चिनी सैन्याने घेतली माघार पण...

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 10, 2020 | 02:39 IST | टाइम्स नाऊ मराठी

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ लष्करी हालचाली वाढवून तणाव निर्माण करणाऱ्या चीनने माघार घेण्यास सुरुवात केली आहे.

india china
भारत-चीन 

थोडं पण कामाचं

  • चीनच्या माघारीच्या प्रक्रियेला सुरुवात
  • गलवानच्या पेट्रोलिंग पॉइंट १४, १५, १७ वरुन माघारीला सुरुवात
  • फिंगर पॉइंट परिसरातूनही माघार सुरू

नवी दिल्ली: प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ लष्करी हालचाली वाढवून तणाव निर्माण करणाऱ्या चीनने माघार घेण्यास सुरुवात केली आहे. लेफ्टनंट जनरल दर्जाच्या बैठकीचा मर्यादीत स्वरुपात चांगला परिणाम झाल्याचे दिसत आहे. चीनच्या कृतीला भारताने सावध पण सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अद्याप काही ठिकाणी चिनी सैन्य भारताच्या अपेक्षेएवढे माघारी गेलेले नाही. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये लवकरच पुन्हा एकदा लष्करी अधिकाऱ्यांच्या पातळीवर बैठक होणार आहे. या बैठकीची तयारी सुरू झाली आहे. 

भारत आणि चीनच्या लेफ्टनंट दर्जाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी ६ जून रोजी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून २० किमी अंतरावर मोल्डो या ठिकाणी चर्चा केली होती. भारताकडून चर्चेचे नेतृत्व चौदाव्या कोअरचे जनरल ऑफिसर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंह यांनी केले. चीनकडून चर्चेचे नेतृत्व पीपल्स लिबरेशन आर्मीच्या वेस्टर्न थिएटर कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल शू किलिंग यांनी केले. चर्चा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी त्यांची नियुक्ती झाली होती.

चीनच्या माघारीच्या प्रक्रियेला सुरुवात

लेफ्टनंट दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर चीनने काही भागांमधून माघार घेतली आहे. गलवान येथे पेट्रोलिंग पॉइंट १४, १५ (११४ ब्रिगेड एरिया) आणि १७ (हॉट स्प्रिंग) या ठिकाणी तसेच फिंगर पॉइंट या ठिकाणी दोन्ही देशांमध्ये अद्याप मतभेद आहेत. हे मतभेद असले तरी गलवानमधून २० लॉऱ्या भरुन चिनी लष्कराचे सामान मागे हटवण्यात आले आहे. फिंगर पॉइंट भागातूनही चिनी सैनिकांनी मोठ्या प्रमाणात माघार घेतल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी १-२ किलोमीटर तर काही ठिकाणी अडीच किलोमीटर मागे चिनी सैनिक गेले आहेत. त्यांनी मोर्चेबांधणीसाठी केलेले बांधकाम पाडून टाकले आहे. पण अद्याप ज्या भागांमधून चिनी सैनिक मागे गेलेले नाही तसेच ज्या भागांतून पूर्ण माघारीची अपेक्षा आहे अशा काही भागांवरुन मतभेदांची स्थिती कायम आहे. 

...म्हणून वाढला तणाव

चीनने लडाखमध्ये दौलत बेग ओल्डी ते चुशुल या पट्ट्यात १० हजारांपेक्षा जास्त जवान, लांब पल्ल्याच्या तोफा, रणगाडे नियुक्त केले होते. एवढ्या मोठ्या संख्येने चिनी सैन्य आल्यामुळे तणाव वाढला होता. रणगाड्यांच्या दोन रेजिमेंट आणि तेवढ्याच तोफा या पट्ट्यात चीनने आणल्या होत्या. चीनचे १०० रणगाडे तर अनेक ग्रामस्थांनी साध्या डोळ्यांनी बघितले होते. चिनी रणगाडे बघितल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र भारत समर्थपणे परिस्थिती हाताळत असल्याचे बघून नागरिकांमधली अस्वस्थता दूर झाली. 

चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ रडार यंत्रणा नियुक्त केली. अवॅक्स कार्यरत झाले. चिनी लढाऊ विमानांची प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील उड्डाणे वाढली. चीनचे सैनिक फिंगर चार पर्यंत आले होते. तर भारताची भूमिका चिनी सैनिकांनी फिंगर आठच्या मागे चीनच्या हद्दीत जावे कारण तिथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आहे आणि तिथपर्यंतचा भूभाग भारताचा आहे, अशी आहे. यावरुन अद्याप मतभेद सुरू असले तरी चिनी सैन्याची माघार स्पष्टपणे दिसू लागली आहे.

'ते' बांधकाम पाडण्यासाठी चीनवर दबाव

चिनी सैन्याने दगडांच्या मदतीने अनेक आडोसे आणि बंकर बांधले आहेत. यातील काही बांधकाम पाडून चिनी सैनिक माघारी गेले आहेत. पण त्यांनी सर्व बांधकाम पाडून थेट स्वतःच्या हद्दीपर्यंत माघार घ्यावी, अशी भूमिका भारताने घेतली आहे. मतभेद दूर करण्यासाठी पुन्हा लष्करी अधिकाऱ्यांच्या  पातळीवर बैठक होण्याची शक्यता आहे. पण यावेळी बैठक नेमकी कधी होणार, कुठे होणार आणि कोणत्या दर्जाचे अधिकारी चर्चेत सहभागी होणार या बाबी अद्याप अधिकृतरित्या जाहीर झालेल्या नाही.

भारताच्या वेगवान हालचाली

पंतप्रधान मोदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे ही मुख्य टीम दररोज परिस्थितीचा आढावा घेत आहे. वेगवेगळ्या देशांशी चर्चा करुन चीनवर आंतरराष्ट्रीय पातळीवरुन दबाव आणला जात आहे. लडाखमध्ये चीनच्या  प्रत्येक सैनिकाच्या नजरेला नजर देत भारताचे सैनिक उभे आहेत. भारतानेही चीनवर दबाव टाकण्यासाठी लडाखमध्ये १० हजारांपेक्षा जास्त सैनिक आणि तोफदळ नियुक्त केले आहे. भारताची लढाऊ विमानं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या भागात मोठ्या प्रमाणावर टेहळणी करत आहेत. विमानांनी घेतेले फोटो, उपग्रहांनी काढलेले फोटो यांच्या मदतीने चीनच्या प्रत्येक लष्करी हालचालीचा आढावा घेण्याची व्यवस्था भारतात करण्यात आली आहे. चिनी हवाई हद्दीतल्या हालचाली टिपण्यासाठी रडार यंत्रणा काम करत आहे. 

चीनच्या अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने आणि प्रभावीरित्या भारताने भूभागाच्या  रक्षणासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. भारताच्या प्रयत्नांचा दबाव चीनला जाणवू लागला आहे. याच दबावामुळे चीनने थोडी माघार घेऊन सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अपेक्षित असलेली पूर्ण माघार होईपर्यंत चीनवरील दबाव कमी करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका भारताने घेतली आहे.  

अनेक दुर्गम भागांमध्ये भारताचे  सैनिक कायम कार्यरत नसतात. ते येऊन-जाऊन असतात. या व्यवस्थेचा स्वतःच्या सोयीने वापर करुन घेणाऱ्या चीनला त्यांच्या सैन्यासह पूर्ण माघार घेऊन स्वतःच्या हद्दीत परत निघून जाण्यास भारताने बजावले आहे. भारत ज्या बांधकामांना आक्षेप घेईल अशी बांधकामं पूर्णपणे नष्ट करुन चीनने तातडीने माघार घ्यावी, अशी स्पष्ट भूमिका भारताने घेतली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी