Bengal SSC scam : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पार्थ चटर्जी यांना मोठा धक्का दिला आहे. आधी राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्रिपदावरून नंतर पक्षातून पार्थ चटर्जी यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
Bengal SSC scam : पार्थ चटर्जींची मंत्रिपदावरून हकालपट्टी
पार्थ चटर्जी हे ममता बॅनर्जी यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते. ते राज्याच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शिक्षण तसेच इतर अनेक महत्त्वाची खाती सांभाळत होते. पण शिक्षक भरती प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला. या प्रकरणात ईडीने केलेल्या तपासात पार्थ चटर्जी यांच्या विश्वासू आणि बंगाली अभिनेत्री अर्पिता मुखर्जी यांच्या घरांमध्ये कोट्यवधींची रोकड आणि सोन्याचा साठा सापडला. ईडीने जप्तीची कारवाई केली. भाजपने मोर्चा काढून ममता बॅनर्जी सरकार विरोधात राजकीय दबावाची खेळी सुरू केली. अखेर ममता बॅनर्जी यांनी पार्थ चटर्जी यांच्या विरोधात कारवाई केली. पार्थ चटर्जी यांना आधी पश्चिम बंगाल सरकारच्या मंत्रिपदावरून नंतर तृणमूल काँग्रेस पक्षातून हाकलून देण्यात आले.
पार्थ चटर्जी हे तृणमूल काँग्रेस पक्षात सरचिटणीस, राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि तीन इतर पदांवर कार्यरत होते. या सर्व पदांवरून पार्थ चटर्जी यांना हटविण्यात आले तसेच त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी पार्थ चटर्जी यांच्यावर केलेल्या कारवाईची माहित दिली.
दोषी सिद्ध झाले नाही तर पार्थ चटर्जी पुन्हा पक्षात प्रवेश करू शकतात पण सध्या ते पक्षात नाहीत त्यांना पक्षातून हटविले आहे, असे अभिषेक बॅनर्जी यांनी सांगितले.