पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचा राजीनामा

लोकल ते ग्लोबल
Updated Sep 18, 2021 | 18:38 IST

काँग्रेस श्रेष्ठींच्या आदेशानंतर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी राजीनामा दिला.

थोडं पण कामाचं

  • पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचा राजीनामा
  • मागील ५२ वर्षांपासून राजकारण करत आहे आणि पर्याय कायम खुले असतात - अमरिंदर सिंह
  • अपमानीत झाल्यासारखे वाटत आहे - अमरिंदर सिंह

चंदिगड: काँग्रेस श्रेष्ठींच्या आदेशानंतर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी राजीनामा दिला. राज्यपालांना भेटून राजीनामा दिल्यानंतर राजभवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अमरिंदर सिंह यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना अमरिंदर सिंह यांनी काँग्रेस नेतृत्वावरील नाराजीला मोकळी वाट करुन दिली. 

मागील ५२ वर्षांपासून राजकारण करत आहे आणि पर्याय कायम खुले असतात. योग्य वेळी योग्य निर्णय घेईन, असे अमरिंदर सिंह म्हणाले. समर्थकांशी चर्चा केल्यानंतर निर्णयाची घोषणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

काँग्रेस नेतृत्व त्यांना हव्या त्या व्यक्तीला पंजाबचे मुख्यमंत्री करू शकते. पण दोन महिन्यांत ज्या पद्धतीने तीन वेळा आमदारांची बैठक बोलावण्यात आली त्यामुळे मला अपमानीत झाल्यासारखे वाटत आहे, असे अमरिंदर सिंह यांनी सांगितले. मी पंजाबच्या जनतेची सेवा केली आहे आणि पक्षाबाबत विचाराल तर काँग्रेसमध्ये आहे; असे अमरिंदर सिंह म्हणाले.

अमरिंदर सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचा मुलगा रनिंदर सिंह याने एक ट्वीट केले. वडिलांसोबत राजभवनात गेलो होतो, अशी माहिती त्याने दिली. काही वेळा निर्णय घ्यावे लागतात. वडिलांच्या कतृत्वाचा अभिमान आहे. इथून पुढे कुटुंब प्रमुखाची जबाबदारी पार पाडणार; अशा स्वरुपाचे ट्वीट त्याने केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी