'पाकिस्तानची अवस्था दारू पिऊन झिंगलेल्या माकडासारखी', पाहा कोणी केली टीका

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 04, 2019 | 09:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

शिवसेनेने आपल्या 'सामना' या मुखपत्रातून पाकिस्तानवर अतिशय बोचरी टीका केली आहे. पाकिस्तान हे दारू पिऊन झिंगलेलं माकड असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. 

imran_khan_ap
'पाकिस्तानची अवस्था दारू पिऊन झिंगलेल्या माकडासारखी', पाहा कोणी केली टीका  |  फोटो सौजन्य: AP

मुंबई: पाकिस्तानमध्ये भारतीय उच्चायुक्तालयाने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत पाहुण्यांना पाकिस्तानने दिलेल्या वागणुकीवरुन आज शिवसेनेने आपल्या 'सामना' या मुखपत्रातून जोरदार टीका केली आहे. 'पाकिस्तान हे दारू पिऊन झिंगलेलं माकड आहे.' अशा शब्दात शिवसेनेने पाकिस्तानच्या नेतृत्वावर टीका केली आहे. यावेळी या अग्रलेखातून पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्यावरही टीका केली आहे. 'इमरान खान हे लोकशाही पद्धतीने निवडून आले आहेत हा खरा तर भ्रम आहे.' अशी बोचरी टीका शिवसेनेने केली आहे. यावेळी अग्रलेखातून शिवसेनेने आपली थेट भूमिका मांडली आहे. पाकिस्तानमध्ये झालेला प्रकार भारत सरकारने अजिबात विसरू नये. असा सल्लाही यावेळी शिवसेनेने दिला आहे. 

'सामना'तील अग्रलेखामधील काही महत्त्वाचे मुद्दे: 

'पाकिस्तानची अवस्था ही दारू प्यायलेल्या माकडासारखी झाली आहे. इस्लामाबादमध्ये भारतीय उच्चायुक्तालयाने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत या झिंगलेल्या माकडांनी गोंधळ घातला. इस्लामाबाद येथे भारतीय उच्चायुक्तालयाने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला आलेल्या काही प्रतिष्ठित पाहुण्यासोबत पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी अतिशय वाईट वागणूक दिली. बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच तीळपापड झाला आहे. पण अद्यापही पाकिस्तानची गुर्मी कायम आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचा पुरता बंदोबस्त करण्याची वेळ आली आहे.' 

'मोदी सरकार पूर्ण बहुमताने पुन्हा सत्तेत आल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यातून अद्याप पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान हे सावरलेले नाहीत. मोदी विजयी झाल्यानंतर इमरान खान यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि दोन्ही देशांनी शांततेसाठी प्रयत्न करण्याचं वक्तव्यही केलं. पण इफ्तार पार्टीमध्ये जे काही घडलं ते पाकिस्तानने शांततेसाठी उचलेलं पाऊल आहे का? त्यामुळे पाकिस्तानचा दुटप्पीपणा पुन्हा समोर आला आहे. यामुळे पाकिस्तान हा चर्चा करण्याच्या लायकीचा देश नाही.' 

'इस्लामाबादमध्ये भारतीय उच्चायुक्तालयाने जी इफ्तार पार्टी आयोजित केली होती त्यासाठी पाकिस्तानमधील मोठे अधिकारी, पत्रकार, लेखक यासारख्या दिग्गज लोकांना बोलावण्यात आलं होतं. ही सर्व पाहुणे मंडळी मुळात पाकिस्तानीच होती. पण तरीही पाकिस्तानच्या सरकारने भारतीय उच्चायुक्तालयाचा कार्यक्रम म्हणून या पाहुण्यांशी असभ्य वर्तन केलं.' 

'इमरान खान लोकशाही पद्धतीने निवडून आलेले पंतप्रधान आहे याविषयी भ्रम वाटतो आहे. कारण पाकिस्तानला कोणत्याही पद्धतीचं नेतृत्व नाही. त्यामुळेच इस्लामाबादमध्ये अतिशय विचित्र प्रकार घडला. त्यामुळे पाकिस्तानी दारू पिऊन झिंगलेल्या माकडांनी केलेला हा तमाशा सरकारने विसरू नये.'

'सामना'तील या अग्रलेखाची दखल राष्ट्रीय पातळीवरील मीडियाने देखील घेतली आहे. त्यामुळे आता सरकार पाकिस्तानवर याप्रकरणी आणखी दबाव आणणार का? हा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी