Second phase of Ram Mandir foundation : अयोध्येच्या राम मंदिराच्या पायाभरणीचा दुसरा टप्पा अंतिम टप्प्यात

लोकल ते ग्लोबल
Updated Jan 15, 2022 | 10:03 IST

Second phase of Ram Mandir foundation in Ayodhya expected to be completed by Jan end : अयोध्येच्या राम मंदिराच्या पायाभरणीचा दुसरा टप्पा अंतिम टप्प्यात आहे. या टप्प्यातील काम सोमवार ३१ जानेवारी २०२२ पर्यंत पूर्ण होण्याची चिन्ह आहेत.

थोडं पण कामाचं
  • अयोध्येच्या राम मंदिराच्या पायाभरणीचा दुसरा टप्पा ३१ जानेवारी २०२२ पर्यंत पूर्ण होण्याची चिन्ह
  • मंदिर निर्माण कार्य २४ तास वेगाने सुरू
  • पंतप्रधान मोदींनी ५ ऑगस्ट २०२० रोजी मंदिराची पायाभरणी केली होती

Second phase of Ram Mandir foundation in Ayodhya expected to be completed by Jan end : अयोध्या : अयोध्येच्या राम मंदिराच्या पायाभरणीचा दुसरा टप्पा अंतिम टप्प्यात आहे. या टप्प्यातील काम सोमवार ३१ जानेवारी २०२२ पर्यंत पूर्ण होण्याची चिन्ह आहेत. पायाभरणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे आणि दुसरा टप्पा ३१ जानेवारी पर्यंत पूर्ण होईल; असे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले. 

मंदिर निर्माण कार्य २४ तास वेगाने सुरू आहे. मंदिराचे बांधकाम करत असलेले कारागिर नियोजनाप्रमाणे वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये (Duty Shift) काम करत आहेत. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने मंदिर निर्माण कार्याच्या ठिकाणी सुरू असलेल्या कामाचा अंदाज यावा यासाठी एक थ्री डी अॅनिमेशन तयार केले आहे. हे अॅनिमेशन प्रसारमाध्यमांना दाखवण्यात आले. 

मुख्य मंदिर २.७ एकरच्या भूखंडावर आहे. संपूर्ण मंदिर परिसर ५७ हजार ४०० चौरसफुटांचा आहे. मंदिराची लांबी ३६० फूट आणि रूंदी २३५ फूट आहे. शिखरासह (कळस) मंदिराची उंची १६१ फूट आहे. मंदिर तीन मजल्यांचे आहे. प्रत्येक मजल्याची उंची २० फूट आहे. मंदिर निर्माण कार्यासाठी ५ फूट लांबी आणि ३ फूट रूंदी तसेच २.५ फूट उंची असलेले दगड मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येत आहेत. मंदिरासाठी सुमारे १७ हजार दगडांचा वापर होईल. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्येत श्रीराम जन्मभूमी येथे राम मंदिर निर्माण कार्याचा शिलान्यास (भूमिपूजन) केला आणि मंदिराच्या पायाभरणीला सुरुवात करुन दिली. याआधी ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने निर्णय दिला. यानंतर राम मंदिर निर्माण कार्याचे नियोजन सुरू झाले. मंदिर निर्मितीसाठी जमीन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडे सोपविण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ट्रस्टची स्थापना केंद्र सरकारने केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी