वाझेंचा 'राजकीय साहेब' शोधणे आवश्यक; हिरेन हत्येचा तपास एनआयएने करावा - फडणवीस

लोकल ते ग्लोबल
Updated Mar 17, 2021 | 19:38 IST

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात एक पत्रकार परिषद घेतली.

थोडं पण कामाचं
 • दिल्लीतील भाजप मुख्यालयात देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद
 • मनसुख हिरेन हत्येचा तपास एनआयएने करावा - फडणवीस
 • वाझेंचा 'राजकीय साहेब' (पॉलिटिकल बॉस) शोधणे आवश्यक - देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली: सचिन वाझे आणि नुकतीच पोलीस आयुक्त पदावरुन बदली झालेले परमबीर सिंह ही छोटी माणसं आहेत. त्यांना हाताळणारे 'राजकीय साहेब' शोधणे आवश्यक आहे. वाझेंना ऑपरेट करणारा पॉलिटिकल बॉस शोधणे आवश्यक आहे; अशा स्वरुपाचे वक्तव्य महाराष्ट्राचे विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते दिल्लीतील भाजप मुख्यालयात एका पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ठेवलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आणि मनसुख हिरेन यांची हत्या या दोन्ही प्रकरणांमध्ये थेट संबंध आहे. यामुळे एनआयएनने या दोन्ही प्रकरणांचा तपास करणे आवश्यक आहे, असे फडणवीस म्हणाले. एरवी गाडीत स्फोटके आढळली तर स्थानिक पोलीस किंवा एटीएस यांच्याकडून तपास सुरू होतो आणि नंतर त्यात एनआयए येते. पण इथे ज्याने गाडी ठेवली त्याच्याच हाती तपासाचे काम देण्यात आले. हा प्रकार झाल्याचे उघड झाले. एनआयएने स्फोटकांचा तपास ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. आता मनसुख हिरेन प्रकरण याच घटनेशी संबंधित असल्यामुळे एनआयनेच मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास करावा, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मनसुख हिरेन यांच्यावर सचिन वाझे यांचा अप्रत्यक्ष दबाव होता. वाझेंच्या सांगण्यावरुनच हिरेन यांनी स्कॉर्पिओ गाडी आणून विशिष्ट ठिकाणी ठेवली. नंतर पुढे निघून गेले. वाझे यांच्याच सांगण्यावरुन दुसऱ्या दिवशी गाडीच्या चोरीची तक्रार नोंदवण्यासाठी हिरेन विक्रोळी पोलीस ठाण्यात गेले. तिथे तक्रार जास्त चौकशी न करता तातडीने नोंदवावी यासाठी थेट वाझे यांनीच फोन केला होता. यामुळे गाडीच्या चोरीची नोंद झाली. पुढे या प्रकरणात स्वतःची बाजू सुरक्षित करण्यासाठी वाझे यांनीच स्वतःच्या आणि इतर पोलिसांच्या नावाचा उल्लेख असलेले पत्र मुख्यमंत्र्यांना हिरेनकरवी लिहून पाठवले. या पत्रामुळे मनसुख हिरेन पोलीस चौकशीने त्रासल्याचे चित्र उभे करुन नंतर त्याला ठार करण्यात आले. गाडी प्रकरणात कोणाताही पुरावा राहू नये यासाठी त्याची हत्या करण्यात आली. पण मृतदेह पाण्यात टाकताना भरती-ओहोटीच्या वेळेबाबत गडबड झाली. प्रेत पाण्यात वाहून जाण्याऐवजी किनाऱ्याजवळ आढळले. हिरेन यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला नाही तर त्यांची हत्या करुन मृतदेह पाण्यात टाकण्यात आला; असे एकामागून एक आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सचिन वाझे हे त्यांच्या 'राजकीय साहेब' असलेल्या व्यक्तीच्या आदेशाने काम करत होते. तसे नसते तर त्यांना एकामागून एक एवढे गुन्हे करण्याची हिंमत झाली नसती; असाही आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. एका मोठ्या उद्योगपतीच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवून कोणाला तरी संदेश देण्याचा प्रयत्न सुरू होता. पण हा उद्योग करताना कोणताही पुरावा मागे राहू नये यासाठी प्रयत्न सुरू होते. पण मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचे लक्षात आले आणि सगळा प्रकार उघडकीस येण्यास सुरुवात झाल्याचे फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्रात गुन्हेगारीकरण वाढले होते. पण ९०च्या दशकात एन्काउंटर सुरू झाले. नंतर एन्काउंटर करणाऱ्यांनी खंडणी घेण्याचे प्रकारही घडले. यानंतर आता वाझेंच्या माध्यमातून पुन्हा एकदा राजकारणाचे गुन्हेगारीकरण सुरू झाले; असा आरोप फडणवीस यांनी केला.

सचिन वाझे हे एक निलंबित अधिकारी होते. मी मुख्यमंत्री असताना शिवसेनेने वाझेंना परत सेवेत आणण्याचे प्रयत्न केले होते. पण राज्याच्या वकिलाने (महाधिवक्ता) तोंडी सल्ला दिल्यानंतर मी वाझेंना परत घेण्याची मागणी फेटाळली. पण कोरोनाचे निमित्त करुन ठाकरे सरकारने वाझे यांना तातडीने परत सेवेत घेतले. या संदर्भातला निर्णय प्रचंड वेगाने झाला. एपीआय दर्जाचा अधिकारी असूनही मुंबईच्या क्राइम इंटेलिजन्स युनिटच्या प्रमुखपदी त्यांची नियुक्ती झाली. अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास जो पोलिसांच्या इतर विभागांनी करणे अपेक्षित आहे तो वाझे यांच्या नेतृत्वात सुरू होता; असे फडणवीस म्हणाले.

वाझे यांच्या कार्यकाळात बेटिंग प्रकरण, रॅपर बादशहा तसेच इतर अनेक प्रकरणांचा तपास वाझे यांच्याच नेतृत्वात झाला. या तपासाच्या नावाखाली नेमके काय सुरू होते त्याची माहिती आता उघड होऊ लागली आहे, असे फडणवीस म्हणाले. सचिन वाझे आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये व्यावसायिक लागेबांधे आहेत; असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

एका निलंबित पोलीस अधिकाऱ्याला पुन्हा सेवेत घेण्याचा आग्रह आणि एपीआय दर्जाचा अधिकारी असूनही त्याला अवास्तव महत्त्व आणि प्रचंड अधिकार देण्यामागचे कारण काय, असा सवाल फडणवीस यांनी केला. मी मुख्यमंत्री असताना एकदा उद्धव ठाकरेंनी फोन केला आणि शिवसेनेचे नेते वाझेंना पुन्हा सेवेत घेण्याचा आग्रह करण्यासाठी प्रत्यक्ष भेटले होते; असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

..........

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे... (LoP Shri Devendra Fadnavis interacting with media at BJP HQ, New Delhi on 17th March 2021 )

सचिन वाझे प्रकरणाचे पडसादMumbai CP: मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी

देवेंद्र फडणवीस LIVE

 1. महाराष्ट्रात कुशासन सुरू आहे
 2. महाराष्ट्राचे गृहमंत्रालय तीन जण मिळून चालवतात
 3. वाझेंचा 'राजकीय साहेब' (पॉलिटिकल बॉस) शोधणे आवश्यक
 4. सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांना हाताळणारी मोठी माणसं महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आहेत
 5. एनआयएने हिरेन हत्येचा तपास ताब्यात घ्यावा
 6. अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेली स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन हत्या या दोन्ही प्रकरणांचा एकमेकांशी संबंध
 7. मनसुख हिरेन प्रकरणात एटीएस योग्य प्रकारे तपास करताना दिसत नाही
 8. मनसुख हिरेन यांचा मृतदेह पाण्यात टाकण्यात आला पण भरती संदर्भातले अंदाज चुकले आणि मृतदेह वाहून गेला नाही आणि गुन्हा उघड झाला
 9. मनसुख हिरेन यांच्यावर दबाव टाकून त्यांचा वापर केला गेला आणि हेतू साध्य झाल्यानंतर पुरावा राहू नये म्हणून मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली
 10. सचिन वाझे यांनी सांगितल्यानंतर मनसुख हिरेन यांनी विशिष्ट ठिकाणी गाडी ठेवून दिली नंतर वाझेंच्या सांगण्यावरुनच गाडी चोरी झाल्याची तक्रार नोंदवली
 11. सचिन वाझे यांनी पोलीस दलात कार्यरत झाल्यापासून खंडणी वसुलीचे काम केले
 12. सचिन वाझे यांच्याकडे सर्व महत्त्वाच्या प्रकरणांच्या चौकशीची जबाबदारी देण्यात आली
 13. मुंबईच्या क्राइम इंटेलिजन्स युनिटच्या प्रमुखपदी पोलीस निरीक्षकाची नियुक्ती होते पण एपीआय असूनही सचिन वाझे यांची CIUच्या प्रमुखपदी नियुक्ती
 14. निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना परत सेवेत घेण्यासाठी शिवसेनेने कोरोना काळाचे निमित्त केले
 15. शिवसेनेने वाझेंना पुन्हा सेवेत आणण्यासाठी माझ्या सरकारच्या काळात प्रयत्न केले पण राज्याच्या वकिलाने (महाधिवक्ता) दिलेल्या सल्ल्यानंतर मी सेनेची मागणी फेटाळली होती
 16. सचिन वाझे आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये व्यावसायिक लागेबांधे 
 17. महाराष्ट्राच्या राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले आहे, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी