कॅमेऱ्याने रेकॉर्ड केले पाकिस्तानच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांचे 'उद्योग'

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 01, 2020 | 16:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

पाकिस्तानच्या भारतातील दूतावासाच्या आडून सुरू असलेल्या धक्कादायक उद्योगांचे व्हिडीओ फूटेज हाती आले आहे.

Pakistan High Commission
पाकिस्तानचा भारतातील दूतावास, नवी दिल्ली 

थोडं पण कामाचं

  • कॅमेऱ्याने रेकॉर्ड केले पाकिस्तानच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांचे 'उद्योग'
  • हेरगिरी प्रकरणी पाकिस्तानच्या दूतावासातील दोघांची हकालपट्टी
  • पाकिस्तानच्या हेरांना २४ तासांत भारत सोडण्याचे आदेश

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या भारतातील दूतावासाच्या आडून सुरू असलेल्या धक्कादायक उद्योगांचे व्हिडीओ फूटेज हाती आले आहे. हा व्हिडीओ बघताच केंद्र सरकारने दूतावासात काम करणाऱ्या पाकिस्तानच्या २ व्यक्तींना २४ तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. व्हिडीओद्वारे रंगेहात पकडलेल्या दोघांवर भारताने हेरगिरी करत असल्याचा आरोप केला आहे. 

पाकिस्तानच्या गुप्तहेरांचा 'उद्योग'

पाकिस्तान भारतातील संवेदनशील माहिती मिळवण्यासाठी हेरगिरी करत आहे. या हेरगिरीसाठी पाकिस्तानने दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या नावाखाली आयएसआयच्या दोन गुप्तहेरांनाच नियुक्त केले होते. हे कर्मचारी लष्करी अधिकारी, रेल्वे अधिकारी यांच्याशी संपर्क वाढवून त्यांच्यासोबत वारंवार पार्टी करायचे, त्यांना गप्पा मारण्यासाठी बोलवायचे. या निमित्ताने दोन्ही हेर भारतीय अधिकाऱ्यांच्या बोलण्याचे रेकॉर्डिंग करत होते. हेरांचे हे उद्योग भारतीय कॅमेऱ्यांमध्ये रेकॉर्ड झाले आणि पाकिस्तानची हेरगिरी उघड झाली. 

पाकिस्तानच्या दूतावासातून भारतविरोधी कारवाया

भारताने राजकीय हेतूने कारवाई केली असल्याचा आरोप पाकिस्तानने केला तर भारताने पाकिस्तानच्या हेरगिरीचा जाहीर निषेध केला. व्हिडीओ फूटेजमुळे पाकिस्तानने दूतावासाच्या नावाखाली भारतात हेरगिरीसाठी सुरक्षित यंत्रणा विकसित केल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. याआधीही पाकिस्तानच्या दूतावासासाठी काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी हेरगिरी प्रकरणात आढळले आहेत. 

पाकिस्तानच्या हेरांना भारत सोडण्याचे आदेश

दूतावासात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जगभर डिप्लोमॅटिक इम्युनिटी अर्थात विशेष राजकीय संरक्षण असते. या संरक्षणामुळे दूतावासाच्या कर्मचाऱ्यांना शिक्षा करता येत नाही. मात्र त्यांची एखाद्या देशातून हकालपट्टी शक्य असते. भारताने याच नियमाचा आधार घेत ठोस पुरावे हाती असल्यामुळे पाकिस्तानच्या दूतावासात काम करणाऱ्या २ जणांना भारत सोडण्याचा आदेश दिला आहे. याआधी २०१६मध्ये दिल्ली पोलिसांची क्राईम ब्रँच आणि मिलिटरी इंटेलिजन्स या  दोन विभागांनी संयुक्त कारवाई करुन पाकिस्तानच्या दूतावासाशी संबंधित व्यक्तीची हेरगिरी उघड  केली होती. 

भारताला आलेला हेरगिरीचा संशय

हेरगिरीच्या ताज्या प्रकरणात सापळा रचण्याची तयारी फेब्रुवारी महिन्यातच करण्यात आली होती. पाकिस्तानच्या दूतावासातील व्हिसा विभागात काम करणाऱ्या दोघाजणांविषयी भारताच्या सुरक्षा यंत्रणेला संशय आला होता. 

सापळा रचून पकडले पाकिस्तानचे गुप्तहेर

खात्री करुन घेण्यासाठी भारताच्या मिलिटरी इंटेलिजन्सच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. आबिद हुसेन आणि मुहम्मद ताहीर यांच्यापर्यंत बातमी पोहोचेल अशी व्यवस्था करण्यात आली. पैसे मिळाले तर भारताच्या संरक्षण क्षेत्राशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळेल, असा निरोप हुसेन आणि ताहीरपर्यंत पोहोचवण्यात आला. दोघांनी या बातमीवर विश्वास ठेवून माहितीसाठी पैसे खर्च करण्याची तयारी दाखवली. नंतर भारतीय एजंटने हुसेन आणि ताहीरला एका क्लबमध्ये बोलावले आणि माहिती देण्याची तयारी दाखवली. क्लबमध्ये संपूर्ण व्यवहाराचे हुशारीने शूटिंग करण्यात आले. याच व्हिडीओचा आधार घेत भारताने पाकिस्तानच्या दूतावासातील व्हिसा विभागात काम करणाऱ्या आबिद हुसेन आणि मुहम्मद ताहीर यांच्यावर पर्सोना नॉन ग्राटा (Persona non grata) अंतर्गत कारवाई सुरू केली आहे. दूतावासातील एखाद्या कर्मचाऱ्यावर पर्सोना नॉन ग्राटा हा ठपका ठेवण्यात आल्यास त्याला संबंधित देशात राहता येत नाही.

गुप्तहेरांच्या भारतात आणि नेपाळमध्ये भारतविरोधी कारवाया

पाकिस्तानच्या भारतातील दूतावासातून भारतविरोधी कारवाया मोठ्या प्रमाणावर सुरू असतात. नेपाळमध्ये भारतविरोधी कारवाया करण्यासाठीही पाकिस्तानच्या भारतातील दूतावासातून हालचाली होतात. याच कारणामुळे भारतीय गुप्तचर यंत्रणा पाकिस्तानच्या भारतामधील दूतावासातील प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवते.

पाकिस्तानच्या प्रतिसादाकडे लक्ष

साधारणपणे भारताने पाकिस्तानच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्यास पाकिस्तान काही दिवसांतच भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्यांवर तशाच स्वरुपाची कारवाई करताना आढळला आहे. पण भारत ठोस पुरावे सादर करत असला तरी पाकिस्तान पुरावे सादर करत असल्याचे यापूर्वी कधी आढळलेले नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी