'कॅव्हेट'

परमबीर प्रकरणात महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात 'कॅव्हेट' दाखल केलेली नाही. विशेष म्हणजे मुंबई पोलिसांच्या पाच वेगवेगळ्या खंडणी वसुलीच्या प्रकरणांमध्ये आरोपी असलेल्या परमबीर यांना राज्य शासनाने अद्याप निलंबित केलेले नाही. यामुळे परमबीर यांनी स्वतःची बाजू वकिलामार्फत मांडली त्यावेळी राज्य शासनाचे म्हणणे जाणून घेण्याचा पर्याय उपलब्ध नव्हता. या तांत्रिक बाबींचा सर्वाधिक फायदा परमबीर यांना झाला. त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून संरक्षण मिळाले. आता परमबीर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी ६ डिसेंबर २०२१ रोजी होईल. ही सुनावणी संपून पुढील आदेश येईपर्यंत परमबीर यांना अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी