74th Republic Day of India : प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर भारताच्या सामर्थ्याची झलक

लोकल ते ग्लोबल
Updated Jan 26, 2023 | 10:43 IST

Republic Day parade 2023 to showcase India military prowess, cultural diversity : आज (गुरुवार 26 जानेवारी 2023) भारताचा 74वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. या निमित्ताने कर्तव्यपथावर भारताच्या सामर्थ्याची झलक दिसेल.

थोडं पण कामाचं
  • प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर भारताच्या सामर्थ्याची झलक
  • इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फत्ताह अल-सिसी हे भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे पाहुणे
  • 65 हजार नागरिक प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित असतील

Republic Day parade 2023 to showcase India military prowess, cultural diversity : आज (गुरुवार 26 जानेवारी 2023) भारताचा 74वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. या निमित्ताने कर्तव्यपथावर भारताच्या सामर्थ्याची झलक दिसेल. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फत्ताह अल-सिसी हे भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून उपस्थित असतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रीमंळाचे सदस्य आणि इतर मान्यवर यांच्यासह 65 हजार नागरिक प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित असतील.

भारताचे लष्करी सामर्थ्य

प्रजासत्ताक दिन विशेष रांगोळी

प्रजासत्ताक दिनाची परेड सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल. या परेडचे थेट प्रक्षेपण (Live Telecast) दूरदर्शनच्या (Doordarshan Network or DD Channels) सर्व टीव्ही चॅनलवरून होईल. परेडद्वारे भारताच्या लष्करी सामर्थ्याची आणि सांस्कृतिक विविधतेतील एकतेची झलक दाखविली जाईल. तसेच आत्मनिर्भर भारत अंतर्गत तयार केलेल्या निवडक शस्त्रांची झलक परेडमध्ये दाखविली जाईल. यंदाच्या परेडमध्ये महिला सैनिकांच्या सामर्थ्याचे सादरीकरण होईल. स्वदेशी भारत, नवा भारत आणि नारी शक्ती (महिला शक्ती) याला यंदाच्या परेडमध्ये प्राधान्य देण्यात आले आहे.

याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देतील. हुतात्म्यांना मानवंदना देऊन कर्तव्यपथावर पोहोचतील. परंपरेनुसार ध्वजावतरण होईल. राष्ट्रध्वजाला 21 तोफांची सलामी दिली जाईल. राष्ट्रगीत होईल. तोफांची सलामी देण्यासाठी पहिल्यांदाच 105 मिमि फिल्ड गनचा वापर केला जाईल. ही तोफ जुन्या 25 पाउंडर गनची जागा घेणार आहे. 

ध्वजावतरण झाल्यानंतर 4 एमआय 17 हेलिकॉप्टरमधून परेड बघण्यासाठी कर्तव्यपथ येथे उपस्थित नागरिकांवर पुष्पवृष्टी केली जाईल. यानंतर परेड सुरू होईल. परेडच्या सुरुवातीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सलामी दिली जाईल. परेड कमांडर लेफ्टनंट जनरल धीरज सेठ (अती विशिष्ट सेवा मेडल विजेते) राष्ट्रपतींना सलामी देतील. मेजर जनरल भवनीश कुमार परेडचे सेकंड इन कमांड आहेत. 

परेडसाठी कर्तव्यपथावर येणाऱ्या पहिल्या पथकात परमवीर चक्र आणि अशोक चक्र विजेते आजी माजी सैनिक असतील. परेडमध्ये इजिप्तच्या सैनिकांची एक तुकडी पण सहभागी होणार आहे. कर्नल महमूद मोहम्मद अब्देल फत्ताह एल खारासावी या तुकडीचे नेतृत्व करतील. या तुकडीत 144 जण असतील. बँड पथक आणि संचलन करणारे सैनिक अशी ही संयुक्त तुकडी असेल.

परेडमध्ये 61वी हॉर्स कॅव्हलरी रेजिमेंट सहभागी होणार आहे. यानंतर सैनिकांची इतर पथके पण परेडमध्ये सहभागी होतील. यंदाच्या परेडमध्ये अर्जुन रणगाडे, नाग मिसाईल सिस्टिम, बीएमपी टू सारथ इन्फंट्री कॉम्बॅक्ट व्हेईकल, क्विक रिअॅक्शन फायटिंग व्हेईकल, के 9 वज्र हॉवित्झर गन, ब्राह्मोस मिसाईल, 10 मीटर शॉर्ट स्पॅन मिसाईल, मोबाईल नेटवर्क सिस्टिम, आकाश मिसाईल यंदाच्या परेडमध्ये दिसेल. 

भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांची आणि निमलष्करी दलांची पथके, दिल्ली पोलीस, सीआरपीएफ, एनसीसी, एनएसएस, माजी सैनिक, राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेते, 17 चित्ररथ, कलाकार असे अनेकजण यंदाच्या परेडमध्ये कर्तव्यपथावर दिसतील. परेडच्या अंतिम टप्प्यात भारताच्या वायुदलाची आणि नौदलाच्या एअर विंगची विमानं फ्लायपास्ट करणार आहे. यात राफेल विमानांचाही समावेश आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी