देवेंद्र फडणवीसांना दिलासा, सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा होणार सुनावणी!

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 24, 2019 | 12:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

भाजपने सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर महाविकासआघाडीने थेट सुप्रीम कोर्टात धाव का घेतली. त्यांच्या याचिकेवर सुनावणी सुरु झाली आहे.

shiv sena ncp congress petition in supreme court for floor test hearing began
देवेंद्र फडणवीसांना दिलासा, सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा होणार सुनावणी!  |  फोटो सौजन्य: Twitter

नवी दिल्ली: भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल (शनिवार) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ५४ आमदारांचं सहीचं पत्र राज्यपालांना दाखवलं. त्यानंतर राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलं आणि त्यानंतर शपथविधी देखील झाला. या सगळ्या प्रकाराबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांनी संयुक्तरित्या याप्रकरणी याचिका दाखल केली. यावर आता सुप्रीम कोर्टात सुनावणी घेण्यात आली. ज्याविषयी आता मोठी माहिती समोर आली आहे.  

सुप्रीम कोर्टातील सुनावणीमध्ये दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला. महाविकासआघाडीच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल आणि मनु सिंघवी यांनी मांडली. तर सरकारच्या बाजूने मुकूल रोहतगी यांनी युक्तीवाद केला. यावेळी सिब्बल आणि सिंघवी यांनी अशी मागणी केली होती की, भाजपने त्वरीत बहुमत सिद्ध करावं. तसे कोर्टाने आदेश द्यावेत. तर रोहतगी यांनी या मागणीला विरोध करत असं म्हटलं की, हा खूप संवेदनशील विषय आहे त्यासाठी वेळ देण्यात यावा अशी मागणी रोहतगी यांनी केली होती.

दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने कोणताही अंतिम निर्णय दिला. यावेळी कोर्टाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना असे आदेश देण्यात आले आहेत की, राज्यपालांनी कोणत्या कागदपत्रांच्या आधारे सत्तास्थापनेचा आदेश दिले ते कागदपत्र कोर्टात सादर करण्यास सांगितले आहेत. उद्या (सोमवार) सकाळी १०:३० वाजेपर्यंत हे कागदपत्र सादर करावे लागणार आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. 

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण यावेळी सिब्बल आणि सिंघवी यांनी तात्काळ बहुमत सिद्ध करण्याची मागणी कोर्टाने आज तरी मान्य केलेली नाही. त्यामुळे काहीसा दिलासा भाजप आणि पर्यायाने देवेंद्र फडणवीस यांना मिळाला आहे. मात्र, आता उद्या नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरलं आहे.   

सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या सुनावणीचे लाईव्ह अपडेट: 

 1. सुप्रीम कोर्टाकडून कोणताही अतिंम निकाल नाही, सत्ता पेचावर उद्या पुन्हा होणार सुनावणी 
 2. उद्या पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार 
 3. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी उद्या सकाळी १०:३० वाजेपर्यंत कागदपत्रं सादर करावेत: कोर्ट 
 4. खूप संवेदनशील विषय आहे, आम्हाला वेळ द्यावा, हा रविवार सुरु असू द्या: रोहतगी 
 5. कोर्टाने यासंबंधी नोटीस द्यावी याबाबत आम्ही सगळे कागदपत्रं सादर करु: रोहतगी 
 6. जसे कोर्टाचे अधिकार आहेत तसेच विधानसभेचे अधिकार देखील आहेत: रोहतगी 
 7. कोर्ट विधानसभेचं अधिवेशन तातडीने देऊ शकत नाही: रोहतगी
 8. कुणालाही रस्त्यावरुन उचलून शपथ दिली नाही: रोहतगी 
 9. राज्यपाल कुणालाही उठून शपथविधीसाठी आमंत्रण देऊ शकत नाही: न्यायाधीश रमण्णा
 10. राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान दिलं जाऊ शकत नाही: मुकूल रोहतगी 
 11. कलम ३६१ नुसार कोर्टाला राज्यपाल उत्तरदायी नाही: मुकूल रोहतगी  
 12. जर तुमच्याकडे बहुमत होतं तर तुम्ही सत्ता स्थापन करायची होती, किंवा फ्लोर टेस्टची मागणी करु शकता: मुकूल रोहतगी 
 13. राज्यपालांच्या निर्णयावर न्यायीक समीक्षा होऊ शकत नाही: मुकूल रोहतगी 
 14. सुप्रीम कोर्टात सरकारी पक्षाचा वेळकाढूपणाचं धोरण 
 15. मुख्यमंत्र्यांना नोटीस देण्यात आलेली नाही, तोवर तात्काळ निर्णय देण्यात येऊ नये- मुकूल रोहतगी
 16. सिब्बल यांच्या युक्तीवादानंतर न्यायमूर्ती एकमेकांशी विचारविनिमय सुरु
 17. ही याचिका थेट सुप्रीम कोर्टात आणण्याऐवजी हायकोर्टात जायला हवं होतं- तुषार मेहता
 18. कपिल सिब्बल यांनी तीनही पक्षांची बाजू मांडली,
 19. तुषार मेहता कुणाची बाजू मांडणार?, कोर्टाचा प्रश्न 
 20. त्वरीत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्या - कपिल सिब्बल
 21. सिब्बलांकडून राज्यपालांच्या कारभारावर नाराजी व्यक्त
 22.  महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच सर्वाेच्च न्यायालयात
 23.  पृथ्वीराज चव्हाण,अभिषेक मनू सिंघवी हे  सुप्रीम कोर्टात

तिन्ही पक्षांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली. काल रात्रीच सुनावणी घेण्याची कोर्टाला विनंती केली होती. पण कोर्टाने आज सकाळी साडे अकरा वाजता सुनावणी घेण्यार असल्याचं स्पष्ट केल होतं. सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया ही बेकायदेशीर आहे. राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट मागे घेणे आणि फडणवीस यांचा शपथविधी घेण्याच्या निर्णयाविरोधात ही याचिका दाखल केली.  या याचिकेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून महाविकासआघाडीचा उल्लेख करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी