India-China: १६ तास चाललेल्या भारत-चीन बैठकीत 'या' भागातून सैन्य मागे घेण्यावर झाली चर्चा

India-China talks: पूर्व लडाखमधील हॉट स्प्रिंग्स, गोगरा आणि देपसांग सारख्या क्षेत्रातून सैन्य मागे घेण्याच्या मुद्द्यावर भारत-चीन यांच्यातील कमांडर स्तरावरील १०व्या फेरीतील चर्चा पार पडली. 

India-China talks
India-China: १६ तास चाललेल्या भारत-चीन बैठकीत 'या' भागातून सैन्य मागे घेण्यावर झाली चर्चा  |  फोटो सौजन्य: AP

नवी दिल्ली : भारत (India) आणि चीन (China) यांच्यात शनिवारी (२० फेब्रुवारी २०२१) पुन्हा एकदा सैन्य वार्ता झाली. या चर्चेत पूर्व लडाखमधील हॉट स्प्रिंग्स, गोगरा आणि देपसांग सारख्या क्षेत्रातून सैन्य मागे घेण्याच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. कमांडर स्तरावरील १०व्या फेरीतील ही चर्चा शनिवारी सकाळी सुरू झाली होती आणि रविवारी रात्री जवळपास २ वाजता ही बैठक संपली. जवळपास १६ तास ही बैठक झाली.

भारत - चीन यांच्यात सीमेवर १५ जून रोजी झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. तब्बल ९ महिन्यांनंतर दोन्ही देशांत झालेल्या चर्चेनंतर दोघांनीही पँगाँग तलावाच्या उत्तर आणि दक्षिणेकडील भागातून आपले सैन्य, इतर लष्करी उपकरण, बंकर हटवण्याबाबत सहमती झाली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारत-चीन सैन्य दलातील कमांडर स्तरावरील १०व्या फेरीतील चर्चेचा मुख्य मुद्दा म्हणजे इतर तणावपूर्ण क्षेत्रातूनही सैन्य मागे घेण्याबाबत चर्चा झाली.

दोन्ही देशांतील १०व्या फेरीतील चर्चेत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेत्रृत्व लेह येथील १४व्या कोअर कमांडरचे लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन यांनी केले. तर चीनकडून मेजर जनरल लियू लिन यांनी बाजू मांडली. मेजर जनरल लियू लिन हे चीनच्या दक्षिण शिनजियांग सैन्य जिल्ह्याचे कमांडर आहेत. 

भारत-चीन सैन्य दलातील ९व्या स्तरावरील चर्चेच्या फेरीत भारताने पँगाँग लेक येथील उत्तर भागातील फिंगर ४ ते फिंगर ८ पर्यंतच्या क्षेत्रातून चीनी सैनिकांनी माघार घेण्यावर जोर दिला होता. तर चीनने पँगाँग लेकच्या दक्षिणेकडील भागातील क्षेत्रातून भारतीय सैन्याने माघार घेण्याची मागणी केली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी