Imran Khan rips into Pakistan govt after hike in petroleum products, praises India : इस्लामाबाद : आर्थिक अडचणींमध्ये सापडलेल्या पाकिस्तानमध्ये पेट्रोल डिझेल प्रति लिटर ३० रुपयांनी महागले. आता पाकिस्तानमध्ये एक लिटर पेट्रोल १७९ रुपये ८५ पैसे तर एक लिटर डिझेल १७४ रुपये १५ पैसे या दराने उपलब्ध आहे. पाकिस्तानमध्ये एक लिटर केरोसिन अर्थात रॉकेल (घासलेट) १५५ रुपये ९५ पैसे या दराने उपलब्ध आहे. पेट्रोलियम उत्पादनांच्या वाढलेल्या किंमतींच्या मुद्यावरून माजी पंतप्रधान इमरान खान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरिफ यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच पेट्रोल आणि डिझेल वरील कर कमी करून दर नियंत्रणात ठेवणाऱ्या भारत सरकारचे जाहीर कौतुक केले.
तहरिक ए इन्साफ पक्षाच्या प्रयत्नांमुळे रशियासोबत करार झाला असता तर इंधन ३० टक्के स्वस्त होणार होते. पण शहबाज शरिफ यांच्या सरकारने आमच्या प्रयत्नांना उधळून लावले; असे माजी पंतप्रधान इमरान खान यांनी सांगितले. भारताने मात्र एकाचवेळी अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांसोबतच्या मैत्रीमध्ये संतुलन राखून जास्तीत जास्त वाजवी दरात इंधन आयात करण्याला प्राधान्य दिले. भारतात दर नियंत्रणात असल्याचे माजी पंतप्रधान इमरान खान म्हणाले.
पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाचवेळी पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमती सरसकट वाढविण्यात आल्या. प्रति लिटर ३० रुपये एवढी मोठी वाढ करण्यात आली. या वाढीव रकमेतून सरकार त्यांच्या विदेशातील वरिष्ठांना आयातीची किंमत मोजणार आहे.
पाकिस्तान सरकारने मात्र दरवाढीचे समर्थन केले आहे. दरवाढ केली तरी एक लिटर डिझेलमागे ५६ पैशांचा अतिरिक्त भार आजही सरकार सोसत आहे. दरवाढ केली नसती तर पाकिस्तान आर्थिक संकटात सापडण्याचा धोका होता, अशा स्वरुपाचा दावा पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ता इस्माइल यांनी केला.