१०६ दिवसांनंतर पी. चिदंबरम कारागृहातून बाहेर, समर्थकांनी केलं 'असं' स्वागत 

लोकल ते ग्लोबल
Updated Dec 04, 2019 | 21:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

P Chidambaram: माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांची कारागृहातून अखेर सुटका झाली आहे. १०६ दिवसांनंतर पी. चिदंबरम यांना जामीन मंजूर झाल्याने आता ते कारागृहातून बाहेर आले आहेत. 

p chidambaram released tihar jail congress leader inx media money laundering case ed marathi news
पी. चिदंबरम (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • पी चिदंबरम यांना मोठा दिलासा
  • १०६ दिवसांनंतर पी चिदंबरम कारागृहातून बाहेर 
  • सर्वोच्च न्यायालयाने सशर्त जामीन केला मंजूर 

नवी दिल्ली: माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते पी चिदंबरम यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी कारागृहात असलेल्या पी चिदंबरम यांना बुधवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर बुधवारी रात्री पी. चिदंबरम यांची कारागृहातून सुटका करण्यात आली. १०६ दिवसांनंतर कारागृहातून बाहेर येणाऱ्या पी चिदंबरम यांच स्वागत करण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी कारागृहाबाहेर एकच गर्दी केली होती. कारागृहातून बाहेर येताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना हार घालत स्वागत केलं. तुरुंगातून बाहेर आल्यावर पी चिदंबरम यांनी सांगितले की, आपण उद्या पत्रकार परिषद घेणार आहोत.

पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ति हा सुद्धा कारागृहार बाहेर त्यांची वाट पाहत होता. आपले वडील १०६ दिवसांनी घरी परतत असल्याने आपण आनंदी असल्याचं कार्तिने सांगितले. मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो की त्यांनी जामीन मंजूर केला. तसेच काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस नेते राहूल गांधी, प्रियंका गांधी या सर्वांचा आभारी आहे ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं असंही कार्तिने म्हटलं.

आयएनएक्स मीडिया मनी लॉंड्रिंग प्रकरणात ७४ वर्षीय पी चिदंबरम हे २१ ऑगस्टपासून कारागृहात होते. सीबीआयने त्यांना या घोटाळ्याप्रकरणी अटक केली होती. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने पी चिदंबरम यांना दोन लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर करताना न्यायालयाने पी चिदंबरम यांना देशाबाहेर जाण्यास बंदी घातली आहे.

पी चिदंबरम यांना जामीन मिळाल्याने काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं की, चिदंबरम यांना १०६ दिवस कारागृहात कैद करणं ही सूडाची कारवाई होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्याने मला खूपच आनंद होत आहे. मला पूर्णपणे विश्वास आहे की, या प्रकरणाच्या सुनावणीत ते निर्दोष सुटतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी