नवी दिल्ली : दिल्लीतील (Delhi) मंगोलपुरी येथे २५ वर्षीय रिंकू शर्मा (Rinku Sharma) याची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. बुधवारी रात्री उशीरा आरोपी रिंकू शर्माच्या घरात घुसले आणि त्यांनी रिंकूला फरफटत घराबाहेर ओढले यानंतर त्याच्या पाठीत चाकू हल्ला केला. या घटनेनंतर रिंकूला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. रिंकूचं घर रुग्णालयापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर होते मात्र, तरीही रिंकूचे प्राण वाचू शकले नाहीत. रिंकूवर चाकू हल्ला केल्यानंतर आरोपी रुग्णालयापर्यंत रिंकूचा पाठलाग करत होता.
रिंकूची आई रेखा शर्मा यांनी टाइम्स नाऊ सोबत बोलताना सांगितले की, "परवा रात्री माझ्या मुलाला मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत नेलं. त्याची तब्येत ठीक नसल्याने तो घरी परतला. त्यानंतर आरोपींनी घरात प्रवेश केला आणि आरोपींनी सिलिंडर उघडला (स्फोट होण्यासाठी). मग आरोपींनी रिंकूला फरफटत घराबाहेर नेलं आणि लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली मग चाकू हल्ला केला. या हल्ल्यात रिंकू संपूर्ण रक्तबंबाळ झाला होता. मी रडत होते, तो माझ्याकडे पाहत राहिला आणि म्हणाला, मम्मी जय श्रीराम, जयश्रीराम."
रेखा शर्मा यांनी सांगितले, माझ्या शेजाऱ्यांनी रिंकूला स्कूटीवरुन संजय गांधी रुग्णालयात नेलं. संपूर्ण स्कूटीला सुद्धा रक्त लागले होते. रुग्णालयातही आरोपींनी गोँधळ घातला. माझे दोन्ही मुलं नोकरी करतात एक बालाजी मध्ये तर दुसरा केएफसीमध्ये काम करतो. माझ्या दुसऱ्या मुलाने सांगितले की, या आरोपींनी गेल्या तीन दिवसांपासून माझ्या भावाला मारण्याचा कट रचला होता. आम्हाला न्याय हवा आहे. आम्हाला सुरक्षेसाठी पोलीस हवे आहेत.आरोपींपैकी एकाचे नाव ताजू असं आहे. रिंकूचा मृत्यू होईपर्यंत तो आरोपी रुग्णालयातच थांबलेला होता.
दिल्ली पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त एस धामा यांनी म्हटलं, रिंकूवर १० फेब्रुवारी रोजी बर्थ डे पार्टी दरम्यान मंगोलपूरी येथे हल्ला झाला. उपचारादरम्यान रिंकूचा रुग्णालयात मृत्यू झाला. रेस्टॉरंट बंद करण्यावरुन सुरू झालेला वाद हाणामारीत झाला. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.