[VIDEO] सत्ता स्थापनेसाठी अशी दिली शरद पवारांनी शिवसेनेला हिंट, पाहा पवार काय म्हणाले!

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 04, 2019 | 20:51 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली.

थोडं पण कामाचं

  • शरद पवारांची राजधानी दिल्लीत सोनिया गांधींशी चर्चा
  • शरद पवारांकडून शिवसेनेला मिळाली मोठी हिंट
  • शिवसेना शरद पवारांना देणार प्रस्ताव?

नवी दिल्ली: राज्यातील राजकीय परिस्थिती विधानसभा निवडणूक निकालाच्या ११ दिवसानंतरही 'जैसे थी' तशीच आहे. भाजप आणि शिवसेनेला स्पष्ट बहुमत असून देखील दोन्ही पक्षातील सत्तासंघर्षामुळे राज्यात अद्यापही नवं सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. याच सगळ्या परिस्थितीत राज्यात पर्यायी सत्ता स्थापन होऊ शकतं का? याची देखील चर्चा सुरु झाली आहे. राज्यातील याच सगळ्या राजकीय घडामोडींविषयी चर्चा करण्यासाठी आज (सोमवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी पवारांनी बराच वेळ सोनिया गांधींशी चर्चा केली. याच चर्चेनंतर त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली. 

शरद पवारांनी राजधानी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की, राज्यातील एकूण परिस्थितीबाबत त्यांची सोनिया गांधीशी चर्चा झाली. मात्र, त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे आघाडीतील नेत्यांशी चर्चा करुन शरद पवार हे पुन्हा सोनिया गांधीची भेट घेणार आहेत. 

पाहा शरद पवारांची पत्रकार परिषद:

दरम्यान, या सगळ्या पत्रकार परिषदेतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शरद पवार यांनी थेट शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी अप्रत्यक्ष हिंटच दिली आहे. 'आपण शिवसेनेला पाठिंबा देणार का?' या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवारांनी एक प्रकारे शिवसेनेला हळूच हिंट देखील दिली आहे. 'आमच्याकडे कुणीही पाठिंबा मागितलेला नाही. तर मग आम्ही कसा पाठिंबा देणार? तसाही शिवसेनेकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही.' असं म्हणत पवारांनी शिवसेनेलाच चुचकारलं आहे. त्यामुळे गेले अनेक दिवस भाजपशी चर्चा न करणारी शिवसेना आता राष्ट्रवादीला स्वत:हून प्रस्ताव पाठवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

२०१४ विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी भाजपला न मागताच पाठिंबा दिला होता. पण आता मात्र, अनेक राजकीय गणितं बदलली आहेत. अशावेळी शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे की, त्यांना शिवसेनेच्या प्रस्तावाची प्रतिक्षा आहे. यावेळी शरद पवारांनी असंही स्पष्ट केलं की, सत्तास्थापनेबाबत त्यांची उद्धव ठाकरेंशी कोणतीही चर्चा झाली नाही.  

दरम्यान, राज्यातील आणि देशातीलही बहुतांशी राजकारण हे शरद पवार यांच्या भोवतीच फिरतं. अशावेळी शरद पवारांनी दिलेली हिंट शिवसेना कशाप्रकारे स्वीकारणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी