शेतकरी आंदोलनातील हिंसेच्या जबाबदारीवरुन वाद

लोकल ते ग्लोबल
Updated Jan 26, 2021 | 16:00 IST

कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. या हिंसेची जबाबदारी कोणाची यावरुन आता शेतकऱ्यांचे नेते म्हणवणाऱ्यांमध्ये वाद सुरू आहे.

थोडं पण कामाचं

  • शेतकरी आंदोलनातील हिंसेच्या जबाबदारीवरुन वाद
  • आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, ट्रॅक्टरद्वारे पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न
  • दिल्लीतील अनेक मेट्रो स्टेशन बंद

नवी दिल्ली: कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. या हिंसेची जबाबदारी कोणाची यावरुन आता शेतकऱ्यांचे नेते म्हणवणाऱ्यांमध्ये वाद सुरू आहे. प्रत्येक नेता दुसऱ्या नेत्याच्या संघटनेवर आरोप करत जबाबदारी ढकलत आहे. (protesting farmers pelting stones and vandalised dtc buses try to attack police by tractors)

प्रजासत्ताक दिन असल्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही दिल्लीच्या सीमेवर तसेच प्रमुख रस्त्यांवर पोलिसांनी बॅरिकेड लावले होते. कडेकोट बंदोबस्त होता. मात्र शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढताना बॅरिकेड पाडले. काही ठिकाणी बॅरिकेडची मोडतोड करण्याचे प्रकार घडले. शांतपणे ट्रॅक्टर रॅली काढण्याचे आश्वासन शेतकऱ्यांच्या नेत्यांनी दिले होते. प्रत्यक्षात ट्रॅक्टर रॅली काढणाऱ्यांनी दिल्लीत घुसून धुडगूस घातला. 

ज्या मार्गावर रॅलीला परवानगी होती तो सोडून भलत्याच मार्गावर प्रवेश करुन आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर नेण्याचा प्रयत्न केला. तसेच एका निहंग साधूने पोलिसावर तलवार उगारण्याचा प्रयत्न केला. ट्रॅक्टर चालक बेदरकारपणे ट्रॅक्टर चालवत होते. दिल्लीच्या आयटीओ परिसरात रॅलीला परवानगी नव्हती. पण ट्रॅक्टर घेऊन वेगाने आंदोलक शेतकरी पुढे येत होते. त्यांनी पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर नेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. ट्रॅक्टर रॅली काढणाऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. रॅली काढणाऱ्यांनी केलेल्या दगडफेकीत डीटीसीच्या काही बसचे प्रचंड नुकसान झाले. काही पोलीस जखमी झाले. अखेर बळाचा वापर करुन तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून पोलिसांनी जमावाला मागे रेटले. विशेष म्हणजे कृषी कायदे मागे घ्या अशी मागणी करत वारंवार केंद्र सरकारला धमकीवजा इशारे देणारे प्रमुख नेते ट्रॅक्टर रॅलीच्या आघाडीवर कुठेच दिसले नाही. 

प्रसारमाध्यमांनी ट्रॅक्टर रॅलीच्या नावाखाली धुडगूस घालण्याच्या मुद्यावरुन शेतकऱ्यांच्या नेत्यांना प्रश्न विचार विचारले. या प्रश्नांना शेतकऱ्यांच्या नेत्यांनी मोघम उत्तरे दिली. धुडगूस घालणारे आमच्या संघटनेचे नव्हते असा दावा योगेंद्र यादव यांनी केला. तर राकेश टिकैत यांनी काही राजकीय पक्षांनीच आंदोलनात गोंधळ घातला असा मोघम आरोप केला. आरोप करताना टिकैत यांनी एकही पुरावा सादर केला नाही. 

दिल्लीच्या आयटीओ परिसरात ट्रॅक्टर रॅलीच्या नावाखाली प्रचंड धूडगूस घालण्यात आला. आंदोलकांनी केलेली हिंसा बघून दिल्लीच्या व्यापाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून कनॉट प्लेस परिसरातील बाजार दिवसभरासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. दिल्लीतील अनेक महत्त्वाच्या मेट्रो स्टेशनवर गाड्या थांबणार नसल्याचे मेट्रो प्रशासनाने जाहीर केले. परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण मिळाल्याची खात्री होईपर्यंत संबंधित मेट्रो स्टेशन बंद करण्यात आली. दिल्लीला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. दिल्लीच्या संवेदनशील भागांमध्ये इंटरनेट आणि मोबाइल नेटवर्क बंद करण्यात आले आहे.

लाल किल्ल्यावर पोहोचले निवडक आंदोलक

प्रजासत्ताक दिनाची परेड संपल्यानंतर निवडक आंदोलक धुडगूस घालत दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पोहोचले. त्यांनी किल्ल्याच्या बाहेरील प्रांगणात घातलेले कुंपण ओलांडले आणि उंचावर जाऊन शेतकरी संघटनेचा झेंडा झळकावला.

शेतकरी-सरकार चर्चा अयशस्वी

याआधी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकारचे प्रतिनिधी यांच्यात सुरू असलेल्या चर्चेची आणखी एक फेरी अयशस्वी झाली. शेतकऱ्यांना मुक्त वातावरणात चर्चेची संधी मिळावी म्हणून कृषी कायद्यांची अंमलबजावणी काही महिन्यांसाठी लांबणीवर टाकता येईल. या काळात तोडगा निघाला तर आवश्यक त्या तरतुदींसह कायदा लागू करू, असा पर्याय केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिला आहे. पण शेतकऱ्यांनी कृषी कायदे मागे घ्या नाही तर ट्रॅक्टर रॅली काढू असा इशारा दिला. आंदोलक शेतकऱ्यांनी रितसर पोलीस परवानगी घेऊन शांततेत रॅली काढणार असल्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात आयत्यावेळी मार्ग बदलून शेतकऱ्यांनी पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. आंदोलन हिंसक वळण घेऊ लागले. यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी