ट्रॅक्टर रॅलीत पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न

लोकल ते ग्लोबल
Updated Jan 26, 2021 | 14:45 IST

ज्या मार्गावर परवानगी होती तो सोडून भलत्याच मार्गावर प्रवेश करुन ट्रॅक्टर चालकांनी पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर नेण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसावर तलवार उगारण्याचा प्रयत्न केला

थोडं पण कामाचं

  • ट्रॅक्टर रॅलीत पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न
  • पोलिसावर तलवार उगारण्याचा प्रयत्न
  • पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर नेण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली: कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत शांतपणे ट्रॅक्टर रॅली काढू असे शेतकऱ्यांच्या नेत्यांनी सांगितले होते. प्रत्यक्षात ज्या मार्गावर परवानगी होती तो सोडून भलत्याच मार्गावर प्रवेश करुन ट्रॅक्टर चालकांनी पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर नेण्याचा प्रयत्न केला. तसेच एका निहंग साधूने पोलिसावर तलवार उगारण्याचा प्रयत्न केला. (Protesting farmers reach Delhi ITO, break police barricades)

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे बघून पोलिसांनी बळाचा वापर केला. दिल्ली आयटीओ परिसरातून वेगाने पुढे सरसावत असलेल्या ट्रॅक्टर रॅलीला पोलिसांनी हटकले. अश्रूधुराचा तसेच बळाचा वापर करुन पोलिसांनी पुढे सरसावणाऱ्या शेतकऱ्यांना मागे ढकलले. पोलीस कारवाई सुरू होताच अनेक ट्रॅक्टर चालकांनी ट्रॅक्टर सोडून पळ काढला. पण काही ट्रॅक्टर वारंवार पोलिसांच्या अंगावर नेण्याचा प्रयत्न सुरू होता. अखेर चहूबाजूने घेरुन पोलिसांनी या ट्रॅक्टरच्या चालकांना मागे रेटले.

पोलिसावर तलवार उगारण्याचा प्रयत्न एका निहंग साधूने केला. मात्र आजूबाजूला असलेले पोलीस पुढे सरसावले आणि तलवार उगारणाऱ्या साधूला रोखण्यात आले. ताज्या घडामोडींमुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. दिल्लीच्या आयटीओ परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप आले.

याआधी दिल्लीच्या सीमेवरील सर्व बॅरिकेड तोडून शेतकऱ्यांनी दिल्लीत प्रवेश केला. ज्या मार्गावर परवानगी होती तो सोडून भलत्याच मार्गावर शेतकरी ट्रॅक्टर रॅली घेऊन आले. अनेक ट्रॅक्टर चालक बेदरकारपणे ट्रॅक्टर चालवत होते. दिल्लीच्या आयटीओ परिसरात रॅलीला परवानगी नव्हती. पण ट्रॅक्टर घेऊन वेगाने आंदोलक शेतकरी पुढे येत होते. त्यांनी पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर नेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. हे प्रकार सुरू होताच पोलिसांनी बळाचा वापर करुन रॅलीसाठी आलेल्या जमावाला पांगवले.

ट्रॅक्टर रॅली काढणाऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. पण आधीपासूनच बिकट परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज असलेल्या पोलिसांनी हेल्मेट आणि सुरक्षा कवच यांच्या जोरावर स्वतःला वाचवत जमावाला जास्तीत जास्त मागे रेटायला सुरुवात केली. रॅली काढणाऱ्यांनी केलेल्या दगडफेकीत डीटीसीच्या बसचे प्रचंड नुकसान झाले.  पोलीस आणि शेतकरी यांच्यातील संघर्षामुळे आंदोलन भरकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे कृषी कायदे मागे घ्या अशी मागणी करत वारंवार केंद्र सरकारला धमकीवजा इशारे देणारे प्रमुख नेते ट्रॅक्टर रॅलीच्या आघाडीवर कुठेच दिसले नाही. 

राहुल गांधींचे ट्वीट

आक्रमक आंदोलकांनी पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न केल्याच्या घटना घडल्यानंतर राहुल गांधी यांनी एक ट्वीट केले. हिंसेने प्रश्न सुटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. तसेच कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली. 

शेतकरी-सरकार चर्चा अयशस्वी

शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकारचे प्रतिनिधी यांच्यात सुरू असलेल्या चर्चेची आणखी एक फेरी अयशस्वी झाली. शेतकऱ्यांना मुक्त वातावरणात चर्चेची संधी मिळावी म्हणून कृषी कायद्यांची अंमलबजावणी काही महिन्यांसाठी लांबणीवर टाकता येईल. या काळात तोडगा निघाला तर आवश्यक त्या तरतुदींसह कायदा लागू करू, असा पर्याय केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिला आहे. पण शेतकऱ्यांनी कृषी कायदे मागे घ्या नाही तर ट्रॅक्टर रॅली काढू असा इशारा दिला. आंदोलक शेतकऱ्यांनी रितसर पोलीस परवानगी घेऊन शांततेत रॅली काढणार असल्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात आयत्यावेळी मार्ग बदलून शेतकऱ्यांनी पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. आंदोलन हिंसक वळण घेऊ लागले. यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी