PM Modi Bhashan: जेव्हा जमिनीशी जोडून घ्याल तेव्हाच तर उंच उडाल, पीएम मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

PM Modi Bhashan: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लाल किल्ल्यावर ७६व्या स्वातंत्र्यदिनी देशाला उद्देशून भाषण केले.

pm narendra modi independence day speech bhashan from red fort 2022 highlights
पीएम मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
 • पीएम मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
 • जेव्हा जमिनीशी जोडून घ्याल तेव्हाच तर उंच उडाल - मोदी
 • जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान - मोदी

PM Modi Bhashan: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लाल किल्ल्यावर ७६व्या स्वातंत्र्यदिनी देशाला उद्देशून भाषण केले. या भाषणात स्वातंत्र्याचा लढा, स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान याची दखल पंतप्रधानांनी घेतली. महापुरुषांच्या आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याचा उल्लेख करून पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या कार्याला वंदन केले. स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. सलग अनेक वर्षे देशाच्या कानाकोपऱ्यातले नागरिक आपापल्या पद्धतीने स्वातंत्र्यासाठी लढत होते. त्यांनी अनेक यातना, वेदना झेलल्या पण लढा सुरू ठेवला. यामुळेच आज या योग चालून आला असे पंतप्रधान म्हणाले.

Breaking News 15 August 2022 Latest Update - LIVE BLOG (लाईव्ह ब्लॉग)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले महत्त्वाचे मुद्दे

 1. देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिक दीर्घकाळ आपापल्या पद्धतीने स्वातंत्र्यासाठी लढा देत होते. त्यांनी अनेक यातना, वेदना झेलल्या पण लढा सुरू ठेवला. बलिदान दिले पण मागे हटले नाही. आज त्यांच्या या कार्याला वंदन करण्याची वेळ आहे
 2. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची अनेक रुपं आहे. कोणी अध्यात्म, सामाजिक सुधारणा यांच्या पातळीवर तर कोणी राजकीय पातळीवर स्वातंत्र्य लढा लढले. नारायण गुरु, स्वामी विवेकानंद, महर्षी अरविंदो, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी तसेच त्यांच्या सारख्या अनेकांनी भारतीयांना स्वातंत्र्याचा लढा लढण्यासाठी प्रेरणा दिली.
 3. मंगल पांडे, तात्या टोपे, भगत सिंह, सुखदेव, राजगुरु, चंद्रशेखर आझाद, असफाक उल्ला खां, राम प्रसाद बिस्मिल अशा अगणित क्रांतीवीरांच्या कार्याचा देश कृतज्ञ आहे. या क्रांतीवीरांनी इंग्रजांच्या सत्तेच्या पायाला मोठा धक्का दिला.
 4. भारत ही लोकशाहीची जननी आहे. मदर ऑफ डेमोक्रसी. ज्यांच्या मनात लोकशाही रुजली आहे ते जेव्हा एखादा संकल्प करून तो पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू करतात तेव्हा त्यांच्या सामर्थ्याने जगातील मोठमोठी साम्राज्य हादरून जातात. 
 5. भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाली. आता पुढील २५ वर्षे देशाच्या प्रगतीसाठी अतिशय महत्त्वाची आहेत. पंचप्राण शक्तीच्या जोरावर भारत या २५ वर्षात अनेक मोठ्या स्वप्नांची पूर्तता करेल. भारत २०४७ पर्यंत विकसित देश होण्याच्या दृष्टीने काम करेल.
 6. भारताकडे अनमोल सामर्थ्य आहे. देशाच्या ७५ वर्षांच्या इतिहासात अनेक आशाआकांक्षा, अपेक्षा, चढउतार आले. देश प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करत राहिला. माझ्या रुपाने देशात पहिल्यांदाच स्वातंत्र्यानंतरच्या काळात जन्मलेली व्यक्ती पंतप्रधान म्हणून लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत आहे.
 7. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यातील त्या अनेक महापुरुषांच्या आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणींचे स्मरण करण्यात आले ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिले पण इतिहासात त्यांचा उल्लेख झाला नाही किंवा त्रोटक स्वरुपात त्यांच्याविषयीची माहिती पुढे आली किंवा कालौघात अनेकजण त्यांना विसरले होते. अशा सर्व महापुरुष आणि स्वातंत्र्य सैनिकांविषयीची माहिती शोधून त्यांचे स्मरण करण्यात आले.
 8. भारताचे सामर्थ्य देशाच्या राष्ट्रध्वजातून प्रकट होते. यामुळेच हर घर तिरंगा मोहीम सुरू होताच देशाच्या कानाकोपऱ्यात घरोघरी तिरंगा फडकलेला दिसू लागला. राष्ट्रध्वजाच्या रुपाने आपण सर्व एकजुटीने देशाच्या विकासाला हातभार लावत असल्याची भावना जागृत होते.
 9. भारताला पुढील २५ वर्षांसाठी पाच मोठे संकल्प घेऊन त्यांची पूर्तता करण्यासाठी काम करायचे आहे. यातील पहिला संकल्प आहे विकसित भारत. दुसरा संकल्प आहे मनातील गुलामीशी संबंधित विचार दूर करणे. मनाच्या कोपऱ्यातील गुलामीचे विचार दूर करण्यासाठी आत्मनिर्भर भारत ही मोहीम महत्त्वाची आहे. देशाने स्वतःची मानके तयार करून ती जगभर मान्य व्हावी या दृष्टीने काम करण्याची आवश्यकता आहे.
 10. तिसरा संकल्प आहे देशाच्या ऐतिहासिक वारश्याचा अभिमान बाळगणे, चौथा संकल्प एकता आणि एकजूट तर पाचवा संकल्प आहे देशातील सर्व नागरिकांनी आपल्या कर्तव्यांची पूर्तता करणे. पाचव्या संकल्पातून पंतप्रधान, राष्ट्रपती असे कोणीही बाहेर राहू शकत नाही. 
 11. जेव्हा जमिनीशी जोडून घ्याल तेव्हाच तर उंच उडाल आणि जेव्हा उंच उडाल तेव्हा वैश्विक प्रश्नांवर उत्तरे शोधू शकाल.
 12. सामूहिक चेतनेचे पुनर्जागरण ही आपली संपत्ती आहे. हर घर तिरंगा मोहिमेतून हेच साध्य झाले आहे.
 13. जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत आहे. जग भारताकडे अपेक्षेने, विश्वासाने, कौतुकाने बघू लागले आहे
 14. भारताची कुटुंब व्यवस्था भारतीयांना तणाव हाताळण्यासाठी तसेच गुंतागुंतीतून निर्माण झालेले प्रश्न शांतपणे सोडविण्यासाठी सक्षम करते. यात भारतातील मातांचे मोठे योगदान आहे. जे कधीही कोणीही विसरू शकत नाही.
 15. आपली प्रतिभा भाषेच्या बंधनात अडकवून ठेवू नका. आपल्या देशातील प्रत्येक भाषेविषयी अभिमान वाटला पाहिजे.
 16. आत्मनिर्भर होण्याकडे वाटचाल करणे ही भारतातील प्रत्येक नागरिकाची, सरकारची, सरकारी यंत्रणेची प्रमुख जबाबदारी आहे.
 17. पर्यावरणासारखे गंभीर जागतिक प्रश्न कसे हाताळावे याचे मार्गदर्शन भारतीय संस्कृतीत आहे. भारताची संस्कृती जगाला निसर्गावर प्रेम करायला आणि निसर्गाचा आदर करायला शिकवते. 
 18. जेव्हा स्वप्न मोठी असतात तेव्हा ती पूर्ण करण्याच्या निमित्ताने हातून मोठे कार्य घडते. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष झाली आता पुढील २५ वर्षात देशाला विकसित करणे हेच सर्वात मोठे स्वप्न आहे.
 19. विकसित भारत गुलामीच्या विचारांपासून मुक्त आणि आत्मनिर्भर असेल, या देशात एकता आणि एकजूट दिसेल. नागरिक त्यांची कर्तव्य पूर्ण करून देशाच्या विकासात योगदान देताना दिसतील.
 20. भारतीय संस्कृती माणसाला जीवात शिवशंकराला बघण्यासाठी शिकवते. माणसात देव बघायला शिकवते. महिलांचा आदर करायला शिकवते. झाडांमध्ये देवाला बघायला शिकवते. हे आपले सामर्थ्य आहे. या सामर्थ्यावर विश्वास ठेवून जेव्हा अभिमानाने ही संस्कृती जपाल तेव्हाच जगाला तुमच्या विषयी वाटणारा आदर आणखी वाढेल.
 21. देशातील तरुण पिढीने विविध क्षेत्रांमध्ये संशोधनावर भर द्यावा. संशोधनाला चालना देणे आणि विविध क्षेत्रांसाठी आधुनिक तंत्रज्ञान विकसित करणे यातूनच विकासाची गती वाढेल. भारताने अंतराळ संशोधनाची आणि खोल समुद्रातील संशोधनाची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. या संशोधनातून आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यास मदत होईल.
 22. भ्रष्टाचार आणि घराणेशाही देशाच्या विकासातील प्रमुख अडथळे आहेत. क्षेत्र कोणतेही असू दे तिथे भ्रष्टाचार आणि घराणेशाही विकासाच्या मार्गातील अडथळे आहेत. यामुळे भ्रष्टाचार आणि घराणेशाही यांना विरोध करणे आवश्यक आहे.
 23. देश लुटणाऱ्यांना आता लुटलेले परत करावे लागत आहे. हा लढा यापुढेही सुरू राहणार आहे.
 24. दैनंदिन जीवनात महिलांचा आदर करा. आयुष्यात महिलेचा अनादर करणाऱ्या प्रत्येक बाबीपासून मुक्तता आवश्यक आहे.
 25. देशाच्या पुढील विकासाकरिता 'जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान' आवश्यक आहे. भविष्याचा विचार करून संशोधनाला चालना दिली तरच देशाच्या प्रगतीला गती मिळेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी