नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटात एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोरोना व्हायरसवर विकसित करण्यात आलेल्या लसीला मान्यता दिली आहे. सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या कमेटीने ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका (Oxford - AstraZeneca) यांनी विकसित केलेल्या कोविशिल्ड लसीला (Covishield vaccine) आपात्कालीन उपयोगासाठी मान्यता दिली आहे. मात्र, अंतिम निर्णय डीसीजीआय म्हणजेच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) घेणार आहे. ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाची कोविशिल्ड लसीची भारतात निर्मिती पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट (Serum Institute of India) करत आहे.
या संदर्भात अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये. मात्र थोड्याच वेळात ही घोषणा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने कोविशिल्ड लसीच्या संदर्भातील तर हैदराबादमधील भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन लसीच्या संदर्भातील अहवाल आज केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी म्हणजेच सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO)समोर सादर केला. या अहावालाच्या आधारे कमिटीने कोव्हिशिल्ड लसीला काही अटींसह आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठ (Oxford University) आणि फार्मा कंपनी अॅस्ट्राजेनेका (AstraZeneca) यांच्याद्वारे कोरोना व्हायरसवर प्रभावी लस विकसित करण्यात येत आहे. या लसीला कोविशिल्ड नाव देण्यात आले आहे. कोविशिल्ड लसीचे भारतात उत्पादन पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट करत आहे. कोविशिल्ड लसीला आता आपत्कालीन वापरासाठी मंजूरी मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी देशातल्या तीन लस निर्मिती सुविधा केंद्रांना भेट देऊन लस विकास आणि उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला होता. यामध्ये अहमदाबादमधील झायडस बायोटेक पार्क, हैदराबादमधील भारत बायोटेक आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या तीन संस्थांना भेट दिली होती.
सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिली त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीरममधील लस उत्पादनाशी संबंधित लोकांसोबत संवाद साधळा होता. तसेच लस निर्मिती आणि उत्पादन वाढीसाठी आखण्यात आलेल्या योजनेची त्यांनी माहिती घेतली. लस वितरणाच्या संदर्भात तयार करण्यात आलेल्या योजनेचा तपशील पंतप्रधानांनी जाणून घेतला.