फ्रंटलाइन वर्कर्सशी बोलताना भावूक झाले पीएम मोदी

लोकल ते ग्लोबल
Updated May 21, 2021 | 18:45 IST

कोरोना संकटाशी लढत असलेल्या फ्रंटलाइन वर्कर्ससोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. याप्रसंगी पंतप्रधान मोदी भावूक झाले.

थोडं पण कामाचं

  • फ्रंटलाइन वर्कर्सशी बोलताना भावूक झाले पीएम मोदी
  • पंतप्रधानांनी केले डॉक्टरांचे कौतुक
  • सर्व पात्र व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी - पीएम मोदी

नवी दिल्ली: कोरोना संकटाशी लढत असलेल्या फ्रंटलाइन वर्कर्ससोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. याप्रसंगी पंतप्रधान मोदी भावूक झाले. पंतप्रधान म्हणाले, 'मी काशीतील प्रत्येक डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, वैद्यकीय तंत्रज्ञ, रुग्णवाहिका कर्मचारी आदी फ्रंटलाइन वर्कर्सचा आभारी आहे. त्यांनी मोठे कौतुकास्पद काम केले आहे'. PM Modi gets emotional while speaking to varanasi doctor and nurse

पंतप्रधान मोदी यांनी त्यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या काशीतील फ्रंटलाइन वर्कर्ससोबत संवाद साधला. याप्रसंगी डॉक्टर आणि पॅरा मेडिकल स्टाफपण उपस्थित होता. या निमित्ताने पंतप्रधानांनी काशीतील कोविड सेंटर आणि नॉन कोविड हॉस्पिटल तसेच इतर वैद्यकीय सोयीसुविधांचा आढावा घेतला. 

पंतप्रधानांनी केले डॉक्टरांचे कौतुक

'कोरोना संकटाची दुसरी लाट येत असल्याचे लक्षात येताच वाराणसीत वेगाने हालचाली सुरू झाल्या. शहरात तातडीने पं. राजन मिश्रा कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले. आयसीयू बेडच्या संख्येत वाढ करण्यात आली. पुरेसा ऑक्सिजनचा साठा तयार ठेवण्यात आला. ही कामगिरी अतिशय कौतुकास्पद आहे. सर्व फ्रंटलाइन वर्कर्सनी आपापसांत समन्वय राखून एक टीम म्हणून उत्तम काम केले. यामुळेच काशीत कोरोना संकट नियंत्रणात ठेवणे शक्य झाले. पण आपल्याला खूप मोठी लढाई लढायची आहे. वाराणसीच्या ग्रामीण भागापासून ते पूर्वांचल पर्यंतच्या भागावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. कोरोना संकट पूर्ण नियंत्रणात आणण्यासाठी सातत्याने कार्यरत राहणे आवश्यक आहे'; असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

सर्व पात्र व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी

भारतात १८ आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. देशातील प्रत्येक पात्र व्यक्तीने या मोहिमेत सहभागी होऊन कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी; असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. कोरोनाशी लढण्यासाठी लस घेणे एक आवश्यक संघटित जबाबदारी आहे. सर्व पात्र व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी; असे पंतप्रधान मोदी म्हणाले. संघटीत प्रयत्नांना यश मिळेल. बाबा विश्वनाथ यांच्या आशीर्वादाने आपण कोरोना विरुद्धची लढाई जिंकू, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी