उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या वन लायनर्सवर PM मोदींनी दिली 'ही' प्रतिक्रिया

M Venkaiah Naidu farewell news: उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे पदसिद्ध सभापती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट २०२२ रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभेत व्यंकय्या नायडू यांचा औपचारिक निरोप समारंभ झाला.

M Venkaiah Naidu farewell news
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या वन लायनर्सवर PM मोदींनी दिली 'ही' प्रतिक्रिया  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या वन लायनर्सवर PM मोदींनी दिली 'ही' प्रतिक्रिया
  • उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेची कार्यक्षमता ७० टक्क्यांनी वाढविली
  • राज्यसभेत चर्चा व्हावी यासाठीचे प्रयत्न यामुळे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू इतरांपेक्षा वेगळे आणि जास्त प्रभावी

M Venkaiah Naidu farewell news: उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे पदसिद्ध सभापती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट २०२२ रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभेत व्यंकय्या नायडू यांचा औपचारिक निरोप समारंभ झाला. याप्रसंगी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या वन लायनर्सवर प्रतिक्रिया दिली. पीएम मोदींनी उपराष्ट्रपतींच्या वन लायनर्सबाबत व्यक्त केलेले मत सर्वांना पटले यामुळेच पीएम मोदींचे वाक्य पूर्ण होताच पाठिंबा दर्शविण्यासाठी सभागृहाने बाकं वाजविली. (  PM Modi bids farewell to VP Venkaiah Naidu in Rajya Sabha mentions his oneliners )

जबादारी कशी हाताळावी आणि जबाबदारी गंभीरपणे हाताळताना वातावरण हलकेफुलके कसे राखावे याचा आदर्श उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेत वेळोवेळी सादर केला असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे वर्तन तरुणाईला प्रेरित करणारे असेच राहिले आहे. त्यांची भाषेवरील पकड कौतुकास्पद आहे. राज्यसभेत एखाद्या गंभीर प्रसंगी सहज वन लायनर्स म्हणत वातावरण हलकेफुलके करण्याचे जे कौशल्य उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हाती आहे त्याला तोड नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेची कार्यक्षमता ७० टक्क्यांनी वाढविली. आधी ज्येष्ठांच्या सभागृहात गोंधळ वाढला की कामकाज तहकूब (स्थगित) केले जायचे. पण आता चर्चा करून समर्थक आणि विरोधक यांना मत प्रदर्शन करण्याची संधी देऊन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सभागृहात जास्तीत जास्त काम कसे होईल यावर भर दिला. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती या दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे हाताळून व्यंकय्या नायडू यांनी पुढील राज्यसभेच्या सभापतींसाठी एक आदर्श घालून दिला. नायडू यांनी देशाची आणि राज्यसभेची सेवा करत मोठे कार्य केले, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे कौतुक केले आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. हा उत्सव अशा प्रसंगी साजरा होत आहे जेव्हा देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभाध्यक्ष हे सर्व जण स्वातंत्र्यानंतरच्या काळात जन्मले आहेत. घटनात्मक पदांवर असलेले हे सर्व जण सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या घरातून आले आहेत. स्वतःच्या कष्टांनी हे सर्व जण आज या पदाव पोहोचले आहेत. हे बदलत्या काळाचे प्रतिक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी बदलत्या काळासोबत राहून तरुण पिढीच्या संपर्कात राहणे पसंत केले. सभागृहात युवा संसदपटूंना बोलण्याची, त्यांचे विचार मांडण्याची भरपूर संधी दिली. युवा संसदपटूंना प्रोत्साहन दिले. विद्यापीठं, महाविद्यालयं अशा ठिकाणी जाण्याच्या निमित्ताने तरुणाईशी संवाद साधला आणि त्यांच्या देशाकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेतल्या.

संसदेत नियमांच्या चौकटीत राहून बोलावे लागते. या नियमांच्या चौकटीचे दडपण येणार नाही आणि तरुण संसदपटू मोकळेपणाने त्यांचे म्हणणे मांडतील, यासाठी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी प्रयत्न केले. गुंतागुंतीचे आणि आव्हानात्मक प्रसंग सहजतेने हाताळले. आपला उत्साह आणि जिद्द वाखाणण्याजोगी आहे. असा बुद्धिमान माणूस आता कार्यकाळ संपल्यामुळे निवृत्त होत आहे. हा प्रसंग राज्यसभेच्या सर्व सदस्यांना भावनाविवश करणारा असा आहे, असे पीएम मोदी म्हणाले.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे पुस्तक वाचन, त्यांचे कामकाज सुरू असतानाचे वन लायनर्स, सर्वांगाने साधकबाधक चर्चा व्हावी यासाठीचे प्रयत्न यामुळे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू इतरांपेक्षा वेगळे आणि जास्त प्रभावी ठरल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. प्रसंगावधान राखून हजरजबाबीपणे बोलणे हे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे एक मोठे वैशिष्ट्य आहे. नायडूंच्या बोलण्यात विषयाचे गांभिर्य आणि सखोल अभ्यास जाणवायचा. यामुळेच इतरांनाही बोलताना पूर्ण तयारी करण्याची नकळत सवय लागल्याचे पीएम मोदी म्हणाले.

उपराष्ट्रपतीपदासाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनखर यांचा विजय झाला आहे. व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ संपण्याआधीच १० तारखेला धनखर उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी