[VIDEO]: पाकिस्तानने लाहोर-दिल्ली बस सेवा बंद केल्यानंतर भारताने घेतला 'हा' मोठा निर्णय

दिल्ली-लाहोर बस सेवा बंद करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. यापूर्वी पाकिस्तानने सुद्धा बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने घेतलेल्या निर्णयानंतर आता भारताने हा मोठा निर्णय घेतला आहे.

 A Lahore-Delhi bus enter in India at Attari-Wagah border (file photo)
लाहोर-दिल्ली बस सेवा (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: IANS

थोडं पण कामाचं

  • डीटीसीने दिल्ली-लाहोर बस सेवा बंद करण्याचा घेतला निर्णय
  • सोमवारी सकाळी दिल्लीहून लाहोरसाठी निघणार होती बस
  • पाकिस्तानने यापूर्वी बंद केली आहे बस सेवा

नवी दिल्ली: दिल्ली परिवहन निगम (डीटीसी) ने सोमवारी दिल्ली-लाहोर बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. डीटीसीने आजपासून म्हणजेच (१२ ऑगस्ट)पासून बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय भारत सरकारने घेतला आणि हा निर्णय घेतल्यापासून पाकिस्तान चांगलाच भांबावला आहे. त्यानंतर पाकिस्तानकडून शनिवारी लाहोर-दिल्ली बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात पाकिस्तान सरकारने डीटीसीला एक ईमेल पाठवून बस सेवा बंद करण्याची माहिती दिली होती.

सोमवारी दिल्ली-लाहोर बस सेवा 'सदा-ए-सरहद' सकाळी ६ वाजता दिल्लीहून लाहोरकडे रवाना होते. मात्र, पाकिस्तानद्वारे सद्भावना बस सेवा बंद करण्याच्या निर्णयानंतर आता भारताने सुद्धा पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं आहे. यापूर्वी शनिवारी सकाळी दिल्लीहून लाहोरसाठी सदा-ए-सरहद बस रवाना करण्यात आली होती. त्यावेळी या बसमध्ये एकूण २ प्रवासी होते तर लाहोरहून दिल्लीला परतत असताना या बसमध्ये एकूण १९ प्रवासी होते. 

२० वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली होती बस सेवा

दिल्ली-लाहोर बस सेवा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी १९९९ मध्ये सुरू केली होती. अटल बिहारी वाजपेयी हे पहिल्यांदा दिल्लीते वाघा बॉर्डर पर्यंतचा प्रवास करुन या बसमधून गेले होते. तेव्हापासून ही बस सेवा सलग सुरू आहे. मात्र, २००१ मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ही बस सेवा थांबवण्यात आली होती. मात्र, जुलै २००३ मध्ये ही बस सेवा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली होती.

पुलवामा हल्ल्यानंतर प्रवाशांच्या संख्येत कमी

फेब्रुवारी २०१९मध्ये पुलवामा परिसरात सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्लात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली होती. पुलवामा हल्ल्यानंतर या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत खूपच कमी झाल्याचं पहायला मिळत आहे.

समझौता एक्सप्रेस बंद

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला. यासोबतच जम्मू-काश्मी आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश करण्याचा निर्णयही भारताने घेतला. भारत सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर पाकिस्तान चांगलाच भांबावला आणि त्यानंतर पाकिस्तानने लाहोर-दिल्ली बस सेवा बंद केली तसेच समझौदा एक्सप्रेसही रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

दोन केंद्रशासित प्रदेश

भारत सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा तसेच दोन केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रस्ताव संसदेत मांडला. या प्रस्तावाला संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूरी मिळाली. तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुद्धा या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. या निर्णयामुळे आता जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश बनणार आहेत. ३१ ऑक्टोबरपासून हे दोन्ही केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात येतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...