Times Now Summit 2021: ग्रीन पॉवर, ग्रीन फ्युएल, ग्रीन एनर्जी हे भारताचे भविष्य - गडकरी

Times Now Summit 2021 : Nitin Gadkari says green power freen fuel and green energy are future of india ग्रीन पॉवर, ग्रीन फ्युएल, ग्रीन एनर्जी हे भारताचे भविष्य आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.

Times Now Summit 2021 : Nitin Gadkari says green power freen fuel and green energy are future of india
ग्रीन पॉवर, ग्रीन फ्युएल, ग्रीन एनर्जी हे भारताचे भविष्य - गडकरी 
थोडं पण कामाचं
  • ग्रीन पॉवर, ग्रीन फ्युएल, ग्रीन एनर्जी हे भारताचे भविष्य - गडकरी
  • गतीशक्ती योजनेद्वारे अर्थव्यवस्थेला गती देण्याची योजना
  • काही राज्य पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणू इच्छित नाही

Times Now Summit 2021 : Nitin Gadkari says green power freen fuel and green energy are future of india । नवी दिल्ली: ग्रीन पॉवर, ग्रीन फ्युएल, ग्रीन एनर्जी हे भारताचे भविष्य आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले. देशातील वाहने ग्रीन पॉवर, ग्रीन फ्युएल, ग्रीन एनर्जी यांच्याद्वारे चालवण्याची योजना असल्याचे गडकरी म्हणाले. ते टाइम्स नाउ समिट २०२१ (Times Now Summit 2021) या कार्यक्रमात बोलत होते.

टाइम्स नाउ समिट २०२१ (Times Now Summit 2021) या कार्यक्रमात टाइम्स नाउचे एडिटर इन चीफ आणि एडिटोरियल डायरेक्टर राहुल शिवशंकर यांनी नितीन गडकरी यांच्याशी बातचीत केली. याप्रसंगी गडकरींनी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठीच्या योजनांची माहिती दिली.

दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे गडकरी म्हणाले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग विभागाच्या माध्यमातून देशात २२ ग्रीन एक्सप्रेस वे विकसित करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली. पुढील काही वर्षांत देशातील पायाभूत योजना अमेरिका आणि युरोपमधील देशांच्या बरोबरीच्या असतील. 

गतीशक्ती योजनेद्वारे अर्थव्यवस्थेला गती देण्याची योजना

भारताच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी गतीशक्ती योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्याचे तसेच देशात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू असल्याचे गडकरी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'आत्मनिर्भर भारत' हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करत असल्याचे गडकरी यांनी सांगितले. 

दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे या ड्रीम प्रोजेक्ट संदर्भात गडकरींनी सविस्तर माहिती दिली. दिल्ली ते मुंबई असा हा १३५० किमी. अंतराचा एक्सप्रेस वे असेल. हा जगातील सर्वात मोठा एक्सप्रेस वे असेल. दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे डिसेंबर २०२४ पर्यंत सुरू होईल. दिल्ली ते डेहराडून, जयपूर, कटरा राजमार्ग विकसित करण्याचे काम सुरू आहे. तसेच २२ ग्रीन एक्सप्रेस वे विकसित करण्याचे काम सुरू आहे; असे गडकरींनी सांगितले.

चेन्नई ते बंगळुरू राजमार्ग

चेन्नई ते बंगळुरू राजमार्ग तयार होत आहे. देशातील सर्व महत्त्वाची ठिकाणं राजमार्गांद्वारे एकमेकांशी जोडण्याचे काम सुरू आहे. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत राजमार्गांचे काम सुरू आहे. पुढील दोन वर्षांत हे राजमार्ग तयार होतील, अशी माहिती गडकरींनी दिली.

सतत पायाभूत सुविधांवर काम करत आहे

महाराष्ट्रात युतीचे सरकार असताना १९९५ मध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचा मंत्री होतो. हे पद सांभाळत असताना मुंबई-पुणे एक्सप्रेस वे प्रकल्पावर काम केले. या नंतर सातत्याने मला पायाभूत सुविधांशी संबंधित महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्याची संधी मिळत आहे. यामुळे सतत पायाभूत सुविधांवर काम करत आहे. 

फ्लेक्स इंजिनवर काम सुरू आहे

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती आणि वाढणारे प्रदूषण यावर उपाय म्हणून वाहने ग्रीन पॉवर, ग्रीन फ्युएल, ग्रीन एनर्जी यांच्याद्वारे चालवण्याची योजना असल्याचे गडकरी म्हणाले. हे इंधन देशाचे भविष्य आहे. फ्लेक्स इंजिनवर काम सुरू आहे. लवकरच हायड्रोजनवर चालणाऱ्या कार येतील. इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक रिक्शा ही वाहने आली आहेत. ऑटोमोबाइल क्षेत्रात आणखी नवी उत्पादने येत आहेत. दरमहा किमान १२ ते १५ हजार रुपये पेट्रोलच्या कारवर खर्चावे लागतात. या उलट इलेक्ट्रिक कारवर जेमतेम दोन हजार रुपयांचा खर्च होतो; असे गडकरी म्हणाले.

काही राज्य पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणू इच्छित नाही

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने राज्यांसमोर ठेवला आहे. पण काही राज्य पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणू इच्छित नाही. पण पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आले तर जनतेचा मोठा फायदा होईल. अरुण जेटली यांनी अर्थमंत्री म्हणून पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण काही राज्यांनी इंधन आणि दारू (मद्य/अल्कोहोल) यांच्या माध्यमातून भरपूर महसूल मिळत असल्याचे सांगत जीएसटीच्या प्रस्तावाला विरोध केला. आता निर्मला सीतारमण अर्थमंत्री आहेत आणि त्याच हा विषय बघत आहेत, असे गडकरी म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी