Covid-19 vaccine: भारताचा मदतीचा हात, शेजारील 'या' सहा देशांना कोरोना लसींचा पुरवठा

Covid-19 vaccine: भारताने आपला शेजारधर्म पाळला असून शेजारील सहा देशांना कोरोना लसीचे डोस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे भारताच्या शेजारील मालदीव आणि भूटान यांना लसींच्या डोसची पहिली खेप पाठवण्यात आली आहे.

Covid 19 Vaccine updates
कोरोना लस  |  फोटो सौजन्य: PTI

नवी दिल्ली : भारताने (India) शेजारधर्म पाळत शेजारील देशांना कोरोना लसींचा पुरवठा (Corona Vaccination supply) करण्यास सुरुवात केली आहे. भूटान (Bhutan) आणि मालदीवला (Maldives) कोरोना लसींची (Corona vaccine) पहिली खेप सुद्धा भारताकडून पाठवण्यात आली आहे. एअर इंडियाच्या विमानातून ऑक्सफर्ड-अॅस्ट्राजेनेकाच्या कोरोना लसीचे एक लाख डोस मालदीव येथे पोहोचले आहेत. तर भूटानसाठी कोव्हिशिल्ड लसींचे दीड लाख डोसेस पाठवण्यात आले आहेत. भारत सरकारच्या या निर्णयाचे मालदीवचे माजी पंतप्रधान मोहम्मद नशीद यांनी कौतुक केले आहे.

मोहम्मद नशीद यांनी ट्विट करुन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारचे आभार मानले आहेत. त्यांनी म्हटलं, भारत सरकारने कोरोना लसींचे एक लाख डोस पाठवले आहेत. भयानक अशा विषाणूपासून मुक्त होण्याच्या दिशेने मालदीवची ही एक सुरुवात आहे. आपला विश्वासू मित्र असलेल्या भारताने १९८८ मध्ये लष्करी उठाव, त्सुनामी, जलसंकट आणि कोरोना विषाणूच्या संकटात सर्वप्रथम मदत केली आहे. 

तर, परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी ट्विट करुन म्हटलं, "भारताने शेजारील आणि सहकारी देशांना कोविड-१९ लसींचा पुरवठा सुरू केला आहे. पहिली खेप भूटानसाठी निघाली आणि मालदीवसाठीही कोरोना लसीची खेप निघाली आहे."

सहा देशांना लसींचा पुरवठा 

मंगळवारी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं होतं की, भारत आपल्या शेजारील भूटान, मालदीव, बांगलादेश, नेपाळ, म्यानमार, सेशेल्स यांना कोविड-१९ लसींचा पुरवठा करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं की, जागतिक समुदायाच्या आरोग्याच्या गरजा भागविण्यासाठी भारत विश्वासू सहकारी म्हणून मदत करत असल्याचा अभिमान वाटत आहे. बुधवारपासून लसींचा पुरवठा सुरू होईल आणि येत्या काही काळात आणखी लसींचा पुरवठा केला जाईल. सर्वात मोठ्या लस उत्पादक देशांपैकी भारत एक महत्वाचा देश आहे. कोरोना लस खरेदी करण्यासाठी भारतासोबत अनेक देशांनी संपर्क साधला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी