नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी लोकसभेत बोलताना तीन कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी म्हटलं, पहिला कायदा हा बाजार समित्या संपवणारा आहे. दुसऱ्या कायद्यानुसार मोठ-मोठे उद्योगपती हवं तेवढं अन्नधान्य, फळभाज्यांचा साठा करु शकतात. तर तिसऱ्या कायद्यानुसार, शेतकऱ्याला भारतातील कुठल्याही उद्योगपतीकडे आपल्या मालाला योग्य भाव मिळाला नाही तर त्याला न्यायालयात जाण्याची परवानगी देत नाही.
राहुल गांधी यांनी म्हटलं, पंतप्रधान म्हणतात की त्यांनी तीन पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय भूक, दुसरा पर्याय बेरोजगारी आणि तिसरा पर्याय हा आत्महत्या आहे. देशाचा सर्वात मोठा व्यवसाय हा शेती आहे. ४० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे.
आपल्याला 'हम दो हमारे दो' अभियानाचा फोटो आठवत असेल. तशाच प्रकारे जेव्हा हे कायदे लागू होतील तेव्हा देशातील शेतकरी, छोटे मजूर, छोट्या व्यावसायिकांचे धंदे बंद होतील. शेतकऱ्यांची शेती नष्ट होईल. त्यांना योग्य भाव, मोबदला मिळणार नाही. केवळ हम दो आणि हमारे दो या देशाला चालवतील. देशातील जनतेला भूकेमुळे प्राण गमावावे लागतील. रूरल इकोनॉमी संपेल आणि देश रोजगार उपलब्ध करु शकणार नाही. हे काम पंतप्रधानांनी नोटबंदीपासून सुरू केलं होतं. पहिल्यांदा नोटबंदी केली, शेतकरी, मजूर यांच्याकडून पैसे घ्या आणि बँकेत टाका आणि मग तो पैसा हम दो, हमारे दो यांच्या खिशात टाका.
राहुल गांधी यांनी म्हटलं, हे आंदोलन शेतकऱ्यांचे नाहीये तर संपूर्ण देशाचं आहे. शेतकरी केवळ रास्ता दाखवत आहेत. अंधारात टॉर्च दाखवत आहेत. शेतकरी, मजूर, छोटे दुकानदार एक इंचही मागे हटणार नाहीत तुम्हाला कायदे परत घ्यावेच लागतील.