जम्मू काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये १५० मीटर भुयार

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 23, 2020 | 13:56 IST

Tunnel detected near International Border in Samba sector by BSF & J&K police जम्मू काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये एक १५० मीटरचे भुयार आढळले. सीमा सुरक्षा दलाने तपासणी केल्यानंतर हे भुयार नष्ट केले.

थोडं पण कामाचं

  • जम्मू काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये १५० मीटर भुयार
  • दहशतवादी भारतात घुसखोरी करण्यासाठी वापरत होते भुयार
  • सीमा सुरक्षा दलाने तपासणी केल्यानंतर नष्ट केले भुयार

जम्मू: जम्मू काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये एक १५० मीटरचे भुयार आढळले. सीमा सुरक्षा दलाने तपासणी केल्यानंतर हे भुयार नष्ट केले. दहशतवादी भारतात घुसखोरी करण्यासाठी या भुयारी मार्गाचा वापर करत होते. (Tunnel detected near International Border in Samba sector by BSF & J&K police) 

नगरोटा येथे तपासणी नाक्याजवळ ट्रकमधून आलेले चार दहशतवादी चकमकीत ठार झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा आणखी सतर्क झाल्या आहेत. ठिकठिकाणी कसून तपासणी सुरू आहे. ही तपासणी सुरू असतानाच सीमा सुरक्षा दल आणि जम्मू काश्मीर पोलीस यांच्या संयुक्त पथकाला भुयार आढळले. सीमा सुरक्षा दलाचे जम्मूच्या सीमा भागाचे महानिरीक्षक एन एस जमवाल आणि जम्मूचे पोलीस महानिरीक्षक मुकेश सिंह यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली, यानंतर भुयार नष्ट करण्यात आल्याचे जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह म्हणाले. 

सुरक्षा यंत्रणांनी नष्ट करण्याआधी भुयाराचे फोटो आणि व्हिडीओ शूट केले आहे. या प्रक्रियेतून मिळालेल्या माहितीचा दहशतवाद विरोधी लढ्यात भारताच्या सुरक्षा यंत्रणांना उपयोग होईल. याआधी नगरोटा चकमकीत दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी त्यांच्याकडून जप्त केलेल्या साहित्याची आणि शस्त्रांची तपासणी सुरू केली. दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाइलची तज्ज्ञांच्या मदतीने तपासणी करण्यात आली. दहशतवाद्यांजवळ एक अचूक माहिती देणारी जीपीएस यंत्रणा होती. या यंत्रणेत नोंद झालेल्या माहितीचेही तज्ज्ञांच्या मदतीने विश्लेषण सुरू आहे. ही प्रक्रिया सुरू असताना हाती आलेल्या माहितीआधारे सीमा सुरक्षा दलाला तपास करण्याची विनंती करण्यात आली. तपासात सीमा सुरक्षा दलाच्या पथकाला भुयार सापडले.

भुयारातून भारतात आल्यानंतर दहशतवाद्यांनी पुढील प्रवासासाठी एखाद्या स्थानिकाचे सहकार्य घेतले असण्याची शक्यता आहे. या व्यक्तीचा शोध सुरू आहे. पोलिसांचे खबरी आणि सुरक्षा यंत्रणांचे गुप्तचर दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांचा शोध घेत आहेत. दहशतवाद्यांना मदत देणाऱ्यांविरोधात कारवाई होणार आहे. 

आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांनी सांबा सेक्टरमध्ये भुयारी मार्गाचा वापर करुन आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली आणि भारतात प्रवेश केला. नंतर पुढील प्रवासासाठी त्यांनी स्थानिक पातळीवर मदत घेतली. एका बनावट नंबरप्लेट लावलेल्या ट्रकमधून मोठा शस्त्रसाठा घेऊन दहशतवादी घातपात करण्यासाठी निघाले होते. मात्र नगरोटा परिसरात असलेल्या तपासणी नाक्यावर सुरक्षा पथकांनी ट्रक तपासण्याचा निर्णय घेतला. याच ठिकाणी दहशतवादी आणि सुरक्षा पथक यांच्यात थेट चकमक झाली. या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले. 

पाकिस्तानी हँडलर्सच्या संपर्कात होते जैशचे दहशतवादी

नगरोटा (Nagrota) चकमक प्रकरणाच्या तपासातून (encounter investigation) नवनवीन पुरावे (new proofs emerging) समोर येत आहेत. जम्मू काश्मीरमधील नगरोटा येथे तपासणी नाक्याजवळ ट्रकमधून आलेले चार दहशतवादी चकमकीत ठार झाले. हे दहशतवादी सतत पाकिस्तानमधील त्यांच्या हँडलरच्या संपर्कात (constant contact with Pak handlers) होते. ठार झालेले चौघेजण जैश-ए-मोहम्मद (4 killed JeM terrorists) या दहशतवादी संघटनेचे सदस्य होते. हे चौघे दहशतवादी मोठा घातपात करण्याच्या प्रयत्नात होते. दहशतवादी ट्रकमधून प्रवास करत असतानाही पाकिस्तानमधील त्यांच्या हँडलरच्या संपर्कात होते.

दहशतवाद्यांकडून एक मोबाइल जप्त करण्यात आला. या मोबाइलमध्ये आलेले काही संदेश डीलीट (Delet) करण्यात आले होते. हे संदेश तंत्रज्ञानाच्या मदतीने परत मिळवून (messages retrieved) तपासण्याची प्रक्रिया सुरू आहे. पाकिस्तानमधील हँडलरकडून (Pak handlers) आलेल्या संदेशांवरुन ट्रकमध्ये असतानाही दहशतवादी पाकिस्तानमधील त्यांच्या हँडलरच्या संपर्कात असल्याचे उघड झाले.

परत मिळवलेल्या एका संदेशात २ वाजता... एवढेच नमूद आहे तर अन्य एका संदेशात पोहोचलात की कळवा... असे नमूद आहे. यावरुन दुपारी घातपात करण्याची योजना होती, अशी शक्यता व्यक्त होत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी