नवी दिल्ली : भारत (India) आणि चीन (China) यांच्यात सीमारेषेवर तणाव सुरू असतानाच एका चीनी सैनिकाने भारतीय हद्दीत प्रवेश केल्याचं समोर आलं आहे. या चीनी सैनिकाला भारतीय सैन्याने पकडले (Indian Army apprehended a Chinese soldier) आहे. लडाखमधील पँगाँग तलावाच्या परिसरात (Pangong Tso in Ladakh) त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. LAC (Line of Actual Control) ओलांडून भारतीय हद्दीत आलेल्या चीनच्या या सैनिकाची भारतीय सैन्याकडून चौकशी सुरू आहे. ही चौकशी झाल्यावर हा सैनिक चुकून भारतीय हद्दीत आल्याचं समोर आलं तर त्याला पुन्हा चीनच्या ताब्यात दिले जाईल.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ जानेवारी २०२१ रोजी एक चीनी सैनिक लडाख येथील LAC ओलांडून भारतीय हद्दीत आला होता. त्याला भारतीय सैन्याने पकडले असून त्याची चौकशी सुरू आहे. दरम्यान, चीनच्या सैन्यानुसार, हा सैनिक रस्ता भरकटला आणि चुकून भारतीय हद्दीत त्याने प्रवेश केला त्यानंतर भारतीय सैन्याने त्याला पकडले.
लडाखमधील भारताच्या हद्दीत १९ ऑक्टोबर रोजी एक चीनचा सैनिक शिरल्याचं समोर आलं होतं. यानंतर चीनच्या सैन्यानेही आपला एक सैनिक बेपत्ता असल्याचं भारतीय सैन्याला अधिकृतपणे कळवलं होतं. चीनचा सैनिक भारतीय हद्दीत आल्यावर भारतीय सैन्याने त्याची चौकशी केली होती.
गेल्यावर्षी एप्रिल महिन्यापासूनच भारत आणि चीन यांच्यात तणावपूर्ण वातावरण होतं. यानंतर १५ जून रोजी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC) गलवान खोऱ्यात भारत-चीन सैन्यात जोरदार संघर्ष झाला. यावेळी २० भारतीय जवान शहीद झाले होते तर चीनच्या सैन्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.