मुंबई: भारतीय नौदलात लवकरच आणखी एक स्कॉर्पियन श्रेणीतील पाणबुडी सामील होणार आहे. ‘वेला’, असं या अत्याधुनिक पाणबुडीचं नाव असून, सोमवारी या पाणबुडीचं मोठ्या थाटामाटात जलावरण करण्यात आलं. पण, ही पाणबुडी अजून नौदलात सामील करून घेण्यात आलेली नाहीये. आता या पाणबुडीच्या अनेक चाचण्या होणार असून, त्या चाचण्यांमधून पाणबुडीची क्षमता सिद्ध झाल्यानंतरच ती नौदलात सामील करून घेतली जाणार आहे. या संदर्भात नौदलातील एक अधिकाऱ्यांनी सांगितले की, नौदलात पाणबुडी सामील करून घेण्यापूर्वी नौदलाकडूनच त्याची प्रत्येक पातळीवर चाचणी केली जाईल. त्यानंतर ती संरक्षण दलात सामील करून घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
भारतीय लष्कर हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे लष्कर मानले जाते. त्याचबरोबर भारताच्या नौदलाचाही जगभरात दबदबा आहे. भारतीय नौदलात यापूर्वी स्कॉर्पियन पद्धतीच्या तीन पाणबुड्या आहेत. त्यामध्ये आयएनएस कलवरी, आयएनएस खादेंरी आणि आयएनएस करंज या तीन पाणबुड्यांचा समावेश आहे. आता त्यात चाचण्यांनंतर ‘वेला’ पाणबुडीचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आणखी दोन अशा दर्जाच्या पाणबुड्या तयार करण्याचे काम सुरू आहे. लवकरच ते पूर्ण होणार असून त्यांनाही नौदलात सामील करून घेण्यात येणार असल्याचे नौदलातील सूत्रांनी सांगितले.
स्कॉर्पिन श्रेणीतील सहा पाणबुड्या तयार करण्यासाठी फ्रान्सच्या एका कंपनीशी भारताचा करार झाला आहे. मेसर्स नेवल ग्रुप असे या कंपनीचे नाव असून डीसीएनएस या नावानेही कंपनीची ओळख आहे. या कंपनीशी करार केल्यानंतर आतापर्यंत मुंबईच्या माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडकडून जलावरण करण्यात आलेली ही चौथी पाणबुडी आहे. या संदर्भात एमडीएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सागरी सुरक्षेसाठी ज्या पद्धतीचे तंत्रज्ञान लागते ते सर्व आधुनिक तंत्रज्ञान ‘वेला’ पाणबुडीमध्ये आहे. भारतीय नौदलामध्ये ही नवी ‘वेला’ पाणबुडी लवकरच समाविष्ट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यापूर्वी भारताच्या नौदलात ३१ ऑगस्ट १९७१मध्ये ‘वेला’ नावाची पाणबुडी समाविष्ट करण्यात आली होती. त्या पाणबुडीने जवळपास ३७ वर्षे भारतील सागरी सिमेची सुरक्षा केली. ती देशाची सर्वांत जुनी पाणबुडी होती. २५ जून २०१०मध्ये त्या पाणबुडीला सेवामुक्त करण्यात आले. स्कॉर्पियन पाणबुड्या स्टेल्थ टेकनिकनुसार समुद्राच्या खोलात कोणत्याही प्रकारचा आवाज न करता काम करू शकतात, अशी माहिती त्यांनी दिली. पाचव्या पाणबुडीचेही लवकरच जलावरण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. एमडीएलची उलाढाल नुकतीच ४ हजार ५०० कोटी रुपयांच्या पलिकडे गेली आहे.