लडाखमध्ये पहिल्यांदाच दाखल झाले के ९ वज्र रणगाडे

चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील हालचालींना वेग आल्यामुळे पुन्हा एकदा तणाव वाढू लागला आहे. भारताने लडाखमध्ये पहिल्यांदाच के ९ वज्र रणगाडे सज्ज करायला सुरुवात केली आहे.

K9-Vajra self-propelled howitzer regiment in Ladakh sector along lac with China
लडाखमध्ये पहिल्यांदाच दाखल झाले के ९ वज्र रणगाडे 

थोडं पण कामाचं

  • लडाखमध्ये पहिल्यांदाच दाखल झाले के ९ वज्र रणगाडे
  • के ९ वज्र रणगाड्याची हॉवित्झर तोफ ५० किमी पर्यंत अचूक आणि भेदक हल्ला करण्यासाठी सक्षम
  • समुद्रसपाटीपासून उंचावर असलेल्या ठिकाणी प्रभावीरित्या काम करू शकते के ९ वज्र रणगाड्याची हॉवित्झर तोफ

लेह: चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (Line of Actual Control - LAC) हालचालींना वेग आल्यामुळे पुन्हा एकदा तणाव वाढू लागला आहे. भारताने लडाखमध्ये पहिल्यांदाच के ९ वज्र रणगाडे सज्ज करायला सुरुवात केली आहे. लवकरच स्वयंचलित के ९ वज्र हॉवित्झर तोफा असलेल्या रणगाड्यांची रेजिमेंट मोक्याच्या ठिकाणी नियुक्त केली जाणार असल्याचे वृत्त आहे. के ९ वज्र रणगाड्याची हॉवित्झर तोफ ५० किमी पर्यंत अचूक आणि भेदक हल्ला करण्यासाठी सक्षम आहे. या तोफा समुद्रसपाटीपासून उंचावर असलेल्या ठिकाणी प्रभावीरित्या काम करू शकतात. फिल्ड ट्रायल यशस्वी झाल्यामुळे भारतीय लष्कराने के ९ वज्रची रेजिमेंट मोक्याच्या ठिकाणी नियुक्त करण्याची तयारी सुरू केली आहे.

मागील सहा महिने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर किरकोळ घटना वगळता परिस्थिती शांत होती. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चेची तेरावी फेरी होणार आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यासाठी करायच्या उपायांवर चर्चा होणार आहे. पण ही चर्चा सुरू होण्याआधीच चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ मोठ्या प्रमाणावर कुमक तैनात केली आहे. चिनी सैन्याच्या हालचालींमुळे पुन्हा एकदा तणाव वाढू लागला आहे. 

भारताचे लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी चिनी हालचालींची दखल घेतली असल्याचे सांगितले. भारत आवश्यक त्या हालचाली करत आहे, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. 

याआधी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारत हळू हळू शस्त्र निर्मिती आणि निर्यातीचे प्रमाण वाढवत असल्याची माहिती दिली. मागच्या वर्षी गुजरातमध्ये हजीरा येथे एल अँड टी कंपनीच्या शअत्र निर्मिती विभागाने के ९ वज्र रणगाड्यासाठी हॉवित्झर तोफेची निर्मिती केली. या स्वदेशी हॉवित्झर तोफेच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. भारताच्या ताफ्यातील के ९ वज्र रणगाड्यांसाठी ७५ टक्के हॉवित्झर तोफांची निर्मिती देशांतर्गत झाली आहे. या प्रकल्पामुळे नव्याने ५० हजारांपेक्षा जास्त रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. यापैकी १२ हजार ५०० जणांना प्रत्यक्ष तर इतरांना अप्रत्यक्ष स्वरुपात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. भागीदारीत देशामध्ये लढाऊ विमान, हेलिकॉप्टर, पाणबुडी, रणगाडे, तोफा अशा वेगवेगळ्या शस्त्रांची निर्मिती करण्याची योजना आहे. यातील अनेक शस्त्र भारतीय सैन्य वापरेल तसेच भारताच्या मित्र देशांना या शस्त्रांची निर्यात करण्याचीही योजना आहे; असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी