नवी दिल्ली : भारतीतील काही राज्यांत गेल्या काही दिवसांत कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने काळजी आणि खबरदारी घेण्याचे आवाहन करत नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या संदर्भात गृह मंत्रालयाने आदेश जारी केले आहेत. यानुसार नव्या मार्गदर्शक सूचना १ डिसेंबर २०२० पासून ३१ डिसेंबर २०२० पर्यंत लागू राहणार आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेली मार्गदर्शक तत्वांचे मुख्य लक्ष म्हणजे कोविड-१९चा वाढता प्रादुर्भाव रोखणे असा आहे.
काही राज्यांत / केंद्रशासित प्रदेशांमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. सणासुदीच्या काळात तसेच हिवाळ्यात कोरोनावर पूर्णपणे मात करण्यासाठी सावधगिरी बाळगणे आणि विशेष काळजी घेण्यावर जोर देण्याची आवश्यकता आहे. तसेच नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
गृह मंत्रालय आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना / एसओपीमध्ये कोरोनावर नियंत्रण आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी, देखरेखीवर लक्ष केंद्रित केले आहे. ज्या क्षेत्रात प्रतिबंध लावण्यात आले आहे त्यामध्ये मार्गदर्शक तत्वांचे अतिशय काटेकोरपणे पालन करण्याची संपूर्ण जबाबदारी स्थानिक जिल्हा, पोलीस आणि महानगरपालिका प्रशासन यांच्यावर असणार आहे. याबाबत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकार संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करतील आणि काळजी घेण्याविषयीही जबाबदारी राहतील.
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यास बंदी नाही
व्यवसायासाठी एखादी व्यक्ती / वस्तू एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यास कुठलीही बंदी नाही. अशा प्रकारच्या प्रवासासाठी कुठल्याही प्रकारच्या ई-पासचीही आवश्यकता नाहीये.
वयोवृद्ध / लहान मुलांची विशेष काळजी
वयोवृद्ध व्यक्ती अर्थात ६५ वर्षांहून अधिक वय असलेले व्यक्ती, गरोदर महिला आणि १० वर्षांहून कमी वय असलेल्या मुलांना घरीच थांबवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.