शिवपुरी: कांद्यानं सध्या सामान्य नागरिकांना रडवणं सुरू केलंय. अवकाळी पावसामुळे यंदा कांद्याचं उत्पादन वाया गेलं, त्यामुळे आता कांद्याच्या किंमतींनी सामान्य नागरिकांच्या खिशावर खूप भार टाकलाय. जेवणातून कांदा हळुहळू हद्दपार होतोय. अशातच देशभरात कांदा चोरी करण्याच्या घटना घडत आहेत. मध्यप्रदेशच्या शिवपुरी इथं कांद्यानं भरलेल्या ट्रकवर चोरांनी डल्ला मारल्याची घटना घडलीय. पोलिसांना ट्रक शिवपुरी जिल्ह्यात सापडला पण त्यातील कांदा गायब होता. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकचे व्यापारी प्रेमचंद शुक्ला यांनी जावेद नावाच्या ट्रान्सपोर्टरला नाशिकहून गोरखपूरला नेण्यासाठी जवळपास २० लाख रुपये किमतीचा कांदा दिला होता. ट्रकनं हा माल निघाला असता, रस्त्यात कांदा गायब झालाय. रिकामा ट्रक शिवपुरी इथं सापडला. संबंधित व्यापारी प्रेमचंद शुक्ला यांनी शिवपुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आणि शिवपुरीत राहणाऱ्या ट्रक मालकाविरोधात कांदा चोरी केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला गेलाय.
शिवपुरी बाजारपेठ व्यापारी संघाचे मोहम्मद इरशाद यांनी या प्रकरणी सांगितलं की, आम्ही सर्वजण नाशिकहून आलेल्या व्यापाऱ्यांची मदत करतोय. ज्या लोकांनी हा कांदा लंपास केला आहे त्याचा तपास करण्यात आम्ही पोलिसांना सहकार्य करतोय.
व्यापाऱ्याच्या तक्रारीनंतर सध्या शिवपुरी पोलीस तपास करत आहे आणि ज्या लोकांची नाव कांदा चोरी केल्या प्रकरणात समोर येत आहेत त्यांचा शोध घेण्याचं काम पोलीस करत आहेत.
यापूर्वी मंगळवारी असंच एक प्रकरण पश्चिम बंगालच्या कोलकाता इथं पुढे आलं होतं. एका दुकानात स्टॉक करून ठेवलेला कांदा, लसूण आणि आलं यांची चोरी झाली होती. विशेष म्हणजे चोरट्यांनी गल्ल्यात ठेवल्या असलेल्या रकमेला अजिबात हातही लावला नव्हता.
सध्या कांद्याची किंमत १०० रुपये किलोवर गेलेली आहे. दुकानदार मोठ्या प्रमाणात कांद्याचा स्टॉक आपल्या दुकानात ठेवत आहेत. मात्र कोलकाता इथं घडलेल्या ५० हजार रुपये किमतीच्या कांदा, लसूण, आल्याच्या चोरीनंतर दुकानदारही भयभीत झाले आहेत.
किरकोळ बाजारात कांद्याची किंमत १०० रुपये प्रति किलो आहे. तर आलं १२० रुपये किलोपर्यंत पोहोचलंय. तर लसणाच्या किमतीतही खूप वाढ झालीय. किरकोळ बाजारामध्ये २०० रुपये प्रति किलोच्या दरानं लसूण विकलं जात आहे.