Chandrakant Paatil : गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी मराठी माणूस? काय सांगतो इतिहास?

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 25, 2022 | 21:39 IST

Chandrakant Paatil : एका वेगळ्या राज्याच्या व्यक्तीने दुसर्‍या राज्याचे मुख्यमंत्रिपद भुषवणे आज जरी आश्चर्याची गोष्ट वाटत असली तरी भारतीय राजकारणात ही बाब नवीन नाही. जेव्हा भारताची भाषावर प्रांतरचना झाली नव्हती तेव्हा अनेक राज्यांची ओळख ही द्विभाषिक किंवा बहुभाषिक होती.

थोडं पण कामाचं
  • एका वेगळ्या राज्याच्या व्यक्तीने दुसर्‍या राज्याचे मुख्यमंत्रिपद भुषवणे आज जरी आश्चर्याची गोष्ट वाटत असली तरी
  • भारतीय राजकारणात ही बाब नवीन नाही.
  • जेव्हा भारताची भाषावर प्रांतरचना झाली नव्हती तेव्हा अनेक राज्यांची ओळख ही द्विभाषिक किंवा बहुभाषिक होती.

Chandrakant Paatil : भाजप खासदार आणि गुजरातचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील म्हणजेच चंद्रकांत रघुनात पाटील यांचे नाव सध्या गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. जेव्हा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी विजय रुपाणी यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवले तेव्हाही पाटील यांचे नाव चर्चेत होते. परंतु आपण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही असे पाटील यांनी स्पष्ट करून या चर्चांना पूर्णविराम दिला. त्यानंतर भूपेंद्र पटेल यांच्या गळ्यात गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. आता गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक आहे, तेव्हा पाटील यांचे नाव पुन्हा चर्चेत आहे. पाटील मूळचे महाराष्ट्राचे असून जळगावचा त्यांचा जन्म आहे. १९७५ साली त्यांनी गुजरात पोलिसांत शिपाई पदावर नोकरी मिळवली आणि १४ वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर १९८९ साली पाटील यांनी गुजरात भाजपममध्ये प्रवेश मिळवला आणि आज ते प्रदेशाध्यक्ष आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देशात सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून येण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. एका मराठी माणसाचे नाव गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (political leaders who became chief minister of other states read in marathi)

एका वेगळ्या राज्याच्या व्यक्तीने दुसर्‍या राज्याचे मुख्यमंत्रिपद भुषवणे आज जरी आश्चर्याची गोष्ट वाटत असली तरी भारतीय राजकारणात ही बाब नवीन नाही. जेव्हा भारताची भाषावर प्रांतरचना झाली नव्हती तेव्हा अनेक राज्यांची ओळख ही द्विभाषिक किंवा बहुभाषिक होती. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी आणि गुजरात अशा द्वैभाषिक राज्याचे मुख्यमंत्रिपद भुषवले होते. जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले होते. तर जीवराज मेहता नव्या गुजरात राज्याचे मुख्यमंत्री झाले होते.

उत्तर प्रदेश या राज्याचे पहिले मुख्यमंत्री मराठी होते, हे कळाल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटेल. गोविंद वल्लभ पंत हे उत्तर प्रदेश राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. ते मूळचे मराठी होते. काँग्रेसचे वरिष्ठ नेते असलेल पंत यांचा जन्म एका कर्‍हाडे ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्यांचे पूर्वज उत्तर प्रदेशमध्ये स्थायिक झाले होते. पंतांनी स्वातंत्र्य चळवळीतही भाग घेतला होता. पंत १९३७ ते १९३९ या काळात तेव्हाचा संयुक्त प्रांत आताच्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होती. पंत नंतर केंद्रीय मंत्रीही झाले होते.

माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज या दिल्लीच्या मुख्यमंत्रीही होत्या. परंतु स्वराज या हरयाणातून आधी आमदार झाल्या होत्या. हरयाणात जनता पक्षाची सत्ता असताना त्यांनी राज्यात अनेक मंत्रिपदेही भुषवली होती. १९९८ साली वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री असलेल्या स्वराज यांनी राजीनामा दिला आणि दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी शपथ घेतली होती.

तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एमजीआर हे मूळचे तमिळ नव्हते. एम जी रामचंद्रन यांचा जन्म श्रीलंकेत एका मल्याळम कुटुंबात झाला होता. रामचंद्रन यांचे कुटुंब मूळचे केरळच्या  पलक्कड जिल्ह्याचे होते. अभिनयासाठी रामचंद्रन तमिळनाडूत आले आणि नंतर राज्याचे मुख्यमंत्रिपदही भुषवले होते. 

आता गुजरात निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांचे नाव चर्चेत आहेत. एका गुजराती भाषिक राज्याचे मुख्यमंत्री मराठी माणूस होईल का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी